Followers

Tuesday 13 August 2019

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सांगली येथे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचाव पथकांचा सत्कार



*सांगलीच्या पूरात अडकलेल्या 227 नागरिकांना सुखरुप बाहेर काढले

       लातूर दि 13:- मागील आठवडयात सांगली,कोल्हापूर व सातारा जिल्हयात अतिवृष्टी झाल्याने  या भागात  महापूर आलेला होता. या ठिकाणी  लातूर जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण अंतर्गत  जिल्हाधिकारी  जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व साहित्यासह  दोन बोटी  व 12 जणांचे  पथक सांगलीला रवाना झाले होते.या पथकाने सांगली  येथे पोहोचून  सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत कामाला सुरुवात केली. व दोन दिवसांत जवळपास 227 पूरात आडकलेल्या नागरिकांना या बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले. तसेच  पूरात अडकलेल्या नागरिकांना  अन्नाचे पॉकेट वितरणाची जबाबदारी ही चोखपणे पार पाडली,  या मुळे  लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने  अग्निशमन  अधिकारी विशाल आल्टे  यांच्या नेतृत्वाखाली  पूरग्रस्त  भागात बचाव कामात उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल  सर्व बचाव पथकातील  सदस्यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
      सन 2016 च्या दुष्काळात  सांगलीकरांनी  लातूरकरांना  रेल्वेने पाणी पुरवठा केला होता. आपल्या अडचणीच्या काळात  सांगलीकरांनी  मैत्री  धर्म निभावून  लातूरला वेळेत पाणी उपलब्ध्‍ करुन ‍दिले होते. त्याच सांगलीकरांच्या या अडचणीच्या काळात लातूर जिल्हावासियांनी तात्काळ  मदतीचा हात पुढे  करुन सांगली  शहरातील  सुमारे  227 लोकांना  पूरातून बाहेर काढले. व ही बाब लातूरकरांसाठी समाधानाची आहे की सांगलीकर मित्रांच्या मदतीला वेळेत पोहोचून मैत्री धर्म चोखपणे निभावला.
       बचाव पथकातील  या 12 जिगरबाज  सदस्यांचे  अभिनंदन जिल्हाधिकारी  जी. श्रीकांत यांनी केले. महापूराच्या अवघड परिस्थितीमध्ये  अत्यंत धैर्याने चांगले काम बचाव पथकाने केले असून या कामाचा  व तेथील  आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव आला असून इतर ठिकाणी गरज पडल्यास  अशावेळी  आपण सदैव तत्पर रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
        यावेळी  बचाव पथकाचे  प्रमुख अग्निशमन अधिकारी  श्री. आल्टे व महादेव पानपट्टे  यांनी पूरग्रस्त   भागात  बचावात बजावलेल्या कामगिरीचे अनुभव  कथन केले. व लातूरचे बचाव पथक  कोणत्याही आपत्तीमध्ये काम करण्यास सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली.
       यावेळी निवासी  उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष जोशी, पोलिस उप अधिक्षक मधुकर जवळकर , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  साकेब उस्मानी यांच्यासह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment