Followers

Wednesday 14 August 2019

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर





        * दिव्यांगासाठी राज्यातील पहिली आयटीआय लातूर मध्ये स्थापन होणार

लातूर दि 14:- राज्यातील दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शासनाकडून तीन टक्के ऐवजी पाच टक्के निधी खर्च करण्याचे आदेश सर्व विभागांना दिलेले  आहेत. यातून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणून  त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा येथे भगवान महावीर विकलांग सहायता समिति मुंबई मार्फत दिव्यांगाना विविध सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रमात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद चे अध्यक्ष मिलिंद लातुरे, गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे, समाज कल्याण सभापती संजय दोरवे,कृषी सभापती बजरंग जाधव, भगवान महावीर विकलांग समितीचे नामदेव कदम, डॉक्टर नारायण व्यास, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की यापूर्वी दिव्यांगाना अपंग म्हणून ओळखले जात होते व त्यांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नव्हत्या परंतु या शासनाच्या काळात शासनाच्या सर्व विभागात दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी तीन ऐवजी पाच टक्के निधी ठेवण्यात आला व सदरचा निधी दिव्यांगांच्या विकासासाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असे त्यांनी सांगितले
दिव्यांगणा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शासनाचे मुख्य ध्येय असून त्यासाठी शासन कटिबद्ध असून दिव्यांगांनी आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी केले
लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावातील प्रत्येक दिव्यांग व्यक्ती ची नोंद करण्यात आलेली असून अशी नोंद करणारा लातूर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. तसेच फक्त दिव्यांगासाठी  औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगून यातून दिव्यांगाना कौशल्याधारित ज्ञान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दिव्यांगाना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपकरणे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे कदम म्हणाले की समाजातील प्रत्येकाने मनाने श्रीमंत  राहून समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले पाहिजे. दिव्यांगाना दिव्यांगात्वर मात करण्यासाठी ही समिती कार्यरत असून त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान हे समितीच्या कार्याचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे व समाज कल्याण सभापती संजय दोरवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर व इतर मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला
            या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर नारायण व्यास यांनी करून आयोजनाचा उद्देश सांगितला. याठिकाणी जिल्ह्यातील दिव्यांगा ची दोन दिवस तपासणी करण्यात येऊन जागेवरच त्यांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येतील,असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव मनाळे यांनी केले व शेवटी आभारही मानले.

No comments:

Post a Comment