Followers

Saturday 21 March 2020

शासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी - राज्यमंत्री संजय बनसोडे






* नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र दक्षता घ्यावी
*आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, उपाययोजना राबवण्यासाठी निधीची कमतरता नाही
* लातूर जिल्हा प्रशासनाकडून कोरोना  प्रतिबंधासाठी राबवित असलेल्या उपाय योजनांचे राज्यमंत्र्यांकडून कौतुक
* खाजगी व्यक्ती कडे थर्मल स्कॅनर असेल तर त्यांनी प्रशासनाला देण्याचे आवाहन
*प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नवीन वॉर्ड तयार करावेत
* जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही
* जिल्ह्यातील 28 रुग्णांच्या स्वाब नमुन्यापैकी 22 नमुने निगेटिव्ह तर 6 प्रलंबित

लातूर, दि. 21:-  कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हाहाकार माजला असून आपल्या देशात व राज्यात ही कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मिळाले आहेत. लातूर जिल्ह्यात आजपावेतो एक ही कोरोना बाधित रुग्ण नाही. परंतु प्रतिबंधत्मक उपाययोजना म्हणून  जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम करावे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजना आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत माले यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
        राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, कोरोना विषाणू मुळे होणार्‍या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपायोजना चांगल्या असून त्या अधिक प्रभावीपणे राबवून लातूर जिल्ह्यात अधिक तत्परतेने आरोग्य सेवा देऊन प्रशासनाने सतर्क राहावे. त्याप्रमाणेच मुंबई, पुणे व परदेशातून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ओळख पटवून त्या लोकांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे का त्याची तपासणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.
    त्याप्रमाणेच जिल्ह्यातील  नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शासन व जिल्हा प्रशासन या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सज्ज आहे. नागरिकांनीही शासनाला योग्य ते सहकार्य करून दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. आजपासून दोन दिवस चालणाऱ्या शटडाऊन  मध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे व घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
        आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग प्रतिबंधासाठी नवीन वॉर्ड तयार करण्याचे प्रस्ताव सादर करावेत. त्याप्रमाणेच आरोग्य विभागास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा आवश्यक वाटत असेल तर त्या बाबतची मागणी प्रशासनाकडे करावी.  मागणी प्राप्त होताच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.
    
    कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लातूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, प्रशासनामार्फत प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाची व कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेतली जात असून त्याठिकाणी सर्दी, खोकला व ताप असलेले व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येणार असून गरज भासल्यास त्यांना तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली. यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती  राज्यमंत्री महोदयांना देऊन या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले असून पोस्टर, पोम्प्लेट, सोशल मीडिया व सर्व प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात एक ही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या शिक्षकांना कामाचे लेखी आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांनी शाळा महाविद्यालयात उपस्थित राहावे अन्यथा त्यांनी घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून बाकी इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देऊन कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
       यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मोनिका पाटील यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती देऊन आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत व्हीसीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत लातूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची दखल राज्य स्तरावर घेण्यात आलेली असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देऊन जिल्हा प्रशासनाच्या या कामाचे कौतुक त्यांनी केले. या आपत्तीकालीन परिस्थितीत शासन व जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
 
 







जिल्हा आरोग्य यंत्रणेनेकडे थर्मल स्कॅनरची कमतरता आहे. तसेच बाजारपेठेतही थर्मल स्कॅनर उपलब्ध होत नाहीत असे निर्देशनास आलेले आहे. जर जिल्ह्यातील खाजगी व्यक्तीकडे थर्मल स्कॅनर्स असतील तर त्यांनी ते स्कॅनर्स आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
 
                                               






No comments:

Post a Comment