Followers

Friday 12 October 2018

मराठवाडयातील बेरोजगार तरुणांना रेल्वे बोगी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर



* पालकमंत्री यांच्या हस्ते कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ
* प्रकल्पातून पहिली बोगी 25 डिसेंबर 2018
* लातूरसाठी आजचा दिवस ऐतिहासिक

      लातूर,दि.12:- रेल्वे बोगी  कारखाना उभारणीच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज झालेला असून हा लातूर करांसाठी  ऐतिहासिक दिवस आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लातूर येथे या प्रकल्पाला पूरक लहान-मोठे  इतर उद्योग  उभा राहतील व  यातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती  होणार असल्याने  लातूरसह संपूर्ण  मराठवाडयातील  बेरोजगार  तरुणांना  रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पूर्नवसन  व माजी सैनिक कल्याणमंत्री  तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
        लातूर येथील नवीन एमआयडीसीच्या  जागेत  पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांच्या हस्ते रेल्वे बोगी कारखान्याच्या  उभारणी कामाचा शुभारंभ  विधीवत पूजा व मशीनरीचे पूजन करुन  झाला.  त्या प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड,  मुख्यमंत्री   यांचे प्रतिनिधी  अभिमन्यु पवार, आमदार सर्वश्री ॲड. त्र्यंबक भिसे, विनायक पाटील , विक्रम काळे, सुधाकर भालेराव, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, रेल्वे विकास  निगम लि.चे ग्रुप मॅनेंजर  एस.एस. मिश्रा, रेल्वे बोगी प्रकल्पाचे  व्यवस्थापक कृष्णा रेड्डी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,  एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, मध्य रेल्वे बोर्ड सहकार समिती सदस्य निजाम शेख गणेश हाके, रमेश कराड, आदिसह रेल्वे व प्रशासनातील  अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
     पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, लातूरचा हा रेल्वे बोगी  कारखाना रेल्वे विभागाने अत्यंत कमी वेळेत सुरु केलेला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामाचे  31 मार्च 2018 रोजी  रेल्वेमंत्री  पियूष गोयल व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते  भूमीपूजन झाले होते.  व आज नवरात्रीच्या शुभमूर्हतावर  या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने हा लातूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे त्यांनी सांगून हा प्रकल्प लातूर येथे  होण्यासाठी रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन  मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी म्हटले.
         हा कारखाना व या अनुषंगाने  येथे पूरक उद्योग  उभारणीसाठी दिनांक  3 नोव्हेंबर 2018 रोजी मा. रेल्वेमंत्री पियूष गोयल, उद्योजकांची  बैठक घेणार आहेत.  रेल्वे कारखाना व इतर  पूरक उद्योगामुळे  मोठया प्रमाणावर  रोजगार निर्मिती  होऊन लातूरसह मराठवाडयातील बेरोजगार  तरुणांना रोजगाराची  उपलब्ध्ता होऊन हया भागाचा आर्थिक विकासास मदत होणार  असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितले.
     शासनाकडून मराठवाडयात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून हा पहिलाच एवढा  मोठा प्रकल्प देण्यात आलेला आहे. हा प्रकल्प  केंद्र शासनाचा  की  प्रोजेक्ट असून  यावर   रेल्वेमंत्री स्वत: नियंत्रण ठेवणार असल्याने हया  प्रकल्पांतून  पहिली रेल्वे बोगी  25 डिसेंबर 2018 पर्यंत  बाहेर पडण्याचे  उदिष्ठ प्रकल्पांच्या गुत्तेदारांनी ठेवावे ,असे निलंगेकर यांनी सांगून हा प्रकल्प उभारणीसाठी रेल्वे विभाग, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
       मराठवाडयाला स्वातंत्र्य  मिळून  70 वर्षाचा कालावधी  झाला. परंतु शासनाकडून एवढा मोठा रोजगार निर्मिती  प्रकल्प  मराठवाडयात दिलेला नव्हता. या प्रकल्पातून  मोठया  प्रमाणावर रोजगार निर्मिती  होऊन मराठवाडयाच्या विकासाला  ही गती प्राप्त होईल, असे मत  निलंगेकर यांनी व्यक्त केले.
      या प्रकल्पांसाठी  जागा  उपलब्धतेबाबत  मा.मुख्यमंत्री  महोदयांचा जानेवारी 2018 मध्ये संदेश आला व  पुढील  30 दिवसात प्रशासनाने जमीन उपलब्ध्‍ करुन ‍दिली.  व हा प्रकल्प अधिक गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून  सर्वोतपरी सहकार्य देण्यात  येईल, असे जिल्हाधिकारी  जी.श्रीकांत यांनी सांगितले.
       हा रेल्वे बोगी प्रकल्प अत्यंत कमी  वेळेत  व  प्रत्यक्ष  कामास सुरुवात होत असून  नियोजीत  कालावधीत हा प्रकल्प  पूर्ण केला जाईल. तसेच हया कामांसाठी  राज्य शासन व स्थानिक  प्रशासनाने  केलेल्या  सहकार्याबद्दल गौरवोदृगार  काढून  श्री.मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले.
      प्रारंभी पालकमंत्री  निलंगेकर यांच्या हस्ते विधीवत पूजन तसेच मशीनरीचे  पूजन करुन रेल्वे बोगी कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. निलंगेकर ,खासदार गायकवाड, श्री. अभिमन्यु पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते या  परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.

No comments:

Post a Comment