Followers

Tuesday 6 August 2019

बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध - विजया रहाटकर








     लातूर,दि.6:- महिला बचत गटांना विविध योजनांच्या माध्यमातून निधी देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
      उदगीर येथील भागीरथी मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजवला योजनेअंतर्गत महिला बचत गटाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
          यावेळी गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे, आ. सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपविभागीय अधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, प्रज्वला समितीच्या अध्यक्षा दीपाली मोकाशी, ऍड. माधुरी देशमुख, साधना सुरडकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर हिरमुखे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, पंचायत समितीच्या सभापती सत्यकला गंभीरे, जि. प. सदस्या विजया बिरादार, उषा रोडगे, स्मिता परचुरे,  नंदकुमार नलंदवार, उत्तरा कलबुर्गे, मीनाक्षी पाटील, मनोहर भंडे, राजेंद्र केंद्रे, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक नागेश अष्टुरे, बबिता भोसले, अरुणा चिमेगावे, प्रा. पंडित सूर्यवंशी, सरोज वारकरे, श्यामला कारामुंगे, माधव गंगापूरे, प्रेरणा होनराव, यांची उपस्थिती होती.
        पुढे बोलताना रहाटकर म्हणाल्या की, महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे याकरिता उज्वला योजनेतून मोफत गॅस, गरोदर महिलांना आर्थिक मदत अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. याशिवाय महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. महिलांनी या योजना व कायद्याची माहिती करून घ्यावी असे आवाहन करून रहाटकर म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवतेजस्विनी योजनेतून दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात केली आहे. या अंतर्गत बचत गटांना प्रशिक्षण, कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बचत गटांना कर्ज वाटपात उदगीर तालुका अव्वल स्थानावर असल्याबद्दल रहाटकर यांनी कौतुक केले.
     अध्यक्षीय समारोपात आ. भालेराव यांनी सक्षम बचत गटांच्या निर्मितीसाठी आपण पूर्णपणे सहकार्य करू असे वचन देत लवकरच उदगीर येथे बचत गटासाठी प्रशिक्षण केंद्र उघडण्यासाठी प्रयत्न केले जातील जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून या भागात उद्योगांना चालना मिळेल असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रज्वला समितीच्या अध्यक्षा दीपाली मोकाशी यांनी केंद्र शासन व राज्य शासन महिलांना सक्षम करण्यासाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी. आर. डापके यांनी केले. कार्यक्रमास उदगीर तालुक्यातील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या मोठया संख्येनी उपस्थित होत्या.
  अहमदपूर व रेणापूर येथील कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. अहमदपूर येथील कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी  आमदार विनायक पाटील, गणेश हाके, यांच्यासह अन्य पदाधिकारी  तसेच सुमारे  चार ते पाच हजार महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment