Followers

Tuesday, 16 October 2018

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचीसं संवेदना अपंग पुनर्वसन केंद्रास भेट, दिव्यांग मुलांना राज्यपाल यांच्या हस्ते विशेष साहित्याचे वाटप






     लातूर,दि.१६- येथील हरंगुळ (बु) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित संवेदना अपंग पुनर्वसन केंद्रास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर,प्रकल्प अध्यक्ष ॲड.जगन्नाथ चितोडे,सचिव सुरेश पाटील हे उपस्थित होते.
  जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी राज्यपाल चे.विद्यासागर राव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपाल यांनी काही दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच संस्थेच्या उपक्रमांची माहितीही घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नम्रता धिरज सोनवणे व मयुरी मनोज पाटील या दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी हरंगुळ ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष शेळके, हरंगुळ (बु) चे सरपंच सूर्यकांत सुडे, संवेदना अपंग पुर्नवसन प्रकल्पाचे समिती सदस्य  भूषण दाते, रत्नदीप बोटवे, सौ.सपना सारडा, डॉ. प्रदीप कुमार शहा,अजित नागावकर ,योगेश निटूरकर,जयप्रकाश रेड्डी तसेच संवेदना अपंग पुनर्वसन केंद्राचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग,पालक उपस्थित होते.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची विवेकानंद कॅन्सर रुग्णालयाला भेट




लातूर दि 16:-विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर व्दारे संचलित विवेकानंद कॅन्सर रुग्णालयाला मा. राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी भेट देऊन येथील कॅन्सर रोगांवरील उपचारासाठी असलेल्या अद्यावत मशनरीची पाहणी केली.
    यावेळी विवेकानंद हॉस्पिटल मध्ये असलेल्या कोबाल्ट व लिनियर एक्सीलेटर मशीनची माहिती  विवेकानंद फाउंडेशनच्या  अध्यक्षा डॉ. अरुणा देवधर  व डॉ.झंवर यांनी माननीय राज्यपाल यांना दिली.
   याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,खासदार डॉ सुनील गायकवाड,महापैर सुरेश पवार,जिल्हाधिकारी जी श्रीकांत, अशोक कुकडे,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे, उपविभागीय अधिकारी विकास माने, डॉ अनिल आंधोरीकर,डॉ ज्योत्स्ना कुकडे,डॉ दिलीप देशपांडे,डॉ कुलदीप शिरपूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. 

Monday, 15 October 2018

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे लातूर विमानतळावर स्वागत





       लातूर, दि. 16 :-  येथील विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी आगमन होताच पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींने स्वागत केले. विमानतळावर पोलीस दलाने राज्यपाल राव यांना मानवंदना दिली. 

Friday, 12 October 2018

मराठवाडयातील बेरोजगार तरुणांना रेल्वे बोगी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर



* पालकमंत्री यांच्या हस्ते कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ
* प्रकल्पातून पहिली बोगी 25 डिसेंबर 2018
* लातूरसाठी आजचा दिवस ऐतिहासिक

