बीड : श्री गुरु तेग बहादुर हे शीख धर्माचे 9 वे गुरू होते, त्यांना हिंद-की-चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा "गुरु ग्रंथ साहिब" यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी 17 व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्म स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देवून भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली.
मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे. श्री गुरु तेग बहादुर यांचे सन-2025 हे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरीता नांदेड येथे दि.24.01.2026 व दि.25.01.2026 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड येथे होणा-या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे व जळगाव या 11 जिल्हयांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील शीख सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंथी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास बीड जिल्हयातील सर्व समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठीचे नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड पेथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी, बीड, उपविभागीय अधिकारी, बीड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पं.) जि. प. बीड, जिल्हा नियोजन अधिकारी, बीड, तहसिलदार बीड. शिक्षणाधिकारी, प्राथमिक / माध्यमिक, जि.प.बीड, मुख्याधिकारी नगर परिषद, बीड व जिल्हा माहिती अधिकारी, बीड, प्रीती आनंद कुकडेजा अध्यक्ष (सिंधी समाज प्रतिनिधी), डॉ मदन जेस्वानी उपाध्यक्ष (सिंधी समाज प्रतिनिधी) व आनंद विजयकुमार कुकडेजा सचिव (सिंधी समाज प्रतिनिधी) हे उपस्थित होते. हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड पेथे होणा-या कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिध्दी करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
श्री गुरु तेग बहादुर यांचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा यासाठी विविध शाळां व महाविद्यालयांमध्ये रांगोळी, निबंध, चित्रकला, हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच नांदेड येथील कार्यक्रमाच्या प्रचारासाठी प्रचार रथ तयार करून तो जिल्हयात फिरवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
"हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील नियोजित असलेल्या कार्यक्रमात बीड जिल्हयातील सर्व, नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
#गुरुतेगबहादूर
#हिंददीचादर

No comments:
Post a Comment