Followers

Thursday, 29 January 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती




पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे,  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.


प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश आगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून  श्रद्धांजली अर्पण केली.

#अजितपवार

Wednesday, 28 January 2026

राज्याचे 'खंबीर नेतृत्व', मराठवाड्याचा 'आधारवड' कोसळला!






प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व  हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.

तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट

अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'  गुरुद्वारात ते नतमस्तक झाले.  सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. 'कडा प्रसाद' ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले.  'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.

 पालकमंत्र्यांचा 'धडाका' आणि 'विक्रमी नोंद '

बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.

केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद 'इंडिया रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'टर्फ ग्राउंड' बीडकरांना दिले.

 सहकार आणि अर्थाची जोड

प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य 'सहकार संकुला'चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.

हृदयाची काळजी घेणारे 'दादा'

बीड जिल्हा रुग्णालयात 'कार्डियाक कॅथलॅब' देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले.

एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 'वित्त व नियोजन मंत्री' आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे 'पालकमंत्री'... अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!

#अजितपवार 

 

- डॉ. श्याम टरके

 सहायक संचालक (माहिती),

 विभागीय माहिती कार्यालय, लातूर.

Saturday, 24 January 2026

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक

 


​नांदेड : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नांदेड येथे हजेरी लावली. त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा येथे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. गुरुद्वारा परिसरात प्रवेश करताच त्यांनी 'बोले सो निहाल'च्या जयघोषात पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से.नि.भाप्रसे) यांची उपस्थिती होती. 

हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 




नांदेड:- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरु ग्रंथ साहिब सेवा संस्थेच्या गुरु का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. 

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रंगमंच परिसरात तसेच इतर दर्शनी भागात, लंगरच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासोबतच कार्यक्रमाची लाइव्ह लिंक https://youtube.com/live/Am_ofc2n8ig?feature=share  उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पिण्याचे पाणी व सुरक्षा, लंगरची व्यवस्था यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा शहीदी समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


०००००

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”

 





मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी

श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम

नांदेड, दि. २४ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे, महंत, सुनील महाराज,बाबुसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.  सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत. 

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे.


भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान




नांदेड:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले. 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.

विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुबाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह!





'बोले सो निहाल'चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नांदेड, दिनांक  :  'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल'चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला.

या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. २४) सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुद्वारामध्ये विधिवत अरदास करण्यात आली. यानंतर गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने (Guard of Honor) विधिवत 'मानवंदना' देण्यात आली. या सोहळ्याचे सर्वात विलोभनीय दृश्य म्हणजे हेलिकॉप्टरने गुरुद्वारावर केलेली पुष्पवृष्टी. 

भव्य नगर कीर्तन मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी, भाई जोतिनदर सिंघ जी, मुख्य ग्रंथी भाई कश्मीर सिंघ जी, भाई रामसिंघ जी, भाई गुरुमीत सिंघ जी या पंच प्यारे साहिबान यांच्या  नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.

सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.

 राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला.

तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (भा.पो.से.) आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग (से .नि. भाप्रसे), त्यांचे सहकारी जसविंत सिंघ (बॉबी) आणि अधीक्षक हरजितसिंग कडेवाले यांनीही उपस्थित राहून नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतका' प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझिम' नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसाल' आणि 'हिंद दी चादर' असे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.

 नगर कीर्तन गुरुद्वारा गेट क्रमांक १ वरून गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, नागार्जुन स्कूल मार्गे मुख्य कार्यक्रमस्थळी म्हणजेच 'मोदी मैदान' येथे पोहोचले.

शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत

गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या अंदाजे चार किलोमीटरच्या मार्गावर एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर नांदेडकरांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर 

Maharashtra DGIPR

Friday, 23 January 2026

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही






नांदेड :- नांदेड येथे उद्यापासून दोन दिवस “हिंद-दी-चादर” अंतर्गत शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ  घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य महानगर कीर्तन सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून प्रारंभ होऊन गुरुद्वारा चौक – महावीर चौक – वजिराबाद मार्केट – वजिराबाद चौक – तिरंगा चौक – रामसेतू दादरा – रवी नगर – नागार्जुन पब्लिक स्कूल – मामा चौक या मार्गाने मोदी मैदान, मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे.


