Followers

Sunday, 13 October 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामे व प्रकल्पांचे भूमिपूजन

 





नांदेड- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहून भूमिपूजन केले.


 याप्रसंगी कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.


यामध्ये हनुमान गड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण. कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन. पावडे वाडी नाका परिसरातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन.


  नांदेड येथील वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे तसेच परिचारिका वसतिगृहाचे भूमीपूजन. पिपल्स व सायन्स कॉलेज परिसरातील कै. नरहर कुरूंदकर यांचे नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपूजन. यासह लेबर कॉलनीतील पाणी पुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणाचे भूमीपूजन यासह शहरातील शेतकरी चौक, तरोडा नाका येथे विविध रस्त्यांसाठी भूसंपादनासह सुधारणा आदी कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले.

महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे





• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार

• महिलांच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध 

• नवा मोंढा मैदानावर महिला सक्षमीकरणाचा शानदार सोहळा 

नांदेड : राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपर हिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही  त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला. 

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,  नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्यवतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रशासनाच्यावतीने स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.   

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील दहा लाख भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन सुरु केलेली ही योजना आहे. आता महिनाभरात भाऊबीज पण येईल. आमची भगिनींसाठी ही ओवाळणी थांबणार नाही. ती सतत सुरूच राहीन. योजना सुरु होऊन तीन महिने झालेत, जवळपास 2 कोटी 30 लाख भगिनींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने 33 हजार कोटींची तरतूद केली आहे. तर 17 हजार कोटी रूपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर 2024 या दोन महिन्यांचे आगाऊ हप्तेही खात्यात जमा केले आहेत. सध्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रूपये जमा होताहेत. तर यापुढे यामध्ये योजनेच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे प्रत्येक महिलेला अधिक आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. छोटा, मोठा व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा पाठिंबा महिलांना मिळणार आहे. काही महिला या दिशेने पुढेही जात आहेत, त्याचे समाधान आहे. या महिला लखपती दिदी झाल्याचे पाहायचे आहे, असा आशावादही  मुख्यमंत्री यांनी व्यक्त करत महिलांना प्रेरित केले. आर्थिक सक्षम महिला या ध्येयाबरोबरच सुरक्षित महिला यालाही शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात 50 टक्के सवलतीचा लाभही देण्यात येत आहे. या योजनांबरोबरच सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनाही सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गान सम्राज्ञी आशाताई भोसले यांनीही या योजनेचे कौतुक करत सरकारचे अभिनंदन केले आहे, हे विशेष. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत ‘शासन आपल्या दारी’सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पाच कोटी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून अतिशय समाधान होत आहे. बहिणींच्या डोळ्यातील आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळते. 

तत्पूर्वी आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळातवेळ काढून दोनवेळा पुढे ढकलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली याबद्दल आभार व्यक्त केले. त्यासोबतच मोठ्याप्रमाणात विकासासाठी निधी दिल्याबद्दलही आभार व्यक्त केले. राजर्षी पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. महिलांच्या आयुष्यात या नव्या आर्थिक क्रांतीने भर घातल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय येथे 200 हून 500 खाटांची संख्या वाढवून श्रेणी वाढ केल्याबद्दल तसेच नरहर कुरूंदकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

महाराष्ट्र अव्वल

लाडक्या बहिणीला रक्कम दिली, मग लाडक्या भावांचे काय ? असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता.  तर भावांसाठीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार प्रशिक्षण भत्ता देऊन प्रशिक्षण योजना आपण राबवली, अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी काढले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियानासह इतर योजनांच्या महिला, युवा, ज्येष्ठ लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत  यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

 प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी *अभिजित* राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  सूत्रसंचालन स्म‍िता मोहरीर यांनी केले. आभार शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

गोमातांचे पूजन, ‘खेळ पैठणी’ची रंगत

राज्यमाता म्हणून नुकताच गायीला सन्मान राज्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी या प्रजातीच्या गोमातांचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील कला, गितांनी कार्यक्रमाने रंगत आणली. तसेच उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा’ हा प्रश्न मंजुषा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला बरोबर उत्तर देणाऱ्या प्रत्येक विजेत्या महिलेस मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.


