Followers

Sunday 28 July 2019

रेल्वे कोच कारखान्यातून डिसेंबर 2019 अखेर पहिली बोगी बाहेर पडेल -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर




*लातूर जिल्हयाला 463 कोटीचे दुष्काळी अनुदान मिळणार
*औसा तालुक्यातील भूसंपादित केलेली जमीन शासकीय प्रकल्पांसाठीच असेल
*वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची व नागरिकांची  वीज जोडणी खंडित करु नये
*लातूरला “ पॅरा मेडिकल ” विद्यापीठ होणार
*जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, विशेष  घटक व आदिवासी योजना ) सन 2018-19 च्या 337 कोटीच्या खर्चास मान्यता
*1 ऑगस्टपासून संपर्क, संवाद व समाधान अभियानास प्रारंभ 
*पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षरोपण

लातूर,दि.27:- रेल्वे कोच प्रकल्पाच्या माध्यमातून लातूर जिल्हयात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन  31 मार्च 2018 मध्ये झालेले होते. या प्रकल्पातील कामे वेगाने सुरु असून माहे डिसेंबर 2019 अखेरपर्यंत  या कारखान्यातून पहिली  बोगी तयार होऊन बाहेर पडेल, असा विश्वास अन्न,नागरी पुरवठा,कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री  तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
        जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष मिलींद लातूरे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सर्वश्री सुधाकर भालेराव, अमित देशमुख, विनायक पाटील, त्र्यंबक भिसे, महापौर सुरेश पवार, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य बी.बी. ठोंबरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त एम.डी.सिंह,मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र  माने, जिल्हा नियोजन अधिकारी दुशिंग, सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रियंका बोकिल यांच्यासह समिती सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.
       पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, लातूर येथील रेल्वे प्रकल्प हा देशातील पहिलाच मेट्रो रेल्वे प्रकल्प असून हया प्रकल्पातून  माहे डिसेंबर 2019 अखेर पर्यंत मेट्रो रेल बोगी  निर्माण होऊन  बाहेर पडेल. या प्रकल्पाला पाणी महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतून प्रक्रिया करुन लवकरच पुरविले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
       मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीने  नुकसान झालेल्या शेत पिकांचे  463 कोटीचे प्रस्ताव तयार करुन  पाठविले असून प्रस्तावित केलेली  संपूर्ण रक्कम  जिल्हयाला शंभर टक्के मिळेल, असे  निलंगेकर यांनी सांगून  यावर्षी ही आतापर्यंत  खूप कमी पाऊस झाल्याने  दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हित समोर ठेवून  जनावरांच्या चाऱ्यासाठी  प्रत्येक  शेतकऱ्याच्या दावणीला चारा पोहोचविण्याची शासनाची भूमिका  असल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्हयातील शेतकऱ्यांची चारा छावणीत जनावरं  ठेवण्याची  मानसिकता नसली तरी कोणाकडून ही चारा छावणी सुरु  करण्याचा प्रस्ताव आल्यास  त्यास प्रशासनाने  तात्काळ मान्यता देण्याची सूचना निलंगेकर यांनी केली. व या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेवटच्या  माणसांपर्यंत पोहचून त्यांना धीर देण्याच्या  कामात सर्वांनी  सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
       यापूर्वीच्या काळात औसा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केंद्र शासनाच्या प्रकल्पांसाठी जमीनी  संपादित केलेल्या होत्या. त्या जमीनीवर शासनाचाच प्रकल्प होईल व अशा शासकीय  प्रकल्पांतून लातूर जिल्हयाचा चेहरा बदलेल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच वॉटर ग्रीडची संकल्पना ही लातूर जिल्हयातील  टंचाईच्या परिस्थितीतून  आलेली असल्याने  या प्रकल्पाच्या कामांचे उद्घाटन लातूर येथेच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
       राज्य विज वितरण कंपनीने  सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहून जिल्हयातील एका ही शेतकऱ्याच्या शेतावरील  तसेच  सर्वसामान्य नागरिकांच्या घरी  नवीन मीटरमुळे  निर्माण  झालेल्या  बीलाच्या संभ्रमातून एक ही वीज जोडणी  खंडित करु नये. तसेच नवीन  मीटरच्या बाबतीत जळगाव जिल्हयाप्रमाणे येथे ही काम करावे,असे निर्देश निलंगेकर यांनी दिले. तर शेतकऱ्यांकडून नवीन वीज जोडणीचे प्रस्ताव स्वीकारावेत, असे ही त्यांनी सांगितले.
