Followers

Thursday 8 August 2019

जिल्हा प्रशासनाने टंचाईची भीषणता लक्षात घेऊन त्यावरील उपाय योजनांची तयारी ठेवावी -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर





* जिल्हयात पिण्याच्या पाण्यासाठी 600 विहीरी घ्याव्यात.
* प्रत्येक तालुक्यात किमान 60 विहिरी या प्रमाणे 1 सप्टेंबरपासून कामांना सुरुवात करावी
* भूजल विभागाने टंचाईशी संबंधीत  अधिकाऱ्यांना  जिओलॉजीचे  प्रशिक्षण दयावे
* माहे डिेसेंबर 2019 अखेरपर्यंत  तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना  कार्यान्वीत कराव्यात
* ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे
* लातूर शहरातील महापालिकेच्या सर्व विंधन विहिरींचे जलपुर्नभरण करावे
* वृक्ष रोपणाचे काम उद्दिष्ट म्हणून न करता आवड ( पॅशन ) म्हणून करावे

       लातूर,दि.8:- जिल्हयातील सध्याचे पर्जन्यमान धरणातील जलसाठे तसेच परतीचा पाऊस पडणार नाही असे ग्राहय धरुन जिल्हा प्रशासनाने  टंचाईच्या उपाय योजनांची सविस्तर माहिती तयार करावी. टंचाईग्रस्त  गावांसाठी पर्यांयी  जलस्त्रोतांची माहिती  घेऊन त्या ठिकाणांची  संबंधीत तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी पाहणी करुन स्त्रोताची  खात्री करावी. तरच  त्यावरील उपाययोजना प्रभावीपणे राबविता येतील, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर जिल्हा टंचाई व वृक्षरोपण आढावा बैठकीत  विभागीय आयुक्त केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उप जिल्हाधिकारी (रोहयो) प्रदिप कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपाली ठोंबरे, जी.के. जोशी, केशव क्षिरसागर, पाणी पुरवठा विभागाचे  कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, कृषि सहसंचालक जे.एल. जगताप, सहाय्यक उप वनरक्षक श्री.मुदुमवार यांच्यासह इतर सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
       विभागीय आयुक्त्‍ केंद्रेकर पुढे म्हणाले की, टंचाईची भीषण परिस्थिती  पाहता पिण्याच्या पाण्यासाठी लातूर जिल्हयाला  एमआरजीईएस मधून  600 विहीरी घेण्यास मंजूरी देण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात किमान  60 विहिरी प्रास्तावित कराव्यात. या विहिरींच्या कामांसाठी  प्रथम  विहिरींची योग्य  जागा निश्चित करावी. त्यासाठी भूजल विभाग, त्या गावांतील पूर्वीचे जलसंधारण उपचार व गावांतील सरपंच आदिची मदत घ्यावी. तसेच भूजल विभागाने पाण्याची जागा निश्चिती झाल्यास त्याबाबतचे  प्रमाणपत्र जागेवरच दयावे, असे निर्देश त्यांनी दिले.
         पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीची जागा निश्चित झाल्यास त्या जागेवर प्रथम साधं विना केसिंग पाईपचे बोअरवेलं किमान 70 ते 80 फुट घ्यावे. त्या बोअरवेल ला पाणी लागल्यानंतरच त्या ठिकाणी विहिरींचे काम सुरु करावे. या विहिरींच्या एकूण कामाचे अंदाजपत्रक कोणत्याही परिस्थितीमध्ये  7 लाखापेक्षा अधिक नसावे. या अंदाजपत्रकातच साधं बोअरवेलसाठी 5 ते 6 हजाराची  तरतूद  ठेवावी, असे सांगून श्री.केंद्रेकर यांनी या सर्व विहीरींच्या जागेची  निश्चिती 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करुन 1 सप्टेंबर 2019 पासून  प्रत्यक्ष कामांला सुरुवात झाली पाहीजे, असे श्री.केंद्रेकर यांनी सूचित केले.
         टंचाईच्या काळात  योजना मंजुरीसाठी योग्य नियोजन  केल्यास शासन  योजनांना निधी उपलब्ध्‍ करुन देत  असते. टंचाईच्या योजनांचे नियोजन करताना नकाशे  तयार करावेत, पाणी स्त्रोत अद्यावत करावेत, त्या ठिकाणी  नवीन  जलसंधारणाची  कामाचे नियोजन ,वृक्षरोपण व पाण्याचे  लिकेजेस व वेस्टेजचे नियंत्रण या पाच बाबी केल्यास शासनाकडून अशा योजनांना निधी प्राप्त होण्यास अडचण राहत नाही. तरी  सर्व संबंधीतांनी याची  योग्य नोंद घ्यावी, असे निर्देश केंद्रेकर यांनी दिले.
      टंचाईशी संबंधीत  प्रत्येक अधिकाऱ्याला भू-शास्त्राचे (जिओलॉजी) सामान्य ज्ञान आवश्यक आहे. हे ज्ञान असल्यास टंचाईची योजना राबविताना  योग्य तारतम्य राहते. त्याकरिता  भू-जल विभागाने  तात्काळ जिल्हास्तरावर भू-जल बाबतचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांसाठी ठेवावे, अशी सूचना श्री. केंद्रेकर यांनी केली.
       पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची कामे पूर्ण  झाल्यास त्या ठिकाणाहून गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोतापर्यंत  पाणी उपसा करण्यासाठी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना घ्याव्यात. या सर्व योजनांची  कामे डिसेंबर  2019 अखेर पर्यंत पूर्ण होऊन त्या कार्यान्वीत  झाल्या पाहीजेत, असे श्री. केंद्रेकर यांनी सांगितले. तसेच टंचाई  काळात  त्या त्या गावांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना राबविताना  त्यात कंजूषी करु नका. अशा उपाययोजनांना तपासणी करुन त्वरित मान्यता दिली पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
        ऊसाचे क्षेत्र असलेल्या गावांमध्ये भूपृष्ठाखालील  पाण्याचा मोठया प्रमाणावर उपसा होत असतो. तसेच ऊसाला मोठया प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे  संबंधित शेतकऱ्यांचे  प्रबोधन करुन  त्यांना पीक पध्दतीत बदल करण्यासाठी प्रवृत्त करावे. मांजरा धरणातही  अत्यल्प पाणी साठा असून प्रशासनाने पाणी  बचतीचे धोरण ठरवावे व अत्यंत  काटकसरीने  पाण्याचा वापर करावा.तसेच  लातूर शहर महानगरपालिकेच्या त्यांच्या अधिनस्त असलेल्या सुमारे  800 विंधन  विहिरींचे जलपुर्नभरण त्वरीत करण्याची कार्यवाही  करावी त्यानंतरच्या रस्त्यांच्या कामाचा विकास निधी वितरीत केला जाईल, असे निर्देश श्री.केंद्रेकर यांनी दिले.
         लातूर जिल्हा प्रशासनाचा लौकीक मराठवाडयातील  इतर जिल्हयापेक्षा चांगला असून प्रशासनाने टंचाईच्या उपाय योजनांचे योग्य नियोजन ठेवून  त्याचा वापर प्रभावीपणे करावा व आपला लौकीक चांगला ठेवावा, अशी अपेक्षा श्री. केंद्रेकर यांनी व्यक्त केली.
        राज्यात मराठवाडा विभाग वृक्षरोपणात तिसरा असून लातूरची  वृक्षरोपणाची परिस्थिती  अधिक लवकर  सुधारली  पाहीजे. प्रत्येक  शासकीय विभाग प्रमुखांनी  वृक्षरोपणाच्या कामांकडे उद्दिष्ट व शासकीय  सोपस्कर म्हणून न पाहता  त्यात आवड (पॅशन )निर्माण  करुन  वृक्षरोपणाचे  काम करावे. ते काम गुणवत्तापूर्ण होऊन नक्कीच उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षरोपण होईल, असे श्री. केंद्रेकर यांनी सूचित केले.
         जलयुक्त शिवारचे काम चांगले असून पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब  जमिनीत जिरवणे व साठवण  ठेवला गेल्यासच लातूरची  पाणी परिस्थिती चांगली राहिल. तसेच जलसंधारण  विभागाने जिल्हयातील सर्व के.टी.वेअरची  पाहणी करुन प्रत्येक  के.टी. वेअरचे दोन-दोन गेट 15 ऑगस्ट पर्यंत टाकून  पाणी  अडविण्याची सूचना श्री. केंद्रेकर यांनी केले.
          जिल्हयात आजपावेतो 31 टक्के पर्जनयमान झालेले असून 78 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. तर 83 टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु असून ज्या गावांत  ऊसाचे क्षेत्र अधिक आहे अशाच बहुतांश गावांत  टँकरने पाणी पुरवठा सुरु असल्याचे  वास्तव जिल्हाधिकारी  श्रीकांत यांनी सांगितले. तसेच खाजगी जमिनीवर 30 वर्षाच्या कराराने 100x100x5 मीटर आकाराचे शेततळे निर्माण करुन त्यामध्ये पाणी साठवून ठेवून टंचाईच्या काळात  वापरण्याचे  नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
      यावेळी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी टंचाई, वृक्षरोपण, जलयुक्त, पीक परिस्थिती, गौण खनिज, बी-बियाणे, खते, आदि बाबत सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
   वृक्षरोपण :-
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण केले. तसेच लातूर जिल्हयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिवायकी पध्दतीने घनदाट वृक्ष लागवडी च्या कामाची प्रशंसा केली.
        यावेळी श्री. केंद्रेकर यांनी  महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला  भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी घन कचरा  व्यवस्थापन  प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच या ठिकाणी  काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या महिलांशी श्री. केंद्रेकर यांनी संवाद साधला.

No comments:

Post a Comment