Friday, 20 September 2024

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 





·         वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

·         अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन

·         राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन

·         पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ

·         ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ

 

वर्धादि.20 (जिमाका) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच सप्लाय चेनसारख्या व्यवस्थेचा भाग व्हावेअशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय मंत्री जीतन राम मांझीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरीराष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीरवनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतकौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळतेअसे सांगून प्रधानमंत्री म्हणालेविश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योगशिल्पकलाधातूविज्ञानअभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मानसामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणालेदेशातील सातशेहून अधिक जिल्हेअडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच सप्लाय चेनसारख्या व्यवस्थेचा भाग व्हावेअशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणालेदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबरफायबर टू फॅब्रिकफॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदासोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहेअसे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्वाची

-          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील गरीबवंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेअमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय लघुसुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले कीपीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले.

देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून  कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाहीपरंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पूर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईलअसा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कारागिरांना प्रमाणपत्रधनादेशाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्कराज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघुसुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेडॉ.पंकज भोयरदादाराव केचेसमीर कुणावारमाजी खासदार रामदास तडसप्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकरजिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

Saturday, 14 September 2024

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती

 






बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

•        मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार

•        लाडक्या बहिणींना ३० सप्टेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार

•        कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार

•         शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध

धाराशिव, : मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे.त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.परंडा येथे आज महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले,महिला सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेवून राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे.लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या इतरही योजना यापुढेही सुरु राहतील. लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे असे सांगून या योजनांसाठी निधीची तरतूदही शासनाने केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.तसेच भविष्यात या योजनेचा लाभ टप्प्या-टप्प्याने वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे.गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने दीड हजार रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे, हे अनेकांना माहित नाही.नुकतेच माझी भेट झाल्यानंतर प्रणाली बारड या बहिणीने मला सांगितले की, दीड हजार रुपयातून तिने घुंगरू कडीचा व्यवसाय सुरु केला.गौरी गणपतीच्या सणात तिला या व्यवसायातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.याच प्रकारे इतरही भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे आपापल्या परीने विविध व्यवसायात गुंतविले आहे. त्यातून त्यांच्या व्यवसायाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर तोट्यातील एसटी महामंडळ नफ्यात आले. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेही राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान न होता चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना एका वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेवून त्यांच्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे.मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत तिच्या बँक खात्यात टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून त्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणार्थींना राज्य शासन दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन देणार आहे.अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध

शेतकऱ्यांसाठीही राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करून देशात पहिल्यांदाच राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.यासोबतच शेतकऱ्यांना केवळ एक रुपये विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ दिला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात शुल्क रद्द करण्याचा आणि खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला दर मिळण्यास मदत होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले.

उजनी धरणातून सीना-कोळेगाव प्रकल्पात पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी येत्या पंधरा दिवसात बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून गेल्या तीस वर्षांपासून प्रतीक्षा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षात नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा लेखाजोखा मांडला. गतवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकऱ्यांना पुरविलेल्या आरोग्य सुविधांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. याशिवाय आरोग्य विभागाने राबविलेल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि जागरूक पालक सुरक्षित बालक या अभियानांमुळे राज्यातील मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील १२ कोटी ६५ लाखापेक्षा अधिक नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून जवळपास साडेअकरा हजार युवक-युवतींना नोकरी दिली आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून याद्वारे अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्यांची कार्यवाही केल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह इतर योजनांच्या महिला लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि निवड पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पारंपारिक वेशभूषेत आलेल्या सिंधू पवार आणि पूजा पवार या बंजारा समाजातील भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.

प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. तसेच काही महिलांनी त्यांच्यासोबत मोबाईलवर सेल्फी घेण्याचा आग्रह केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिलांच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून देत आपल्या लाडक्या बहिणींचा मान राखला. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि पालकमंत्री डॉ. सावंत यांनी लाडक्या बहिणींवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ, श्री विठ्ठल मूर्ती, वीणा व घोंगडी देवून यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या हिबारे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले.आभार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

                      

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद







योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण !

 एकाच छताखाली विविध योजनांची माहिती

धाराशिव : केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली. दालनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांनी या ठिकाणी जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या दालनांमधून महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जल जीवन मिशन आदी विभागाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती संबंधित नागरिकांना अधिकारी, कर्मचारी यांनी दिली. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पोषण अभियान, पूरक पोषण आहार, लेक लाडकी आदी योजनांसह विविध योजनांची दालनांमध्ये माहिती देऊन नागरिकांमध्ये योजनांबाबत जागृती करण्यात आली.

महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्याकडून नमो महिला सशक्तीकरण अभियान, गट निर्मिती, फिरता निधी, अर्थसहाय्य, प्रशिक्षण आदींबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा माझी परस बाग, आनंददायी शिक्षण, आकांक्षित तालुका असलेल्या परंडा तालुक्याबाबत शिक्षण विभागाच्यावतीने ठरवलेल्या उद्दिष्टांची जागृतीही या ठिकाणी प्रात्यक्षिकांसह करण्यात आली.

लाडक्या बहिणीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार




धाराशिव : राज्य शासनाचा महिला सशक्ती करणावर भर असून महिलांना सशक्त, आत्मनिर्भर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण  योजनेअंतर्गत मिळालेल्या रक्कमेमुळे गरीब परिस्थिती असलेल्या महिलांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी  सावंत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन   धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरातील कोटला मैदान येथे करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री लाडकी  बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या निवडक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...

लाडक्या बहीण योजनेसाठी लाडके भाऊ मुख्यमंत्री यांचे आभार

    पतीचे निधन झाल्याने कुटुंबाचा आधारच गेला.शिवणकाम करून मी घर चालवते. आर्थिक चणचण कायमच भासते.  परंतु ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये बँक खात्यात आले. हे पैसे  मिळाल्याचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही,असे उदगार आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील 39 वर्षीय कविता युवराज आंधळे यांचे.

 कविता आंधळे म्हणतात माझ्यासारख्या गरीब परिस्थिती असलेल्या महिलांसाठी एक एक रुपयाही खूप मोलाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण  योजनेचे दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. ही योजना सुरू केल्याबद्दल लाडके भाऊ मुख्यमंत्री यांचे मनापासून आभार.

         तेर येथीलच अलका चंद्रकांत नाईकवाडी या शेतकरी महिला लाभार्थी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे संसाराला आर्थिक हातभार लागत असून योजना  अशीच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली.

आरोग्याच्या  देखभालीसाठी योजना महत्त्वपूर्ण

 शिराढोण येथील 63 वर्षाच्या रोशन बी इसाक शेख  म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याने या वयात होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसाठी ही रक्कम खूप उपयोगी पडत आहे.पूर्वी  दवाखान्याच्या खर्चासाठी घरच्यांवर अवलंबून रहावे लागत होते. पण आत्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे घरच्यांवरही आर्थिक ताण येत नाहीय.या रक्कमेतून मी औषधांचा खर्च तर भागवतेच सोबत पौष्टिक फलाहार ही घेते. त्यामुळे  माझे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.महिलांच्या आरोग्य देखभालीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचे श्रीमती शेख सांगतात.

Thursday, 12 September 2024

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

 


छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेची तथा ध्वजारोहणा संबंधी काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभागास दिले.

 

विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी सिध्दार्थ उद्यान येथे होणाऱ्या मुख्य शासकीय  ध्वजारोहणाच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त (सा.प्र.) जगदिश मिनीयार  तसेच पोलीस विभाग, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, विद्युत विभाग, सामाजिक वनीकरण, अग्निशमन विभाग, सामाजिक वनीकरण, समाज कल्याण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

श्री गावडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी कार्यक्रमस्थळी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच ऐनवेळी उपस्थित राहणारे पाहुणे यांची व्यवस्था  तसेच राजशिष्टाचाराप्रमाणे काळजी घेत आसन व्यवस्था करण्याचे निर्देशही श्री. गावडे यांनी संबंधितांना दिले.