विशेष लेख :
Followers
Thursday, 13 February 2025
70 वर्षांनी दिल्लीत रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा, होणार मराठी भाषेचा जागर!
अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलनाची स्थिती-गती
दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त विशेष लेख
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात तिथे वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांनी केवळ मराठी वरची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी 2025 मध्ये हे अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन दिनांक 21, 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केले आहे. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी भाषा प्रेमिकांचे अभिनंदन केले पाहिजे, स्वागत केले पाहिजे.
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होताच दिल्लीकरांनी
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. योगायोगाची एक गोष्ट अशी की, यावेळी
संमेलनाध्यक्ष श्रीमती डॉ. तारा भवाळकर आहेत, तर उद्घाटक म्हणून भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पहिला प्रसंग असा की, 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य
मिळाले. तेव्हा दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांनी अखिल भारतीय मराठी संमेलन
आयोजित केले होते. 1954 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाच-सहा वर्षानंतर संमेलन
घेतले तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री संमेलन अध्यक्ष होते, तर तत्कालीन पंतप्रधान
स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू उद्घाटक या नात्याने उपस्थित होते. भाषेच्या गौरवार्थ
उत्सव साजरा करण्याचे श्रेय महाराष्ट्रातील पण तिथे वास्तव्य करणाऱ्यांकडे जाते. इतर कोणत्याही भाषा प्रेमिकांनी असा भाषा
गौरव आयोजित केल्याचे आठवत नाही, वाचनात नाही. 1960 मध्ये महाराष्ट्र मराठी भाषिकांचा
प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. मराठी भाषेचा गौरव, उत्सव महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व
काळापासून होत असत. शेकडो वर्षांपासून हिंदी, इंग्रजी, फारशी, उर्दू इत्यादी भाषांची
मराठी भाषेवर आक्रमणं होत राहिली. त्या त्या भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाली.
अर्थात हे भाषेचे अवजारे आहेत. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यासाठी चळवळी उभ्या राहिल्या.
अंदाजे 1954 ते पुढील तीन-चार वर्ष भाषा शुद्धीकरणाचा एक प्रयोग स्वातंत्र्यवीर विनायक
दामोदर सावरकरांनी केला. मराठीत सहज आलेल्या 500 शब्दांना त्यांनी मराठीतील नावे दिली,
जसे हेअर कटिंगसाठी केशकर्तनालय, मेयरसाठी महापौर इत्यादी. महाराष्ट्राने मराठी भाषेकडे
दुर्लक्ष केले नाही. मागील अनेक शतकांपासून भाषा जोपासली. बाराव्या शतकात श्री चक्रधरांनी
मराठीतून पंथ प्रसार केला. मराठीतून ग्रंथरचना केली. श्री संत ज्ञानेश्वर यांनी मराठीला
प्रमाण मानले. शिवछत्रपतींनी राज्य व्यवहार कोश मराठीतून लिहिला. खरे तर आठव्या शतकापासूनचे पुरावे उपलब्ध
आहेत. भाषा शुद्धी भाषा मूल्य भाषा संशोधकांच्या अनेक पिढ्या केवळ मराठी संबंधाने संशोधनात
गुंतलेल्या आहेत. ही परंपरा श्री. म. माटे ते
श्री गणेश देवी पर्यंत आहे.
भाषा संदर्भात भाषेची गोडी लावण्यासाठी सुलेखन वर्ग,
बालवाचक मिळावे, भाषण स्पर्धा, ग्रंथालयांची भूमिका नवी प्रेरणा देण्यात उपयुक्त ठरेल.
निबंध लेखन, आवडलेल्या पुस्तकाचा सारांश, परिसंवाद, पुस्तक सहवास, व्याकरण, शुद्धलेखन
यासारखे उपक्रम प्रत्येक म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळातून सुद्धा राबविले पाहिजे.
प्रमाण भाषेचे सौंदर्य लेणं ठरणाऱ्या बोलीभाषांचे जतन आणि समर्थन करण्यासाठी शासन स्तरावर
प्रयत्नांची गरज आहे. सर्व स्तरावर जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले पाहिजे. खूप काही मुलांच्या
सहज लक्ष देऊ शकते, प्रयत्न हवेत. शेवटी मराठी आपली माय मराठी आहे. मातृभाषा आहे.
-
अशोक अर्धापूरकर, अध्यक्ष- मराठवाडा साहित्य परिषद- शाखा हिंगोली
अंतुले
नगर, हिंगोली, मो.9689233324
Wednesday, 18 December 2024
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
Ø नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान
Ø आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त
नागपूर : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्यावतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.
श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.
००००००
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
नागपूर: राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. 'गो टेन' अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.
आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे, पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.
संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा), आपले सरकार, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई वाहतूक पोलीस, एनजेडीजी | राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड, देशाच्या सेवेत भारतीय पोलीस, राष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टल, ई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Sunday, 13 October 2024
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना
नांदेड : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
आज नांदेड येथील नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातील नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या निवडक सन्मानार्थी लाभार्थ्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया...
“मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने”मुळे मुलीच्या पंखांना बळ
नांदेड जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय, ग्रामीण येथे बीएडच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली कविता मोकळे विद्यार्थिनी सांगते की, पूर्वी मुलींना उच्च शिक्षणात 50 टक्के फी माफ होती. असे असूनही राहिलेली 50 टक्के फी भरणेही माझ्या शेतकरी आई वडिलांसाठी मोठे अडचणीचे होते. परंतू आत्ता शासनाने मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी माफ करून मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना सुरू केली. त्यामुळे मला आत्ता माझे शिक्षण पूर्ण करता येणार असून शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
या योजनेची लाभार्थी म्हणून माझा व माझ्या सहकारी विद्यार्थिनींचा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सन्मानही झाला, हा सन्मान माझ्यासाठी खूप अविश्वसनीय आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फी माफ केल्याने कुटुंबातही मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शासनाने मुलींना उच्च शिक्षण घेऊन आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण केल्याची भावना ही कविताने बोलून दाखविली.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातूनदि व्यांगही स्वतः च्या पायावर उभे
राज्यात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतून उच्च शिक्षित तरुणांना रोजगार मिळत आहे. त्यातही नांदेड येथील आर.आर. मालपाणी मतिमंद आणि मूकबधीर विद्यालय व किनवट सारख्या आदिवासी भागातील निवासी मूकबधीर विद्यालयातील संगणक तज्ञ, आयटीआय, डीएड विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार विशेष आहे.
कारण मालपाणी विद्यालयातील अभिषेक शेळके, समिउल्ला खान आसर पठाण, प्रदीप लोंढे तर निवासी मूकबधीर विद्यालयातील अक्षय तकलवार हे विद्यार्थी कर्णबधीर, मूकबधीर असले तरी त्यांना आपल्या ज्ञानाच्या जोरावर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगाराची संधी मिळाली आहे. याआधी त्यांना कुठलाच रोजगार नव्हता, त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयाचे प्राचार्य नितीन निर्मल यांनी शासनाचे आभार मानले आहे.
श्री.निर्मल यांच्या प्रतिक्रियेचे द्विभाषिक शिक्षक साईनाथ इप्तेकर यांनी मुलांच्या भाषेत भाषांतरित करूनही सांगितले. रोजगार मिळाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आदिवासी पाड्यावरील महिला झाल्या आर्थिक सक्षम
किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तिनगर येथील पाड्यावर राहणाऱ्या जिजाबाई धुरवे व शशिकला आत्राम या 50 वर्षावरील वयाच्या आदिवासी महिलांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. शेती आणि पशूपालन करणाऱ्या, स्वतःचे अर्जही भरता न येणाऱ्या या महिलांचे अंगणवाडी पर्यवेक्षिका चंद्रकला पोले यांनी परिपूर्ण अर्ज सादर केल्याने आजपर्यत 7 हजार 500 रू. चा लाभ त्यांना मिळाला आणि इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्तेही सन्मान होत असल्याने आनंद होत असल्याचे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले.
बचत गटातील महिला आर्थिक मदतीतून स्वयंपूर्ण
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बँकेमार्फत 10 महिला असलेल्या आम्रपाली बचत गटास सात लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून आम्ही बांधकाम साहित्य विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून आम्हाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते आमचा सन्मानही झाला असून आम्हाला खूप आनंद होत असल्याच्या भावना आम्रपाली बचत गटातील लक्ष्मी धडेकर, चंद्रकला धडेकर यांनी व्यक्त केल्या.
लाडाची योजना लेक लाडकी
महिलांचे सक्षमीकरण करण्याचा मुख्य पाया म्हणजे मुलींच्या जन्मापासून त्यांचे आरोग्य, पोषण यांची काळजी घेणे. यासाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना गरीब कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. नांदेड येथील पौर्णिमा दापशेंडे यांना 10 महिन्यापूर्वी मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रूपयांचे अनुदान व बेबी किट चा लाभ देण्यात आला. तसेच संघमित्रा कांबळे यांनाही एक वर्षापूर्वी मुलीच्या जन्मावेळी पाच हजार रूपये व बेबी किट चा लाभ देण्यात आला. मुलींच्या जन्मावेळी लेक लाडकी योजनेचा लाभ मिळाल्याने मुलींची चांगल्या पध्दतीने काळजी घेता आली, असे त्यांनी यावेळी सांगत शासनाचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्या सर्वांनी शासनाचे आभार मानले.
****
मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन
नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला नुकतीच राज्य मान्यता दिली आहे.
या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. यावेळी लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे.
यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदी उपस्थित होते.
0000




.jpeg)
.jpeg)












