Followers

Monday 5 August 2019

शासन महिलांची सुरक्षितता व मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी कटीबध्द -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर






*शासनाच्या पाच वर्षाच्या काळात यापूर्वीच्या शासनाच्या 15 वर्षाच्या काळापेक्षा अधिक पटीने विकास
*जिल्हा प्रशासनाच्या संपर्क,संवाद व समाधान अभियानाचे कौतुक
*औसा व निलंगा येथील खुली शासकीय इमारत महिला बचत गटांकडे देण्याची घोषणा
* महिला बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करणार
*नव तेजस्वनी योजनेसाठी 200 कोटीचा निधी

    लातूर दि.5:- केंद्र व राज्य शासन सर्वसामान्य लोकांसाठी विविध कल्याणकारी  योजना राबवून  त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचवत आहे. तसेच हे शासन महिलांची सुरक्षितता व त्यांच्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी  कटीबध्द  असल्याचे  प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा, माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
      राज्य महिला आयोगामार्फत औसा व निलंगा येथे  प्रज्वला योजनेंतर्गत  महिला बचत गटातील  महिलांकरिता  कायदेविषयक, सामाजीक, आर्थिक प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, प्रज्वला योजनेच्या अध्यक्ष दीपाली  मोकाशी, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषद कृषि सभापती  बजरंग जाधव,समाज कल्याण सभापती संजय दोरवे, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख,औसा पं.स. सभापती  दत्तोपंत सुर्यवंशी, निलंगा पं.स. सभापती  अजित माने, निलंगा नगर परिषद नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,अरविंद पाटील-निलंगेकर गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
        पालकमंत्री  निलंगेकर पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासन विविध  लोककल्याणकारी योजनांच्या  माध्यमातून  सर्वसामान्य लोकांच्या  विकासासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात यापूर्वी शासनाच्या 15 वर्षाच्या काळात  जेवढा विकास झाला त्यापेक्षा अधिक पटीने या शासनाच्या पाच वर्षाच्या काळात विकास होऊन त्याचा लाभ प्रत्यक्ष लोकांना  होत आहे, असे त्यांनी  सांगितले.
      राज्यात महिला बचत गटांसाठी 24 कोटीचा फिरता  निधी फक्त लातूर जिल्हयासाठी खेचून आणला. निधी वाटपात लातूर जिल्हा पहिला असून या पुढील  काळात महिला बचत गटांना शून्य टक्के दरांने कर्ज पुरवठा करणार असल्याचे  निलंगेकर यांनी सांगून हे शासन महिलांची सुरक्षितता, सक्षमीकरण व त्यांच्या मुलांच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी म्हटले.
      नव तेजस्वनी योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी असून  या अंतर्गत  मुख्यमंत्री महोदयांनी  दोनशे कोटीचा निधी  दिला असून या योजनेचा जास्तीत जास्त  लाभ लातूर जिल्हयातील  महिलांना मिळवून देणार आहे. तसेच महिला  बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना  तालुकास्तरावर हक्काची  बाजारपेठ मिळावी  म्हणून  निलंगा व औसा  येथील खुल्या  असलेल्या शासकीय इमारती बचत गटांच्या बाजारासाठी देण्याची घोषणा पालकमंत्री निलंगेकर यांनी केली.
       जिल्हयाची सध्याची टंचाईची परिस्थिती  पाहून जिल्हा प्रशासनाने संपर्क, संवाद व समाधान अभियानांतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जागेवर सोडविण्याचा चांगला  उपक्रम सुरु केला असून याचा  लाभ ग्रामस्थांनी  घ्यावा, असे अवाहन  निलंगेकर यांनी  करुन जिल्हयात चांगला पाऊस पडण्यासाठी  निलंगा येथे महायज्ञ आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
     राज्यातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहीजे. महिलांना  कायदेविषयक ,आर्थिक व शासनाच्या सर्व योजनांची  माहिती व  प्रशिक्षण मिळावे यासाठी  राज्य महिला  आयोगामार्फत  प्रज्वला  योजनेंतर्गत महिला बचत गटातील  महिलांचे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. यातून महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे व बचत  गटांच्या वस्तूंना  बाजारपेठ  मिळवून देण्याचा उद्देश असल्याची  माहिती  आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर यांनी दिली.
       राज्य महिला आयोग हे राज्यातील  प्रत्येक महिलेचे माहेर  आहे. महिलांना माहेरातूनच  विविध कायद्याबाबत जागृत करुन आर्थिक  दृष्टया  स्वावलंबी  बनविले जात आहे. तसेच कौटुंबिक वादाची  प्रकरणे  सामंजस्याने सोडविली जात आहेत. प्रत्येक  महिलांपर्यंत  केंद्र व राज्य शासनांच्या योजनांचा लाभ  पोहोचविला जाणार असल्याचे  श्रीमती रहाटकर यांनी सांगून  महिलांना नागपंचमीच्या सणानिमित्त शुभेच्छा देऊन प्रशिक्षणातून  जागृत होण्याचे आवाहन केले.
      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  राज्यातील महिलांसाठी  नव तेजस्वनी योजना सुरु करुन त्यासाठी  200 कोटीचा  निधी  उपलब्ध्‍ केला असल्याची  माहिती  अभिमन्यू पवार  यांनी  दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लातूरे हे प्रज्वला  योजनेच्या अध्यक्ष श्रीमती मोकाशी  यांनी ही मार्गदर्शनपर भाषण केले.
      प्रारंभी  पालकमंत्री  निलंगेकर  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन  होऊन औसा, निलंगा  येथील  महिला बचत गटांच्या  प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ  झाला.तर लातूर  येथील  कार्यक्रम श्रीमती  रहाटकर  यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने  सुरु झाला. लातूर येथील महिला प्रशिक्षण कार्यक्रमास सुमारे  2 हजार महिला,औसा येथील  प्रशिक्षण कार्यक्रमास  तीन ते चार हजार महिला तर निलंगा येथील प्रशिक्षण कार्यक्रमास चार हजार महिला अशा एकूण  सुमारे  10 ते 12 हजार महिलांनी  प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.

No comments:

Post a Comment