Followers

Wednesday 17 July 2024

विशेष लेख मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत’ मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आहे सोपे

 

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला, मुलींना दरमहा 1 हजार 500 रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये लाभ दिला जाणार आहे. या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून यासाठी ‘नारीशक्ती दूत-Narishakti doot’ हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे मोबाईल ॲप डाऊनलोड पात्र लाभार्थी महिलाही घरबसल्या आपला अर्ज भरू शकतात. या मोबाईल ॲपद्वारे अर्ज ऑनलाईन अर्ज भरणे अतिशय सोपे असून हा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि कार्यपद्धतीची माहिती देणारा हा लेख...._
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे किंवा ज्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड आहे अशा कुटुंबातील महिला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण याजानेसाठी पात्र आहेत. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाच्या व्याख्याते पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली यांचा समावेश असून एका कुटुंबातील विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार महिला, तसेच एक अविवाहित महिला यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या महिलांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट दरमहा 1 हजार 500 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून ‘नारीशक्ती दूत’ अॅपद्वारे महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाहीत, त्यांच्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेच अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका आणिमुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, महिला बचत गटातील समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी), आशासेविका, वार्ड अधिकारी, शहर प्रकल्प संचालक, महानगरपालिका बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ मोबाईल अॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. त्यानंतर अॅपमध्ये स्वतःची माहिती भरून लॉगिन आयडी तयार करुन घ्यावा. लॉगीन आयडीमधून योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या महिलेचा ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. या अॅपवरील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेवर क्लिक केल्यानंतर पात्र महिलांचा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यास ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जाचा नमुना व हमीपत्र याची पीडीएफ फाईल अॅपवर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून त्याप्रमाणे अर्ज व हमीपत्र भरावे आणि ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे द्यावे. अर्जाचा विहित नमुना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथे उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना काही बाबी काळजीपूर्वक विचारात घेऊन माहिती भरावी. यामध्ये महिलेचे नाव, जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता आधारकार्डवर नमूद असल्याप्रमाणे भरावा. महिलेची विवाहित, अविवाहित, घटस्पोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार महिला याची नोंद अचूक नोंदवावी. महिलेचे आवश्यकतेप्रमाणे लग्नापूर्वीचेनाव व लग्नानंतरचे नाव नमूद करावे. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्ज भरतांना मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे, जेणेकरून महिलेस अर्ज स्वीकृती व आर्थिक लाभाची रक्कम बँकेत जमा झाली असल्याची माहिती तसेच अन्य माहिती मोबाईल एसएमएसद्वारे प्राप्त मिळेल. महिलेच्या बँक खात्याचा तपशील नमूद करताना बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अचूक नोंदवावा. बँक खाते आधार संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार संलग्न असल्यास लाभ अदा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
*योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी ग्रामस्तरीय समिती*
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज गावपातळीवर स्वीकारण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या समितीमार्फत योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी गावपातळीवर शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. ऑफलाईन प्राप्त झालेले अर्ज अॅपवर ऑनलाईन भरण्याची कार्यवाही समिती करणार आहे. तसेच लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करणे, यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात करण्याचे काम समितीमार्फत केले जाईल. यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्याचे आणि द्विरुक्ती टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क स्वरुपाची असून यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
*अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे*
• आधारकार्डची प्रत (दोन्ही बाजूने)
• महिलेचे जन्म प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र या पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र.
• परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोवर विवाह केला असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
• नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्त्पन्नाचा दाखल म्हाणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयेपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळी अथवा केशरी शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स प्रत.
• अर्जदाराचे विहित नमुन्यातील हमीपत्र.
• आधार लिंक बँक खात्याचा तपशील.

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

No comments:

Post a Comment