या मार्गावरील सर्व नागरिकांनी आपल्या घरांसमोर व दुकानांसमोर रंगीबेरंगी फुले, रांगोळी, विद्युत रोषणाई व दिव्यांच्या माध्यमातून सजावट करून पालखीचे स्वागत करावे व या भव्य महानगर कीर्तनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हा कार्यक्रम दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमस्थळी येण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोफत वाहनसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात आली आहेत.


हिंद-दी-चादर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेशासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नाही

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा



भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड : “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर दिनांक २४ व २५ जानेवारी, २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक व नागरिकांना सहजपणे उपस्थित राहता यावे, यासाठी शहर व परिसरातील एकूण २० ठिकाणांहून मोदी मैदानापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही बससेवा रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पासदगाव-तरोडा नाका, सांगवी-चैतन्यनगर, शंकरराव चव्हाण चौक-साठेचौक, सिडको-लातूर फाटा, धनेगाव-वाजेगाव, राजकॉर्नर-शिवाजीनगर, सराफा चौक-जुना कौठा मोंढा, ढवळे कॉर्नर-सिडको, लिंबगाव-छत्रपती चौक-मोर चौक, नाळेश्वर, आसना-राजकॉर्नर, विष्णुपुरी, कामठा-नमस्कारचौक, हडको, निळा-जयभवानी चौक, सोनखेड-वाडीपाटी-विष्णुपुरी, उस्माननगर-वडगाव-सिडको तसेच मारतळा-जवाहरनगर-तुप्पा-चंदासिंग कॉर्नर येथून मोदी मैदान येथील कार्यक्रम स्थळापर्यंत देण्यात आली आहे.

या मोफत बससेवेचा लाभ घेवून सर्व भाविक व नागरिकांनी “हिंद दी चादर” शहीदी समागम कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

'हिंद दी चादर': त्याग आणि सर्वोच्च बलिदानाचा जिवंत अनुभव

 


पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब ​जी नांदेड गुरुद्वाराच्या पवित्र परिसरात भाविकांची मांदियाळी आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक केवळ नतमस्तक होत नाहीत, तर तिथे सुरू असलेल्या एका विशेष माहितीपटासमोर थबकतही आहेत. हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जींच्या जीवनावरील हा माहितीपट पाहताना अनेकांची पावले तिथेच रेंगाळतायत.

संध्याकाळची वेळ... गोदावरीच्या तीरावर वसलेले सचखंड गुरुद्वारा विद्युत रोषणाईने लख्ख उजळून निघाले आहे. गुरुद्वाराच्या सुवर्ण कळसाचे प्रतिबिंब आणि रोषणाईचा प्रकाश यामुळे परिसर न्हाऊन निघाला आहे. हवेत लंगरचा आणि कडा प्रसादाचा तोच परिचित, पवित्र आणि मनाला तृप्त करणारा सुवास दरवळत आहे.

​एकीकडे गुरुजींच्या गुरबानीचे मंगल सूर कानावर पडत आहेत, तर दुसरीकडे समोरच्या भव्य पडद्यावर श्री गुरू तेग बहादूर साहिब जींचा इतिहास जिवंत होत आहे. एरवी भाविकांच्या गजबजाटाने भरलेल्या या परिसरात आज एक वेगळीच, एकाग्रतेची शांतता आहे. तो भव्य डिजिटल पडदा केवळ प्रकाश फेकत नाहीये, तर त्या प्रकाशात ४०० वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडत आहे. अंधारात चमकणारा तो पडदा आणि त्यावरचे प्रसंग पाहून, उपस्थित प्रत्येक जण सध्याच्या काळाचा विसर पडून त्या ऐतिहासिक कालखंडात हरवून गेला आहे.

या वातावरणात भारावून गेलेले भाविक जागचे हलत नाहीत. विशेषतः तरुण पिढीसाठी हा चित्रपट एक अनमोल ठेवा ठरत आहे. पडद्यावर जेव्हा श्री गुरु तेग बहादूर साहिब जींच्या सर्वोच्च बलिदानाचा प्रसंग येतो, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावतात आणि आपसूकच हात जोडले जातात. भक्तीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली की काय होते, याचा हा साक्षात पुरावा आहे.