      लातूर,दि.12:- रेल्वे बोगी  कारखाना उभारणीच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज झालेला असून हा लातूर करांसाठी  ऐतिहासिक दिवस आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लातूर येथे या प्रकल्पाला पूरक लहान-मोठे  इतर उद्योग  उभा राहतील व  यातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती  होणार असल्याने  लातूरसह संपूर्ण  मराठवाडयातील  बेरोजगार  तरुणांना  रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पूर्नवसन  व माजी सैनिक कल्याणमंत्री  तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
        लातूर येथील नवीन एमआयडीसीच्या  जागेत  पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांच्या हस्ते रेल्वे बोगी कारखान्याच्या  उभारणी कामाचा शुभारंभ  विधीवत पूजा व मशीनरीचे पूजन करुन  झाला.  त्या प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड,  मुख्यमंत्री   यांचे प्रतिनिधी  अभिमन्यु पवार, आमदार सर्वश्री ॲड. त्र्यंबक भिसे, विनायक पाटील , विक्रम काळे, सुधाकर भालेराव, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, रेल्वे विकास  निगम लि.चे ग्रुप मॅनेंजर  एस.एस. मिश्रा, रेल्वे बोगी प्रकल्पाचे  व्यवस्थापक कृष्णा रेड्डी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,  एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, मध्य रेल्वे बोर्ड सहकार समिती सदस्य निजाम शेख गणेश हाके, रमेश कराड, आदिसह रेल्वे व प्रशासनातील  अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
     पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, लातूरचा हा रेल्वे बोगी  कारखाना रेल्वे विभागाने अत्यंत कमी वेळेत सुरु केलेला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामाचे  31 मार्च 2018 रोजी  रेल्वेमंत्री  पियूष गोयल व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते  भूमीपूजन झाले होते.  व आज नवरात्रीच्या शुभमूर्हतावर  या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने हा लातूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे त्यांनी सांगून हा प्रकल्प लातूर येथे  होण्यासाठी रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन  मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी म्हटले.
         हा कारखाना व या अनुषंगाने  येथे पूरक उद्योग  उभारणीसाठी दिनांक  3 नोव्हेंबर 2018 रोजी मा. रेल्वेमंत्री पियूष गोयल, उद्योजकांची  बैठक घेणार आहेत.  रेल्वे कारखाना व इतर  पूरक उद्योगामुळे  मोठया प्रमाणावर  रोजगार निर्मिती  होऊन लातूरसह मराठवाडयातील बेरोजगार  तरुणांना रोजगाराची  उपलब्ध्ता होऊन हया भागाचा आर्थिक विकासास मदत होणार  असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितले.
     शासनाकडून मराठवाडयात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून हा पहिलाच एवढा  मोठा प्रकल्प देण्यात आलेला आहे. हा प्रकल्प  केंद्र शासनाचा  की  प्रोजेक्ट असून  यावर   रेल्वेमंत्री स्वत: नियंत्रण ठेवणार असल्याने हया  प्रकल्पांतून  पहिली रेल्वे बोगी  25 डिसेंबर 2018 पर्यंत  बाहेर पडण्याचे  उदिष्ठ प्रकल्पांच्या गुत्तेदारांनी ठेवावे ,असे निलंगेकर यांनी सांगून हा प्रकल्प उभारणीसाठी रेल्वे विभाग, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
       मराठवाडयाला स्वातंत्र्य  मिळून  70 वर्षाचा कालावधी  झाला. परंतु शासनाकडून एवढा मोठा रोजगार निर्मिती  प्रकल्प  मराठवाडयात दिलेला नव्हता. या प्रकल्पातून  मोठया  प्रमाणावर रोजगार निर्मिती  होऊन मराठवाडयाच्या विकासाला  ही गती प्राप्त होईल, असे मत  निलंगेकर यांनी व्यक्त केले.
      या प्रकल्पांसाठी  जागा  उपलब्धतेबाबत  मा.मुख्यमंत्री  महोदयांचा जानेवारी 2018 मध्ये संदेश आला व  पुढील  30 दिवसात प्रशासनाने जमीन उपलब्ध्‍ करुन ‍दिली.  व हा प्रकल्प अधिक गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून  सर्वोतपरी सहकार्य देण्यात  येईल, असे जिल्हाधिकारी  जी.श्रीकांत यांनी सांगितले.
       हा रेल्वे बोगी प्रकल्प अत्यंत कमी  वेळेत  व  प्रत्यक्ष  कामास सुरुवात होत असून  नियोजीत  कालावधीत हा प्रकल्प  पूर्ण केला जाईल. तसेच हया कामांसाठी  राज्य शासन व स्थानिक  प्रशासनाने  केलेल्या  सहकार्याबद्दल गौरवोदृगार  काढून  श्री.मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले.
      प्रारंभी पालकमंत्री  निलंगेकर यांच्या हस्ते विधीवत पूजन तसेच मशीनरीचे  पूजन करुन रेल्वे बोगी कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. निलंगेकर ,खासदार गायकवाड, श्री. अभिमन्यु पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते या  परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.

Thursday, 11 October 2018

शेतमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या बाजार समित्यांवर कठोर कारवाई -सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख



      लातूर,दि.12:- राज्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतमाल  तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून  शासन मागील दोन वर्षापासून  सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु बाजार समित्या व व्यापारी यांचे संगनमत असल्याने बहुतांश बाजार समित्यांनी ही योजना सुरु केलेली नाही.  त्यामुळे शासन अशा सर्व बाजार समित्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे  निर्देश सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
       येथील शासकीय विश्रामगृहात लातूर विभाग आढावा बैठकीत सहकार मंत्री  देशमुख बोलत होते. यावेळी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक  एस.एस.देशमुख,  वखार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. गण, लातूरचे उपजिल्हा निबंधक  सामृत जाधव ,उस्मानाबादचे विश्वास देशमुख, बीडचे शिवाजी बडे व नांदेडचे प्रवीण फडणवीस, लातूर बाजार समितीचे सभापती  ललित शहा, पणन मंडळाच्या  विभागीय व्यवस्थापक शुभांगी गौंड, जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री.लटपटे, श्री. गणेश हाके, लातूर विभागातील लातूर , नांदेड, उस्मानाबाद व बीड जिल्हयातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, सचिव तसेच सहकार विभाग, पणन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
       शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना असून मुग, उडीद, व सोयाबीनचे भाव हंगामातच कोसळल्यावर हा माल तारण ठेवून  शेतकऱ्यांना 6 टक्के ईतक्या कमी दराने कर्ज रूपात पैसा उपलब्ध् होतो. व  एक-दोन महिन्यात हमीभाव  मिळाल्यास  त्यांना अधिकचा फायदा होऊन अर्थिक  बाजू बळकट होते. त्यामुळे ही योजना सर्व बाजार समितीचे सभापती व सचिव  यांनी प्रखर इच्छाशक्ती  व शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन प्रभावीपणे  अंमलबजावणी करावी, असे सहकारमंत्री  देशमुख यांनी  सांगितले. तसेच ही योजना  बाजार समित्यांनी   योग्य पध्दतीने  राबवावी या करिता त्या त्या भागातील सहकार विभागाच्या सहाय्यक उपनिबंधकांनी  त्या बाजार समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची सूचना ही त्यांनी केली.
        बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून  काम केले पाहीजे. याकरिता समित्यांनी लिलाव व आठवडी  बाजार या ठिकाणी जाऊन शेतमाल तारण योजनेचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले पाहिजे. व त्यांना  या योजनेत शेतमाल ठेवण्यास प्रवृत्त  केल्यास त्यांचा  लाभ शेतकऱ्यांना मिळेल व बाजार समितीचा उद्देश ही सफल होईल, असे श्री.देशमुख यंनी सांगून समित्यांना माल ठेवण्यासाठी गोडाऊन पणन मंडळ कडून तर माल खरेदीसाठी पैसा शासनाकडे उपलब्ध् केला जाणार असल्याने ही योजना अत्यंत कार्यक्षमपणे राबवून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळेल यासाठभ् प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.
       शेतमाल तारण योजनेतंर्गत्  सन 2018-19 साठी  लातूर विभागासाठी  2 लाख शेतकरी व 10 लाख क्विंटल शेतमाल  तारण ठेवण्याचे उदिष्ट  पणन मंडळाकडून  ठरविण्यात येत आहे.त्याबाबतचे योग्य नियोजन  राज्य पणन मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी  करुन प्रत्येक जिल्हयाला उदिष्ट वाटप करावे व  ते पूर्ण करण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.
     शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा  कमी भावाने शेतमाल विकू  नये. तसेच या भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केल्यास त्या व्यापारी व  आडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.यावर्षी सहकार  विभाग व बाजार समित्यांनी शेतमाल ठेवण्यासाठी गोदामांची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच हमीभाव खरेदी केंद्र ही गोदाम जवळ असलेल्या ठिकाणीच देण्यात येणार आहेत,असेही त्यांनी सांगितले. तसेच नाफेड यांनी  घेतलेली गोदामे ही लवकरच रिकामी होणार असल्याचे ही त्यांनी म्हटले.
      आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र व शेतकऱ्यांची  संख्या अत्यंत कमी  असून ही संख्या  अधिक पटीने  वाढविण्याची सूचना श्री. देशमुख यांनी केली. तसेच या अंतर्गत मागील वर्षीचे शेतकऱ्यांचे पेमेंट ही लवकरच देण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. ऑनलाईन नोंदणी बाबत पीक फेऱ्याची सात-बारा वर नोंदणी होत नाही. त्यामुळे  शेतमाल नोंदणी करतेवळेस  शेतकऱ्यास  अडचणी  निर्माण होत आहेत. याबाबत जिल्हा मार्केटींग  अधिकाऱ्यांनी  महसूल विभागाशी समन्वय ठेवून ही अडचण लवकर दूर करावी, अशी सूचना सहकार मंत्री देशमुख यांनी केली. ई-नाम योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी  शेतकरी, व्यापारी व आडते यांचे ही प्रबोधन झाले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
        बाजार समित्यांमध्ये अंतर्गत रस्ते , निर्माण करणे , दुरुस्ती, सभागृह दुरुस्ती  आदि कामांसाठी सहायक निबंधक ,जिल्हा उपनिबंधक यांच्या स्तरावर  अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री देशमुख यांनी दिली. तसेच बाजार समित्यांच्या या पुढील बैठकांना सहायक निबंधक अथवा त्यांचा प्रतिनिधी  उपस्थित राहणे बंधनकारक असून सलग दोन बैठकांना अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी ,असे त्यांनी सांगितले.
     यावेळी विभाग सहनिबंधक श्रीकांत  देशमुख यांनी पॉवर पाईंट व्दारे लातूर विभगाचे सादरीकरण केले.तर विशेष कार्यअधिकारी संतोष पाटील यांनी ही  यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करुन सहकार व पणन  कायदे व नियमांची माहिती दिली. बाजार समित्यांचे सभापती, सचिव  यांनी विविध योजनाबाबत समस्या मांडल्या.    
      यावेळी सहकार व पणनमंत्री देशमुख यांनी शेतमाल तारण योजना, आधारभत किंमत योजना, ई-नाम ,थेट खरेदी धोरण, गोदाम उपलब्धता आदि विषयांवर  सविस्तर मार्गदर्शनपर सूचना देऊन शासन राबवित असलेल्या शेतकरी हिताच्या योजनांमध्ये  सर्व बाजार समित्यांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

