Followers

Wednesday 17 July 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी आषाढी एकादशीला राबविण्यात आला विशेष उपक्रम

 




·        अनेक मंदिर परिसरांमध्ये योजनेबाबत जनजागृती, अर्जांचे वितरण

लातूर : मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये, तसेच शहरी भागात विविध ठिकाणी योजनेच्या अर्ज नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंदिर परिसरातही विशेष शिबिराचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यात आली, तसेच विहित नमुन्यातील अर्जांचे वितरण करण्यात आले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाहीत, अशा महिलांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून हे ऑफलाईन अर्ज, विहित नमुन्यातील हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे इच्छुक पात्र महिलांकडून भरून घेणे, तसेच ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी ग्रामसेवककृषि सहायकतलाठीअंगणवाडी सेविकाआशा सेविकाग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरला जावा, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून महिलांचे अर्ज स्वीकारण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची सुविधा काही प्रमुख मंदिर परिसरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. लातूर शहरात बालाजी मंदिर, कालिकादेवी मंदिर आणि रामलिंगेश्वर मंदिर, औसा येथील हनुमान मंदिर, जळकोट येथील विठ्ठल मंदिर, वांजरवाडा येथील संत गोविंद माऊली संस्थानासह जिल्ह्यातील इतरही काही प्रमुख मंदिर परिसरात आयोजित शिबिरामध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती करून विहीत नमुन्यातील अर्जांचे वितरण आणि ऑफलाईन अर्जांची स्वीकृती करण्यात आली.

No comments:

Post a Comment