काळ बदलला, माध्यमं बदलली, पण श्री गुरू तेग बहादूर साहिब जींच्या त्यागाचा संदेश आजही शाश्वत आहे. हे दृश्य आणि हा अनुभव शब्दांत मांडण्यापलीकडचा आहे. 

पवित्र तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब ​जी नांदेड गुरुद्वारा, नांदेड वाघाळा येथील मैदानावर दोन दिवस चालणाऱ्या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी आणि श्री गुरू गोबिंद सिंघ जी ३५० व्या गुरता गद्दी शताब्दी समागम या ऐतिहासिक पर्वास  आपणही सहकुटुंब एकदा नक्की भेट द्या.


🔗  *पाहायला हवाच असा माहितीपट:* https://www.youtube.com/watch?v=w_kI87w6NzA&t=1s


 ्डॉ. श्याम टरके , सहायक संचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, लातूर

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान व आश्रमशाळा क्रीडा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात


 धाराशिव: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान तसेच आश्रमशाळा क्रीडा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या अनुषंगाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे आज २३ जानेवारी २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तेजस माळवदकर, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, लातूर हे उपस्थित होते. कार्यक्रमात व्याख्याते म्हणून श्री. भैरवनाथ कानडे यांनी सहभाग घेतला, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अमोल ताकभाते, सहाय्यक संचालक ,इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमास जिल्ह्यातील आश्रमशाळातील सुमारे २०० ते २५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. तेजस माळवदकर व व्याख्याते श्री. भैरवनाथ कानडे यांनी “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकत,त्यांच्या त्याग, शौर्य व धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या प्रयत्नांना बलिदानाची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल क्रीडा बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव कार्यालयातील निरीक्षक श्री. युवराज भोसले, श्री.संदेश घुगे, वरिष्ठ लिपिक श्री. विकास राठोड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी ५० पेशन्ट ट्रान्सफर शीट्सचे वितरण

 


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास साहित्य सुपूर्द

नांदेड :-नांदेड शहरात दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह देश-विदेशातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची पूर्वतयारी व सज्जता युद्धपातळीवर सुरू आहे.

लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय व्यवस्थेची तत्काळ सुविधा उपलब्ध राहावी, या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड राहुल कर्डिले यांच्याकडे ५० पेशन्ट ट्रान्सफर शीट्स (स्ट्रेचर) उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीस जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मान्यता देत आज दि. २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास त्यांच्या हस्ते सदर साहित्य वितरीत केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे, महसूल सहायक बारकुजी मोरे, गौरव तिवारी (डीडीएमएस) तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही ५० पेशन्ट ट्रान्सफर शीट्स आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना कार्यक्रमस्थळावरून मुख्य रस्त्यापर्यंत, रुग्णवाहिकेपर्यंत व रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ‘हिंद दी चादर’ या भव्य सोहळ्यासह नांदेड शहर व जिल्ह्यात होणाऱ्या इतर मोठ्या कार्यक्रमांदरम्यान तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीतही या साहित्याचा कायमस्वरूपी उपयोग होणार आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुल, रांगोळीनी सजावट करून सहभाग नोंदवावा

 


 नांदेड :- हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहेब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महान नगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वा. गुरूव्दारा गेट नं 1 पासून गुरूव्दारा चौक-महाविर चौक- वजिराबाद मार्केट येथून वजिराबाद चौक-तिरंगा चौक-रामसेतू दादरा-रविनगर-नागार्जून पब्लिक स्कूल-मामा चौक या मार्गाने मोदी मैदान मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचणार आहे.

या मार्गातील सर्व रहिवाशी  यांनी या महानगर किर्तनादरम्यान आपण आपल्या घरासमोर, दुकानासमोर रंगीबेरंगी फुलांनी अथवा रांगोळीनी संपूर्ण रस्त्याच्या बाजूने सजावट करावी. तसेच आपल्या घरावर, दुकानावर विद्युत रोशनाई तसेच दिवे लावून पालखीचे स्वागत करून भव्य महान नगर किर्तनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

 


लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा

नांदेड :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून, ही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानक, बसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी



- हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम

नांदेड :हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी  समागम वर्षाचे औचित्य साधून, आज पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'चे गायन, ज्याने उपस्थित संगतांना मंत्रमुग्ध केले.

               पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम आज पार पडला.  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे  ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.

                  या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे  जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ.  विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती.  

             विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण  तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा; भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड :-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम असर्जन परिसरातील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे.

या पावन शहीदी समागमास नांदेड शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोयीसाठी नांदेड शहर व परिसरातील विविध गावे व ठिकाणांहून कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी २०० पैक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. यात स्कुलबस व इतर वाहनांचा समावेश आहे.

या मोफत वाहतूक सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता येणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था विशेष लाभदायक ठरणार आहे.

तरी सर्व भाविक व नागरिकांनी या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागम कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहेब यांचे ३५० वे शहीदी समागम वर्ष जिल्ह्यातील २७८९ शाळांमध्ये दररोज प्रभात फेऱ्यांद्वारे जनजागृती





             छत्रपती संभाजीनगर :- हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त त्यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात विविध शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्ह्यातील २७८९ शाळांमध्ये दररोज प्रभात फेऱ्या आयोजीत करुन जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर यांनी दिली आहे.

            जिल्ह्यातील एकूण ३०७४ प्राथमिक शाळांपैकी २८९२ शाळेत प्रभात फेऱ्या घेतल्या आहेत, तर त्यातील २७८९ शाळेत दररोज प्रभात फेऱ्या घेण्यात येतआहेत. शिक्षणविभागाच्या माध्यमिक विभागाच्या एकूण १२७७ शाळांपैकी ११०२ शाळांचा तर  उच्च माध्यमिक विभागातील१५७ शाळांपैकी १४१  शाळांचा या उपक्रमात सहभाग आहे. तसेच २८९२ प्राथमिक शाळांमध्ये श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा आयोजीत करुन  गीत व डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तर ११०२ माध्यमिक शाळेत व १४१  उच्च माध्यमिक शाळेत गुरुतेग बहादुर साहेबजी यांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या गीत व डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवार दि.२० रोजी संपन्न झाल्या असून आणि आज जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे  निकाल संकलित करणे सुरू आहे. आज घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये गायन,चित्रकला,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा व स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळून जनजागृती होत आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक

 


मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व फुलांची सजावट

नांदेड :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी दोन्ही दिवस श्री गुरुग्रंथ साहिब विराजमान राहणार आहेत. 

या अनुषंगाने 24 जानेवारी रोजी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा ते मोदी मैदान पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्ग फुलांनी सजविण्यात येणार आहे.

ही भव्य मिरवणूक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती व आध्यात्मिकतेचा अविस्मरणीय अनुभव ठरणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

लातूर जिल्हास्तरीय गायन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनीगी तांमधून मांडला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट


लातूर :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ज्ञानप्रकाश शिक्षण संकुलात ‘हिंद दी चादर’ गायन स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत विद्यार्थ्यांनी गीतांमधून श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील त्याग, बलिदान आणि शौर्य यांची प्रभावी मांडणी केली.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणास लावले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आदर्शांचा आणि त्यांच्या अमर बलिदानाचा संदेश पोहचला. स्पर्धेत सादर केलेल्या गीतांमधून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट उलगडला गेला.

समग्र शिक्षा अभियानचे चंद्रकांत ठाकरे यांनी या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले. तसेच संगीत शिक्षक विश्वजीत पांचाळ आणि शाहीर श्रीमती अॅड. अपेक्षा डाके यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

जिल्हा शिक्षण विभागाने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव, धार्मिक सद्भावना आणि बलिदानाच्या मूल्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी सर्जनशील आणि उत्साहपूर्ण वातावरणात गीत गायनाचे कौशल्य सादर केले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त लातूर जिल्ह्यात विविध स्पर्धा आणि जनजागृती उपक्रम राबविले जात आहे. यानिमित्ताने राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित विशेष कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

 

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते.

