Followers

Thursday, 19 October 2023

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी




प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन.

महाराष्ट्राच्या संकल्पनेचे कौतुक, संधी-प्रशिक्षणांची सांगड महत्वपूर्ण

कौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबई, दि. १९:-  कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.


या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच राज्यभरातील ग्रामीण भागातील या कौशल्य विकास केंद्रांच्या ठिकाणी त्या-त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत महसूल विभागातील विभागीय महसूल अधिकारी, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठाधिकारी, केंद्रांचे समन्वयक तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही केंद्र दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्य समारंभास जोडण्यात आली होती. 


नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु असल्याचा उल्लेख करत आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा देतानाच पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, आईला आपल्या मुलाच्या सुख आणि यशाची काळजी असते. अशा या पवित्र काळात आपण युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने आगळी संकल्पना सुरु करत आहोत. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात नवी पहाट उदयास येईल. कारण जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगभरातील १६ देशांमध्ये ४० लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. अशा कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 


बांधकाम, आधुनिक शेती तसेच मनोरंजन – माध्यम क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या संधीचा उल्लेख करून पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील या कौशल्य विकास केंद्रांतून 

विदेशात संधी आजमावू शकणाऱ्या तरुणांना काही सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देणेही उचित ठरेल. गत काळात कौशल्य विकास हा विषयच गांभीर्याने घेतला गेला नव्हता. त्यामुळे क्षमता आणि संधी असूनही युवकांना प्रशिक्षणाअभावी नुकसानच सहन करावे लागले. आता मात्र आपण कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे. कोट्यवधी तरुणांना पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. आजही ग्रामीण भागात कित्येक कारागिर कुटुंबात पारंपरिक ज्ञानाचा पुढे वारसा सोपवला जातो. त्यांना पाठबळाची, आधाराची गरज असते. त्यादृष्टीने आपण विश्वकर्मा श्रम सन्मान योजना राबवू लागलो आहोत. त्यांना आधुनिक उपकरणे आणि चांगले प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्रातील ही ५११ केंद्र या विश्वकर्मा योजनेला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.


यावेळी भाषणात पंतप्रधान श्री. मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या औद्योगिकरणाबाबतच्या विचारांचाही तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक बंधनांना झुगारून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, कौशल्य विकास आणि अशा प्रक्षिणातूनच दलित, वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रतिष्ठापुर्वक, सन्मानाने जगण्याची संधी मिळते. त्यामुळे याच घटकांना या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. आता ड्रोनद्वारेही आधुनिक शेती करता येता. यात आपल्या महिला भगिनींनाही संधी आहे. त्यांनाही या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, इंडस्ट्री फोऱ प्वाईंट ओ, सेवा क्षेत्र, नैसर्गिक शेती, कृषी औद्योगिक आणि या क्षेत्रातील मुल्यवर्धन साखळी, पॅकेजिंग अशा क्षेंत्रातील संधीचाही पंतप्रधान श्री. मोदी यांनी उल्लेख करून या क्षेत्रातील प्रशिक्षण युवकांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुले करतील असा विश्वास व्यक्त केला.


 

कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील ऊर्जावान युवाशक्तीची क्षमता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, युवा शक्ती मोठे संसाधन आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केले होते. गेल्या सहा वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. देशात गत नऊ वर्षात पाच हजार नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – आयटीआय सुरु करण्यात आली. यातून चार लाख उमेदवारांना प्रशिक्षण मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा ही क्रांतिकारी योजना सुरू करून पारंपारिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आपण राज्याच्या अर्थसंकल्पात देखील ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात अशी केंद्रे सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार युद्ध पातळीवर यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा आराखडा तयार केला. प्रत्येक केंद्रातून १०० उमेदवार असे प्रत्येक वर्षी सुमारे ५० हजार कुशल उमेदवार तयार होतील. आपण बेरोजगारांची फौज असे नेहमी म्हणतो... पण ही आमची कुशल फौज असणार आहे. जे उद्याच्या महाराष्ट्रात सन्मानानं नोकरी व्यवसाय करीत असतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याच्या तळागाळात, ग्रामीण भागात, खेड्यातल्या युवकांचा कौशल्य विकास होईल. यात ३० टक्के महिला असतील. ग्रामीण भागातील कारागीरांना सुद्धा आणखी चांगले प्रशिक्षण मिळेल. आपण आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन वाढवून ५०० रुपये इतके केले आहे. बारावीनंतर १५ हजार उमेदवारांच्या रोजगार व शिक्षण-प्रशिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत करार केला आहे. स्टार्ट अप्सना विविध पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील आयटीआयमध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूम्स सुरु केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बारा हजाराहून अधिक नवीन उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना कर्ज दिल्याचे उल्लेख करून, ही प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे बनतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडे आधुनिकतेची दूरदृष्टी होती याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यात २९० रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्याद्वारे १ लाख ४० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत राहील, असेही ते म्हणाले.


पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू – उपमुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारत महाशक्ती होण्यासाठी बदलत्या काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातदेखील कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाणे  गरजेचे आहे.प्रधानमंत्री यांनी कौशल्य विकासाचे जे काम सुरू केले आहे त्याचे चांगले परिणाम संपूर्ण भारतभर दिसत आहेत. माननीय पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने ही गरज ओळखून देशात कौशल्य विकास अभियान सुरू झाले आहे.  विश्वकर्मा योजना की त्याचाच पुढील टप्पा आहे. भारत ही जगातील  सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून नावा रूपाला आलेली आहे आणि त्यातूनही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपला देश अशाच प्रकारे प्रगती करत राहिला तर जगातील मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून लवकरच आपण झेप घेवू.५११  प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू झाली आहेत. इथेच आपण थांबणार नसून राज्यात आगामी काळात ही संख्या नक्कीच वाढवून  पाच हजार पर्यंत नेवू. पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू, असे ही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.


कौशल्य विकास केंद्रांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात रोजगार क्रांती – उपमुख्यमंत्री पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,राज्यात सुरू झालेली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही राज्याच्या विकासाला चालना देणारी ठरतील.ग्रामीण भागातील ही कौशल्य विकास केंद्र ग्रामीण रोजगारामध्ये क्रांती घडवून आणतील. या केंद्रामध्ये आधुनिक युगाला आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे  अत्यंत गोष्ट आहे.या केंद्राच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या विकासाला चालना देणारी ठरेल. पी.एम.विश्वकर्मा योजना ही राज्यातील ग्रामीण कारागिरांना आपल्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.देशाला महासत्ता बनवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना महाराष्ट्र राज्य आपल्याला सदैव आपल्या पाठीशी आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


केंद्र युवकांसाठी उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार – मंत्री लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा  म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला  प्राधान्य दिले असून  हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य देखील राज्यातील प्रत्येक गावागावात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी  प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये जी ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र होणार आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाला पूरक असणाऱ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचबरोबर जागतिक स्तरावर लागणाऱ्या योग्यतेचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. गावातून कोणत्याही व्यक्तीला रोजगारासाठी शहराकडे येण्याची गरज यामुळे भासणार नाही अशा प्रकारे नव्याने उभारलेल्या कौशल्य विकास केंद्रे राज्याच्या विकासासाठी आणि गावांना सक्षम करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.



सुरवातीला भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते कळ दाबून प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी सुत्रसंचालन केले. कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी आभार मानले.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राविषयी...

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन राज्यातील ३५० तालुक्यांमधील ५११ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ५११ केंद्र. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मिळणार. कृषिपूरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण. पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्र उपयुक्त ठरणार. या केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल.

अल्प कालावधीत (साधारणत: ३ महिने) पूर्ण होवू शकणारे (किमान २०० व कमाल ६०० तास प्रशिक्षणाचा कालावधी)  अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल.

प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात वर्ष २०२३-२४ करिता एकूण १०० उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान ३०% महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. या केंद्रातून दरवर्षी सुमारे ५० हजार  युवक-युवतीं कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होतील.

0000

श्री.तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा

                  


शारदीय नवरात्र महोत्सव - 2023

धाराशिव, शारदीय नवरात्र महोत्सवात आज 19 ऑक्टोबर रोजी गुरुवारी पाचव्या माळेच्या दिवशी श्री.तुळजाभवानी देवीची ललित पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री.तुळजाभवानी देवीचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.

               श्री. तुळजाभवानी देवीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री.देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. 