Wednesday, 10 October 2018

घटस्थापनेने श्रीतुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सव प्रारंभ

शारदीय नवरात्र महोत्सव-2018





            उस्मानाबाद, दि.10: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे गुरुवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी  सौ. भारती गमे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी  करण्यात आले.
            यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पूजेचा मान बाळकृष्ण व्यंकटराव कदम यांना मिळाला.यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या पत्नी सौ. भारती गमे यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात  आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा, शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. कुठलीही अडचण असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, अनेक भाविक वेगवेगळया भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी  या मार्गावरुन चालतांना काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी घटस्थापनेनंतर केले. त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात  भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. आज हजारो भाविकांनी श्रीभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळया गावातूनही अनेक युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येतानाचे चित्र दिसत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन,नगरपालिका,तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य,सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे यांच्यासह महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे,डॉ.सौ.रुपल गिरासे, मंदिर संस्थानचे तहसिलदार राहुल पाटील,सौ. सरस्वती पाटील, तुळजापूर तहसिलदार योगिता कोल्हे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी,सिध्देश्वर इंतुले उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक यावेळी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा-मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देष


औरंगाबाद, दि.10 (जिमाका) :- औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विभागातंर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांमध्ये डिसेंबरपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रगती झाली पाहिजे, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, मागेल त्याला शेततळे, पेयजल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आदी विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी कामांना प्राधान्य देऊन दिलेली कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आढावा बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, इम्तियाज जलील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद महसूल विभागात यावर्षी पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने युध्दपातळीवर काम करणे आवश्यक आहे. 1355 गावांपैकी 1335 गावांमध्ये 50 पैशांपैक्षा कमी आणेवारी आली आहे. जिल्ह्याभरात जवळपास 53 दिवस पावसाने खंड दिल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग लवकरात लवकर घेऊन त्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत करणे शक्य होईल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सुरू असलेली जिल्ह्यातील  10,205 घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन लाभार्थींना हक्काची घरे उपलब्ध करुन द्यावीत. शहरी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रात 10651 घरांचे उद्दिष्टे तथा शहरी क्षेत्रातील उद्दिष्टेही लवकरात लवकर पूर्ण करावे, पैठण शहरातील विणकाम करणाऱ्या महिलांकरीता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विशेष घरकुल तयार करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सुरू असलेली कामे तसेच ठरवून दिलेली उद्दिष्‍टे संबंधित विभागाने पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनास सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या बंधारे दुरूस्तीचे प्रस्ताव पूर्ण करुन अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावी, ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावीत याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे बसविणे तसेच नादुरूस्त दरवाज्यांची तातडीने दुरूस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यात जवळपास 2200 शेततळ्यांची उल्लेखनीय कामे झाली आहे. जिल्ह्यात 10208 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून  शेततळे योजनेत औरंगाबाद जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक शेततळे केलेला जिल्हा म्हणून राज्यात प्रथम आहे. या कामांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक करुन अशीच कामे इतर तालुक्यातही युध्दपातळीवर हाती घेऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, तसेच पोखरा निधी अंतर्गत अस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. जिल्ह्यात शेततळ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने फळबागा जिवंत राहण्यास मदत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विभागात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त्‍ शिवार योजनेची कामे हाती घेऊन ही कामे वर्षाअखेर पूर्ण करावीत. या कामांचा डॉ.बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच सामाजिक कार्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून आर्थिक व सामाजिक परिणाम याबाबतचा सर्वे करण्यात यावा आणि त्याचा अहवाल शासनास सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरींची 1351 कामे पूर्ण झाली आहे. अपूर्ण असलेली तसेव नवीन सर्व कामे लवकरात लवकर करुन मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची उद्दिष्टे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आदींची माहिती घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेतील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. मुद्रा कर्ज योजनेतील उद्दिष्ट पूर्तता करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.  ग्रामसडक योजनेअंतर्गत 2015 ते 2018 या वर्षात 760 कि.मी. ची उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी 560 कि.मी. रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली.
विविध विकासकामांमध्ये पिछाडीवर असलेल्या तालुक्यांनी गती घेऊन दुष्काळी परिस्थितीचा उपयोग घेऊन गाळयुक्त्‍ शिवार, जलयुक्त शिवार, शेततळी, ग्रामसडक योजना, आदी महत्वाकांक्षी योजनांची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन दुष्काळी परिस्थितीत लोकांना काम मिळेल याकडेही लक्ष द्यावे. डिसेंबर-2018 मध्ये पुन्हा विकास कामांच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार आहे, तोपर्यंत विकास कामांना गती देऊन परिस्थिती सुधारली पाहिजे असे निर्देष मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.