श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.

श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबिंद सिंग जी. त्यांनी नांदेड येथे देह त्यागण्यापूर्वी त्यांच्यानंतर देहधारी गुरू असणार नाही, असे घोषित केले. पवित्र गुरू ग्रंथ साहिब यांना गुरूपद बहाल केले. या पवित्र गुरू ग्रंथ साहिबमध्ये श्री गुरू तेगबहादूर जी यांच्या 59 पद्यांचा व 57 श्लोकांचा अशा एकूण 116 रचनांचा समावेश आहे.

पवित्र ग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिबचा प्रारंभ श्री गुरू नानकदेवांच्या जपुजी साहिब वाणीने झाला. तर ‍हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या श्लोकांनी समारोप. पवित्र गुरू ग्रंथ साहिब एक हजार 430 पानांचा आहे. पान क्रमांक एक हजार 425 ते  एक हजार 428 यावर श्री गुरू तेगबहादूरजी यांचे मनाचे श्लोक अंकित आहेत. श्री गुरू तेगबहादूरजी (गुरूजी) यांच्या श्लोकांमध्ये साधकास परमेश्वर प्राप्तीसाठी मनाची कोणती अवस्था प्राप्त केली पाहिजे, याचे विवेचन आहे.

प्रस्तुत लेखात काही निवडक श्लोकांमधून मनास उपदेश, मोह, मायेपासून दूर जाणे, संस्कारित मन असणे अत्यावश्यक असल्याचे ज्ञान होते. आदर्श जीवन जगण्याची पद्धत समजते. गुरूजींच्या श्लोकांमधील विचार प्रत्येकाने आचरणात आणायलाच हवेत. त्यातून मानवाचे कल्याणच होणार. तसेच गुरूजींच्या वाणीतून जगाचे खरे स्वरूप, शाश्वत सत्य समजते.

माया किंवा मोह आपल्याला बांधून ठेवते, यावर श्री गुरू तेग बहादूरजींनी भाष्य केले आहे. त्यांच्या मते, जग आणि त्यातील सुख-दुःखे क्षणभंगुर आहेत.


जग रचना सभ झूठ है, जानि लेहु रे मीत ॥

कहि नानक थिरु ना रहे, जिउ बालू की भीत ॥ 49॥

 अर्थ : गुरू नानक म्हणतात, "मित्रा, हे जग नश्वर आणि अस्थिर आहे. ज्याप्रमाणे वाळूची भिंत टिकत नाही, तसेच हे जगही टिकणारे नाही." 

जेव्हा आपल्याला हे सत्य समजते, तेव्हा आपण भौतिक मोहातून मुक्त होतो. ही समज आपल्याला सेवा आणि निःस्वार्थ कामाकडे वळवते.

श्री गुरू तेग बहादूरजींनी मानवी दुःखाची कारणे शोधली, त्यावर मात करण्याचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण संपूर्ण मनुष्य जीवनाचे कल्याण करणारी आहे.


1.      मोह आणि अहंकारावर विजय

माणसाचा स्वार्थ, अहंकार त्याला सत्यापासून दूर नेतो. यावर विजय मिळवणारा माणूस स्वतःसोबत इतरांनाही तारतो.

जो प्राणी ममता तजै, लोभ मोह अहंकार ॥

कहु नानक आपन तरै, अउरन लेत उधार ॥22॥

 अर्थ : गुरू नानक म्हणतात,  जो माणूस लोभ, मोह, माया, ममता आणि अहंकार या विकारांचा त्याग केला तो स्वत: तर भवसागर तरून जातोच, एवढेच नव्हे तर इतरांचाही  तो उद्धार करतो.


  2. लोभ, क्रोधाचा त्याग

लोभ आणि राग नातेसंबंधांना तडा देतात. ज्याला सुख-दुःखाचा स्पर्श होत नाही, तो साक्षात ईश्वराचे रूप असतो.

सुख दुखु जिह परसै नही, लोभु मोहु अभिमानु ॥

कहु नानक सुनु रे मना, सो मुरति भगवान ॥13॥

 अर्थ : गुरू नानक म्हणतात, ज्याला सुख-दुःख स्पर्शही करू शकत नाही, जो लोभ, मोह, अभिमान आदी विकारांपासून मुक्त आहे, तो जीव साक्षात ईश्वर स्वरूप आहे.