                   दररोज नियमित श्री. तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.उद्या 20 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 21 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 22 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.    ‌       तत्पूर्वी,काल 18 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री 10 वाजता चौथ्या माळेच्या दिवशी श्री.देवीजींची छबिना मिरवणूक गरुड वाहनावरुन काढण्यात आली.


                        ****

Wednesday, 18 October 2023

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा


धाराशिव, तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज चौथ्या माळेच्या दिवशी श्री. तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री.भवानी मातेस दिला.याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                  

दररोज नियमित श्री.तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.१९ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा,२० ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. 

तत्पूर्वी काल (मंगळवार) रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला.त्यानंतर धूप आरती करण्यात आली.रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.प्रक्शाळ पूजा झाली. 


                         ***





Monday, 16 October 2023

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

 

शारदीय नवरात्र महोत्सव-2023

 




धाराशिव, दि. 16 : (जिमाका)  तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली.शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. 

        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली.त्यानंतर आरती झाली.यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.श्री तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. 18 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, 19 ऑक्टोबर रोजी ललीत पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, 20 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 21 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 20 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.

तत्पूर्वी,काल (रविवार ) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक अश्व वाहनातून काढण्यात आली.

Sunday, 15 October 2023

शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ श्री. तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

            





धाराशिव, दि.15 (जिमाका) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारपासून तुळजापूर येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री.तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री.तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज सपत्निक विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोपच्चाराने तसेच आई तुळजाभवानी उदो-उदोच्या जयघोषात पारंपारिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.

                 घट कलशांची पारंपारिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तीर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.shrituljabhavani.org ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सुलभ दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी श्री.तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन)सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, धार्मिक अधिकारी श्री.काटकर महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, चिलोजी बुवा, डॉ. अक्षय पाटील तसेच पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

****

Saturday, 16 September 2023

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 





·       राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

·       लातूर, परभणीतील नाट्यगृहे लवकरच पूर्ण होणार

औरंगाबाद :  महाराष्ट्राला उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  त्याच अनुषंगाने छत्रपती शिवरायांची वाघनखे लवकरच राज्यात दाखल होतील. त्याचबरोबर विकीपिडियाशी सांमजस्य करार करून जगभरातील ३०० भाषेत राज्याच्या सांस्कृतिक वारशांची माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ऑनलाइन पोर्टलचाही आधार घेऊन राज्याचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील लातूर, परभणी येथील नाट्यगृहे लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तापडिया नाट्य मंदिरात ‘नाट्य गौरव’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील जीर्ण झालेल्या नाट्यगृहांना नवसंजिवनी देण्याचे काम शासन करत आहे. सांस्कृतिक कार्याचे, विचारांचे अदान-प्रदान व्हावे यासाठी राज्यात नवीन ७५ ठिकाणी तालुका पातळीवर सांस्कृतिक नाट्यगृह उभारण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे नियोजन आहे. संचालनालयाने विविध पुरस्कारांच्या रकमांमध्ये देखील भरीव प्रमाणात वाढ केली आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. आगामी काळात महाराष्ट्राची कला, सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचावा यासाठी ‘ॲमेझॉन’ या ॲपप्रमाणे सांस्कृतिक पोर्टलची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशासह परदेशात महाराष्ट्राची परंपरा पोहोचविण्याचा सांस्कृतिक संचालनालयाचा मानस आहे. लवकरच जपानमध्येही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर करणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

प्रधान सचिव श्री. खारगे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी सांस्कृतिक विभागाकडून उद्योन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देणे, राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे आयोजन करणे, नाट्यक्षेत्रासाठी अधिकाधिक भरीव काम करणे, हौशी, व्यावसायिक नाट्यकर्मी, कलावंतांना  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संचालनालय पुढाकार घेत असल्याचे श्री. खारगे म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. मान्यवरांनी स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित केले. प्रहसन, गणेश वंदन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमात रंगत आणली. ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रॉबिनहुड-क्रांतीवीर दत्तोबा भोसले’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. राज्य्भरातील नाट्यस्पर्धेतील विजेते संघ, नाट्यकर्मी, संगीत दिग्दर्शक, नाट्य लेखक, दिग्दर्शक आदींची कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती

छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण


             




छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

            यावेळी छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग आणि धाराशिव जिल्हातालुकागाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.