       राज्यात नवीन सहा विद्यापीठांना मंजूरी  दिली जाणार असून लातूर जिल्हयात “  पॅरा मेडिकलचं  ” एक नवीन विद्यापीठ होणार आहे. तसेच  जुन्या डाल्डा फॅक्टरीच्या जमीनीवर शासकीय  प्रकल्पच उभारलं जाइल. कोणत्याही  खाजगी  संस्था व व्यक्तींना ही  जमीन दिली जाणार नसल्याचे निलंगेकर यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणेच लातूर शहराची  एक शैक्षणिक  शहर म्हणून ओळख असून शहरातील गुनहेगारांवर पोलिसांचा वचक  असला पाहीजे, असे त्यांनी सूचित केले.   जिल्हयात मागील तीन वर्षात झालेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाची ऑडिट  करुन त्याचा अहवाल  दयावा. या कामांत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दयावे, अशी सूचना निलंगेकर यांनी केली.
    अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योंदय अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन रेशनकार्ड, गॅस कनेक्शन व मागेल त्याला अन्न धान्य वाटप हे कार्यक्रम घेतले जात असून लातूर जिल्हयात या अभियानाची चांगली अंमलबजावणी सुरु असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.
      जिल्हा नियोजन समिती कडून जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 च्या 337 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या अंतर्गत सर्व साधारण योजना  212 कोटी  68 लाख 75 हजार, अनुसूचित  जाती उपयोजना 121 कोटी 55 लाख तर आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र 3 कोटी  62 लाख  14 हजार अशा एकूण 337 कोटी 85 लाख 89 हजाराच्या खर्चास समितीने मान्यता देऊन जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 च्या कामांचा आढावा घेतला.
     प्रारंभी सर्व लोकप्रतिनिधींनी यांनी अमृत योजना, लातूर शहर वाहतूक प्रश्न, वीज वितरण, वीज देयके अधिक येणे, शाळांना निधी, नदी पुर्न जीवन ,ग्रामीण रस्त्यांची  दुरुस्ती, उजेड गावाला तीर्थक्षेत्र दर्जा देणे व हत्तीबेटाला ब दर्जाचे तीर्थक्षेत्र देणे, जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था, तसेच जिल्हयातील दुष्काळी परिस्थिती चारा छावण्या आदि समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.यावेळी खासदार ओम राजे निंबाळकर, आमदार सर्वश्री देशमुख, भालेराव, भिसे, पाटील, व जिल्हा परिषद अध्यक्ष लातूरे तसेच  नियोजन समिती सदस्यांनी समस्या मांडल्या.
     प्रारंभी  जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी लातूर जिल्हयाची पर्जन्याची माहिती देऊन यावर्षी पाऊस अत्यंत नगण्य झाला असून गेल्यावर्षी  पेक्षा अधिक गंभीर  परिस्थिती असल्याचे सांगून  प्रशासन टंचाईच्या सर्व उपाय योजना  प्रभावीपणे राबवित असल्याची माहिती दिली. त्याप्रमाणेच  अनेक संस्थांकडून चारा छावण्या सुरु करण्याची निवेदने आली आहेत. छावणी सुरु करण्याचा प्रस्ताव  आल्यास त्यास त्वरीत  मान्यता दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
      तसेच  1 ऑगस्ट 2019 पासून  जिल्हयात संपर्क, संवाद  व समाधान अभियान राबविले जाणार असून सर्व जिल्हास्तरीय प्रमुख मंडल स्तरांपर्यंत  जाऊन सर्वसामान्यांशी  संवाद साधून त्यांचे  समाधान करणार आहेत. या अभियानात सर्वांनी  सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींनी  मतदार नोंदणी मोहिमेस  सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या  परिसरात  मेवायकी पध्दतीने वृक्ष रोपण करण्यात आले. या ठिकाणी दीड बाय दीड फुटाच्या अंतरावर घनदाट  पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यावेळी  सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
अभिनंदनाचा ठराव :-
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील तीन वर्षात लातूर जिल्हयात केलेल्या कामांसाठी  लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी अभिनंदानाचा ठराव मांडला व या ठरावास आमदार त्र्यंबक भिसे यांनी अनुमोदन दिले.
    तसेच लातूर जिल्हयाला राष्ट्रीय  महामार्गाचे जाळे  निर्माण करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 9 हजार कोटीचा निधी दिल्या बद्दल  श्री. गडकरी  यांच्या अभिनंदानाचा ठराव  श्री. निलंगेकर यांनी मांडला. व  उपरोक्त दोन्ही ही ठराव नियोजन समितीच्या सभागृहात एकमताने  मंजूर करण्यात आले.

No comments:

Post a Comment