3. सुख-दुःखात स्थिर मन

आयुष्यात चढ-उतार येणारच. पण जो शत्रू आणि मित्र दोघांना समान मानतो आणि दुःखात खचत नाही, तोच खरा ज्ञानी.


हरखु सोगु जा कै नही, बैरी मीत समानि ॥

कहु नानक सुनि रे मना, मुकति ताहि तै जानि ॥15॥

 अर्थ : गुरू नानक सांगतात, ज्याला हर्ष, शोक वेगळे वाटत नाहीत, जो शत्रू मित्र यांना समान मानतो, जो जीव मुक्त झाला आहे, असे समज.

4. भक्ती आणि नामस्मरण

सर्व संकटांतून मुक्त होण्यासाठी गुरूजींनी ईश्वराच्या नावाचे स्मरण करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.


राम नामु उरि मैं गहिओ, जा कै सम नहि कोइ ॥

जिह सिमरत संकट मिटै, दरसु तुहारो होइ ॥57॥

 अर्थ :  अंत समयी  गुरू नानकजी म्हणतात "अरे मित्रा ! नामस्मरणमात्रे संकटे नष्ट होतात, आणि परमेश्वराचे- दर्शन होते ते रामनाम हृद्यात धारण कर. त्याच्या तोडीचे जगात अन्य काहीही नाही."

हिंद-दी-चादर श्री. गुरू तेग बहादूरजींनी त्यांच्या कृती आणि आचरणातून सर्वांना अनमोल विचार दिला. त्यांचा विचार अंगीकारणे, आचरणात आणणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहेच. ‘कहु नानक सुन रे मना’ या वाक्यांद्वारे गुरूजी मनाला वारंवार अनेक दुष्कार्यापासून आपणास परावृत करून सत्कार्याशी जोडण्याचा संदेश देतात. असे गोड अमृत सर्व मानवाने चाखावे.  

काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर यापासून मुक्तता म्हणजेच आत्मशुद्धी, सत्संग प्रधानता, जीवननिष्ठेत विधायकतेबरोबर अनाग्रही निवृत्ती, प्रपंच आणि परमार्थ, नामस्मरण यांचा सुमेळ ही गुरूजींच्या वाणीतील वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे विचार एका समाजापुरते नाहीत. तर ते सर्व मानव कल्याणाचे आहेत. मनाला संस्कारित करणारे आहेत. गुरूजींची वाणी सर्वांपर्यंत पोहोचावी. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे, शिकवणीचे अनुकरण ही काळाची गरज आहे. ते अमृत प्रत्येकाने चाखल्यास जीवनाचे नक्की सार्थक होईल.                                                                                                                  

डॉ. श्याम टरके,                                                                    संचालक (माहिती) 

विभागीय माहिती कार्यालय, लातूर


 संदर्भ

गुरू नानकांची वाणी जपुजी साहिब. (2006).मध्ये त. ग. विनायक लिमये. पुणे: तारासिंह गोरोवाडा, सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे. 01 16, 2026 प्राप्त

ऐक रे मना ! (‍ तिसरी आ.). (2013).  (त. ग. विनायक लिमये, अनु.) पुणे: तारासिंह गोरोवाडा, सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे. 01 16, 2026 प्राप्त

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

Thursday, 22 January 2026

हिंद-दी-चादर' कार्यक्रम व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात आंदोलनांवर तात्पुरती बंदी




नांदेड:- 'हिंद-दी-चादर' कार्यक्रम तसेचभारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आंदोलनात्मक कार्यक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.


दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी 'हिंद-दी-चादर' हा कार्यक्रम होणार असून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने सदर आदेश लागू करण्यात आला आहे.


या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, महात्मा गांधी पुतळा, तहसील कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजिराबाद, शासकीय विश्रामगृह, अण्णाभाऊ साठे चौक, कुसुम सभागृह, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, एस.टी. ओव्हर ब्रिज, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र कार्यालय, मोटार परिवहन विभाग, वन विभाग, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, दूध डेअरी, रेल्वे डिव्हिजन, समाज कल्याण कार्यालय आदी परिसरांतील मुख्य रस्त्यांवर दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.


