Followers

Sunday 28 October 2018

अटल आरोग्य शिबीरांतर्गतच्या 7 हजार 400 रुग्णावरील शस्त्रक्रिया डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण कराव्यात-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर


                    
                  
* शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास शासनाकडून  100 कोटीचा निधी मंजूर

      लातूर,दि.27:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते दिनांक 7 ऑक्टोबर 2018 राजी  लातूर येथे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन झाले होते. या शिबीरात  एक लाख रुग्णांची  तपासणी करण्यात आली होती. या शिबीराच्या दुसऱ्या  टप्प्यात  एकूण  7 हजार 400 रुग्णांवर  शस्त्रक्रिया  करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु करुन माहे डिसेंबर 2018 अखेर पर्यंत  सर्व रुग्णांवर  मोफत शस्त्रक्रियाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश  कामगार कल्याण ,कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री  तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
       येथील शासकीय विश्रामगृहाच्या  सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत  पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, वैद्यकीय महाविद्यालयाचे  डीन डॉ. राजाराम पोवार, आरोग्य उपसंचालक डॉ. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. गिरीष ठाकूर वैद्यकीय  निवासी अधिकारी डॉ. माधव शिंदे अदि उपस्थित होते.
        पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की,  या 7 हजार 400 रुग्णांची  विभागणी  पाच तालुक्यातील  जिल्हा परिषदेच्या गट निहाय  करण्यात यावी. व त्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांनी  आप आपल्या गटातील  रुग्णांचे पालकत्व घेऊन  त्या रुग्णांना  वैद्यकीय  उपचार मिळाल्यानंतर  घरी पोहोचविण्याची  व्यवस्था करावी. तसेच  महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत  रुग्णांचा  सर्व खर्च  शासन करते. परंतु  या व्यतिरिक्त  जे रुग्ण्‍  असतील त्या रुग्णांचा सीटी स्कॅन व एम.आर. आय.  तपासणी खर्च शासकीय नियमाप्रमाणे  जो काही  होईल तो खर्च आपण स्वत: करणार असून  याकरिता  विशेष कार्य अधिकारी प्रसाद कुलकर्णी       (7020436783 ) व मनाळे  ( 8329527214 )  यांच्याशी आरोग्य यंत्रणेने संपर्क ठेवावा.असे त्यांनी सूचित केले.
        परंतु  कोणत्याही  रुग्णांकडून आरोग्य विभागाने एक ही  पैसा   उपचारासाठी घेता कामा नये याची दक्षता घ्यावी. या सर्व रुग्णांवर पुढील दोन महिन्यात  शस्त्रक्रिया  पूर्ण कराव्यात. रुग्णांवर शस्त्रक्रिया   व इतर औषधोपचार करताना  सर्व सामग्री व साहित्य दर्जेदार  वापरावे, असे ही  पालकमंत्री  निलंगेकर यांनी सांगितले.
        शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. पोवार यांनी अटल महाआरोग्य शिबीरांतर्गत  शस्त्रक्रिया  करण्यात येणाऱ्या  7 हजार  400 रुग्णांची  यादी महाविद्यालयाला प्राप्त झाली असून  यामध्ये  मेडिकल कॉलेजमध्ये  4 हजार  654  शस्त्रक्रिया , एमआयटी मेडिकल कॉलेज व रुग्णालय मध्ये  966, लॉयन्स हॉस्पीटल उदगीर 15 ,लाईफ केअर रुग्णालयात  13, विवेकानंद 15 व  लातूर जिल्हयाबाहेर मुंबई व पुणे येथे  74 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, अशी माहिती  त्यांनी  दिली. 
        लातूर शासकीय महाविद्यालय व  रुग्णालयात  अद्यावत आरोग्य सुविधा  पुरविण्यासाठी  महाविद्यालय प्रशासनाकडून  निधी मागणी  प्रस्ताव 32 कोटीचा  देण्यात आला होता. परंतु  पालकमंत्री यांच्या  पुढाकाराने या रुग्णालयास शासनाने अद्यावतीकरणासाठी  100 कोटीचा  निधी मंजूर केल्याची माहिती डॉ. पोवार यांनी दिली.
दुष्काळ आढावा :-
       यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्यांकडून जिल्हयातील  दुष्काळ  सदृष्य  परिस्थितीची   माहिती घेतली. व  पुढील काळात शासनाकडून दुष्काळावरील उपाय योजना राबविण्याची कार्यवाही  होईल. त्याकरिता  आपआपल्या  गटातील  लोकांशी संवाद साधावा, अशी सूचना  त्यांनी केली.
     दुष्काळ जाहीर  करण्याचा ट्रिगर-1 मध्ये लातूर मधील शिरुर अनंतपाळ  तालुक्याचा  समावेश असून  उर्वरित  इतर तालुके  ही ट्रिगर 2 व 3 मध्ये असू शकतात. त्यामुळे  जिल्हयातील सर्व नागरिकांना  दुष्काळ सदृष्य  परिस्थितीतील  उपाय योजनांचा  लाभ  मिळेल , असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. या करिता सर्व जिल्हा परिषद  सदस्यांनी  आपआपल्या  गटांतील  गावांमधील  दुष्काळ सदृष्य  परिस्थितीची अद्यावत  माहिती  ठेवून गटांतील  गावांशी संपर्क ठेवावा, असे  त्यांनी  सूचित केले.

No comments:

Post a Comment