Followers

Wednesday 10 October 2018

एसटी महामंडळ आणि औरंगाबाद महापालिकेत सामंजस्य करार औरंगाबाद शहरात लवकरच नागरिकांच्या सेवेत नवी शहर बस सेवा : दिवाकर रावते


औरंगाबाद, दि. १०: औरंगाबाद शहरवासीयांना शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी आता एसटी महामंडळ आणि महापालिका अर्थात औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ यांच्या सहयोगाने शहर बस सेवा लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे १०० मिडी बसची खरेदी करण्यात येणार आहे. शहरांतर्गत होणाऱ्या या प्रवासी वाहतूकीसाठी एसटी महामंडळ तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ यांच्या दरम्यान आज राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. याबाबत श्री.रावते यांनी सामंजस्य करारानंतर ही माहिती दिली. 
विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आणि औरंगाबाद महापालिका आयुक्त विनायक निपुण यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, उपायुक्त वर्षा ठाकूर आदींसह वरिष्ठ अधिकारी-पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळादरम्यान आज झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ १०० मिडी बसेस खरेदी करून एसटी महामंडळाला देणार आहे. त्याद्वारे एसटी महामंडळ औरंगाबाद शहरांतर्गत या बसेसची सेवा सुरु करण्यात आहे. या बसमध्ये 30 जणासाठी आसन व्यवस्था असेल याचा फायदा औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. शहर वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यास त्यामुळे मदत होणार असल्याचेही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी म्हणाले.
या सामंजस्य कराराअंतर्गत पहिल्या टप्यातील ५० मिडी बसेस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतील तर उर्वरित ५० बसेस पुढील वर्षी जानेवारी - फेब्रुवारी मध्ये प्राप्त होतील. एसटी महामंडळ आपल्या चालक - वाहकांमार्फत या बसेसची वाहतूक करणार आहे. मिळालेले उत्पन्न दररोजच्या दररोज थेट औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाकडे जमा करण्यात येईल. या वाहतूक व्यवस्थेत तिकीट दराची आकारणी व वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्याचे अधिकार औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाला असून एसटी महामंडळ त्यांना आवश्यक ती मदत करणार आहे. 
या सामंजस्य करारांतर्गत विविध मुद्यांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या १०० बसेससाठी महामंडळाच्या वतीने सुमारे 400 कर्मचाऱ्यांकडून बसेसची देखभाल व बसेसच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाला औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाकडून दरमहा निश्चित रक्कम भाडे स्वरूपात मिळणार आहे. वाहतुकीचे मार्ग ठरवणे तसेच त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे ही जबाबदारी औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास  महामंडळ पार पाडणार आहे.  अपंग व्यक्तीसाठी तिकीट दरात सवलत देण्यात आली आहे. वाहतुकीच्या बसेसचे तिकीट दर निश्चित करणे, त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याचे अधिकार औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाला असतील. त्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाने एसटी महामंडळाच्या तिकीट दर सूत्राचा वापर करणे अपेक्षित आहे. मार्गावरील बस थांब्यांची जागा निश्चित करणे व बस थांबे बांधणे ही जबाबदारी औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाकडे राहणार असल्याचे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.
आवश्यक तांत्रिक बाबींची पुर्तता करुन औरंगाबाद शहरवासीयांच्या सेवेत एसटी आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाची सिटी बस सेवा लवकरात लवकर दाखल करण्यात येणार असून तोपर्यंत शहरात सध्या कार्यरत असलेली एसटीची वाहतूक सेवा सुरु राहील, असेही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment