Followers

Wednesday 17 July 2019

सर्व वंचित लाभार्थ्यांना कबाले वाटप करणार - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर




*रमाई आवास योजनेंतर्गत 506 लाभार्थ्यांना निधी वितरण
*अमृत योजनेंतर्गत उद्यान विकास कामाचा शुभारंभ
*वैदु समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा व व्यायामशाळेला निधी देणार 

        लातूर,दि.17:-राज्य शासनाकडून पंचवीस वर्षापासून शासकीय जमीनीवर राहत असलेल्या कुटुंबांना कबाले वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे.लातूर जिल्हयात कबाले वाटपाचे 16 हजार प्रकरणे असून या सर्व वंचित लाभार्थ्यांना पुढील दहा-पंधरा  दिवसांत कबाले वाटप करण्यात येणार आहेत,अशी माहिती, अन्न, नागरी पुरवठा, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
        लातूर महापालिकेच्या वतीने एसओएस बालगृहाजवळ अमृत योजनेंतर्गत उद्यान विकास कामाचा शुभारंभ तसेच रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ,आयुक्त एम.डी.सिंह महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे  उपमहापौर देवीदास काळे, स्थायी समिती सभापती ॲड दिपक मठपती, परिवहन सभापती मंगेश बिराजदार ,शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे,सुनिल मलवाड,जयश्री पाटील, सरीता राजगीरे, भाग्यश्री शेळके, उपआयुक्त संभाजी वाघमारे, शहर अभियंता दिलीप चिदरे, रागीनी यादव, शोभा पाटील. भाग्यश्री कौळखोरे, देवानंद साळुंखे,अनंत गायकवाड,हनुमंत जाकते,व्यंकट वाघमारे,वर्षा कुलकर्णी, प्रवीण अंबुलगेकर, दिपा गिते,गणेश गोमचाळे, ,गिता गौड,यशवंत भोसले,राजू अवसकर, उपस्थित होते.
        पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की,देशातील एक ही नागरिक सन 2022 पर्यंत बेघर असणार नाही. तर महाराष्ट्र राज्यातील  प्रत्येक बेघर नागरिकाला सन 2020 पर्यंत घरकुल देण्याचे उद्दिष्ट आहे.त्यामुळे पुढील काळात प्रत्येक नागरिकाला स्वत:चा निवारा उपलब्ध् होणार आहे. तसेच राज्य शासनाने शासकीय जमीनीवर कब्जा केलेल्या व 25 वर्षापासून त्या ठिकाणी राहत असलेल्या कुटुंबाना कबाले वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लातूर जिल्हयातील सर्व वंचित लाभार्थ्यांना लवकरच  कबाले वाटप केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
         केंद्र व राज्य शासन विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँक खात्यावर देत असल्याने दलालाची भ्रष्ट साखळी संपली असून संबंधीत पात्र लाभार्थ्यांना त्याचा फायदा हे शासन मिळवून देत आहे, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच ज्या स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य मिळत नाही अशा स्वस्त धान्य दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल व प्रत्येक लाभार्थ्यांला शंभर टक्के अन्नधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
          लातूर शहरातील वैदु समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध् करुन दिली जाईल. त्याप्रमाणेच या समाजाच्या तरुणांसाठी व्यायामशाळा ही निर्माण केली जाईल, असे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितले.
       सध्याची टंचाईची  परिस्थिती पाहता शासन पूर्णपणे   लोकांच्या पाठीशी असून टंचाईच्या विविध योजना  राबविल्या जात आहेत. त्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीने किमान एका वृक्षाची लागवड करुन ते जोपासण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत.तर प्रत्येक नगरसेवकांने आपल्या प्रभागात एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना राबवावी, असे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केली.
       लातूर शहराच्या सांडपाण्याच्या प्रकल्पासाठी बोरवटी या गावाच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने  6 एकर जागा दिली असून  येथील पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी उद्योगासाठी  वापरले जाणार असल्याची  माहिती निलंगेकर यांनी दिली. तसेच शहरातील सर्व सांडपाण्यावर एस.टी.पी. प्रकल्पांतर्गत प्रक्रिया सुरु झाल्यास शहरातील नागरिकांचे ही आरोग्य चांगले राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर पवार यांनी ही मनोगत व्यक्त केले.
         प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते अमृत योजनेंतर्गत उद्यान विकास कामाचा शुभारंभ  करण्यात  येऊन या  उद्यानात  त्यांच्या  हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.त्यानंतर रमाई घरकुल योजनेंतर्गत 506 लाभार्थ्यांपैकी   प्रातिनिधिक स्वरुपात  पाच लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तसेच बोरवटी येथील  जमीनीचे हस्तांतरण निलंगेकर यांच्या हस्ते महापालिका प्रशासनाकडे करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयुक्त एम.डी.सिंह यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुक्कमानंद वडगावे यांनी केले. तर आभार स्थायी समिती सभापती दीपक मठपती यांनी मानले.

No comments:

Post a Comment