Followers

Wednesday 14 August 2019

जिल्ह्यातील 45 हजार वंचित लाभार्थ्यांना अंत्योदय अभियानाचा लाभ होणार -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर







* पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत वंचित लाभार्थी शोधण्यात लातूर जिल्हा     
    राज्यात प्रथम
* मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात लातूर जिल्हा प्रथम
* जिल्हा प्रशासनाच्यावतीने मिरज तालुक्यातील पूरग्रस्त पद्माळे गाव पुनर्वसनासाठी दत्तक
* दुष्काळी परिस्थितीत कोणीही खचून जाऊ नये ,शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे

लातूर दि 15:- राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान हे दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 4 हजार 400 व प्राधान्य कुटुंब योजनेचे 40 हजार 400 असे एकूण 44 हजार 800 नवीन लाभार्थी शोधण्यात आलेले आहेत. या लाभार्थ्यांना नवीन कार्ड वाटप करून दिनांक 2 सप्टेंबर 2019 पासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त चा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर, महापालिका आयुक्त एम. डी. सिंह, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य काकासाहेब डोळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उप जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह इतर पदाधिकारी अधिकारी ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत राज्यात सर्वात जास्त वंचित लाभार्थी शोधण्यात लातूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या अभियानात आजपर्यंत गॅस जोडणी साठी 40 हजार अर्ज प्राप्त झालेले असून यातील दहा हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिलेली आहे. या प्रकारे या अभियानाची लातूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
 मागील वर्षी जिल्हयात सरासरीच्या 63 टक्के पर्जन्यमान झालेले होते. तर यावर्षी सरासरीच्या 31 टक्के पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे लातूर जिल्हयात पाणी व चारा टंचाई मोठया प्रमाणावर  निर्माण झालेली आहे.या टंचाईच्या अनुषंगाने त्यावरील उपाय योजनांसाठी  जिल्हा प्रशासनामार्फत  टँकर, विंधन विहिर, विहिर आदि अधिग्रहणे  देऊन संबंधित टंचाईग्रस्त गावांना पाणी  पुरवठा  तात्काळ सुरु करण्यात आलेला आहे.  या दुष्काळी परिस्थितीत कोणीही खचून जाऊ नये, धीर धरावा. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा,असे आवाहन निलंगेकर यांनी करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विस्तारित  समाधान  योजनेंतर्गत  संपर्क, संवाद व समाधान हे ब्रीद घेऊन  जिल्हा व तालुकास्तरीय  प्रशासन मंडळस्तरावर जाऊन तेथील लोकांच्या  समस्या जागेवरच सोडवित असल्याने  शासन व प्रशासन लोकांच्या  दारी  जाऊन त्यांना दिलासा देत  आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
        मोतिबिंदु मुक्त महाराष्ट्र अभियानं हे  राज्य शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमापैकी  एक अभियान 1 डिसेंबर 2017 ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत  राबविण्याचा संकल्प करण्यात आला होता. या अंतर्गत राज्यात  एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत  लातूर जिल्हयाने 6 हजार 24 नेत्रशस्त्रक्रिया करुन  उद्दिष्टाच्या 117 टक्के काम करुन  राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. व मोतिबिंदु मुक्त लातूर जिल्हयाकडे आपली वाटचाल सुरु आहे, निलंगेकर यांनी म्हंटले.
         मागील आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर येऊन या भागाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूरग्रस्तांना मदत करण्याच्या केलेल्या आवाहनाला दुष्काळी परिस्थिती असतानाही लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन सांगलीकरांना मदतीचा हात दिलेला आहे. त्याप्रमाणेच लातूर जिल्हा प्रशासनाने सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील पूरग्रस्त पदमाळे गाव संपूर्ण पुनर्वसनासाठी दत्तक घेतले आहे. लातूरला सन 2016 च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये रेल्वेने पाणी देऊन मैत्रीचा हात दिलेल्या सांगलीकरांचे या संकटाच्या काळात हे गाव पूर्णपणे पुनर्वसन करून दिले जाणार आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवक  म्हणून जे कोणी लातूरकर नागरिक जाण्यास इच्छुक असतील अशा नागरिकांनी स्वयंप्रेरणेने प्रशासनाकडे नाव नोंदणी करून  गावाच्या पुनर्वसनात सहभाग घ्यावा, असे आवाहन निलंगेकर यांनी केले.
          विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला लातूर जिल्हा सामाजीक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात चांगली  प्रगती  करीत आहे. ही  अत्यंत समाधानाची बाब असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी  ग्वाही  निलंगेकर यांनी देऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थित असलेले सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपीता, वीर पत्नी, जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची पालकमंत्री निलंगेकर यांनी भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
         अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यासह इतर अनेक महनीय नेत्यांना स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा दयावा लागला तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती दयावी लागली.त्या सर्व महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करुन त्यांच्याप्रती  निलंगेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच केंद्र शासनाने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याबद्दल लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त करून देशाची सामर्थ्यशाली राष्ट्राकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यानंतर परेड कमांडर पोलीस उप-अधिक्षक  सचिन सांगळे यांच्या समवेत त्यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड संचलन झाले, तसेच यावेळी विविध विभागांतील पुरस्कारांचे वितरण श्री निलंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री निलंगेकर यांनी स्वातंत्र्यसैनिक, वीर माता, वीर पिता व वीरपत्नी यांचा शाल श्रीफळ व मिठाई देऊन गौरव केला. कार्यक्रमाचा समारोप शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार वंजारी यांनी केले.

No comments:

Post a Comment