संबंधितांना नोटीस बजावून म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी उपलब्ध नसल्याने, आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (2) नुसार हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आला आहे.

#गुरुतेगबहादूर #हिंददीचादर

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड शहरात वाहतूक नियमन



नांदेड :- “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. हे सर्व मान्यवर नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार असल्याने नांदेड शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता, सुव्यवस्था व वाहतुकीचे सुरळीत नियोजन राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक नियमनाबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.

या कालावधीत व्हीव्हीआयपी दौऱ्यादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात आसना ब्रिज–शंकरराव चव्हाण चौक–गुरुद्वारा मालटेकडी रोड–मालटेकडी ओव्हरब्रिज, नमस्कार चौक ते नाईक चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, चिखलवाडी चौक, आय.टी.आय. ते अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा ते नाईक चौक (आनंदनगरकडे), हिंगोली गेट अंडरब्रिज ते अण्णाभाऊ साठे पुतळा, चिखलवाडी ते हिंगोली गेट ओव्हर/अंडरब्रिज, चिखलवाडी ते गुरुद्वारा हनुमान मंदिर–भगतसिंग चौक, बर्की चौक ते जुना मोंढा मार्गे वजिराबाद, कविता हॉटेल ते जुना मोंढा कौठा, एम.जी. हेक्टर शोरूम ते साई कमान कौठा, भगतसिंग चौक ते श्रीराम चौक (पूर्व बाजू), अहिल्यादेवी होळकर चौक–मामा चौक, बी.डी.डी.एस. ऑफिस ते मामा चौक–श्रीराम चौक, लिंबगाव ते वाघी रोड–हसापूर मार्ग (कार्यक्रमास येणारी वाहने वगळून), रविनगर ते नागार्जुन शाळा तसेच कौठा चौकी ते रविनगर, बसवेश्वर पुतळा ते अहिल्याबाई होळकर चौक–पदमजासिटी–भगतसिंग चौक हे मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहेत.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिखलवाडी–अण्णाभाऊ साठे पुतळा–नाईक चौककडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोर्टाच्या पाठीमागून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे गोकुळनगरकडे वळविण्यात येईल. तसेच वजिराबाद चौक–आय.टी.आप–नवीन मोंढा–महादेव दाल मिल मार्ग, महादेव दाल मिल रोड क्रमांक 26, शिवाजी महाराज पुतळा–रेल्वे स्टेशन–हिंगोली गेट, बसवेश्वर चौक ते लातूर फाटा, लिंबगाव–भवानी चौक–छत्रपती चौक मार्गे वाहतूक सुरू राहील.

नागरिकांनी दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले 

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

Wednesday, 21 January 2026

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम; लातूर जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

·         लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

कार्यक्रमाविषयी जनजागृतीसाठी गावोगावी प्रभात फेरीचे आयोजन

लातूर, दि. २१ :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने जाणार असून या अनुषंगाने जिल्ह्यात होत असलेल्या जनजागृती उपक्रमांचा व पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. तसेच पुढील दोन दिवस जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरीचे आयोजन करून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास आणि नांदेड येथे आयोजित कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी. तसेच परिपाठाच्यावेळी सतिंदर सरताज यांचे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित गीत दाखविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. या कार्यक्रमात शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धा, प्रभात फेरीद्वारे जनजागृती

राज्य समन्वयक समितीने शिफारस केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावरील गीत लातूर जिल्ह्यातील २ हजार ६६६ शाळा व महाविद्यालयांमध्ये दररोजच्या परिपाठात दाखविले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला आहे. यासोबतच १ हजार २९५ शाळांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या इतिहासावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर निबंध स्पर्धा, पथनाट्य, गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्या विद्यार्थ्यांची नावे विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर पाठविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४ सिनेमागृहात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित गीत दाखविले जात आहे. तसेच नांदेड येथील कार्यक्रमाचे माहिती देणारे फलक जिल्ह्यात लावण्यात आले आहेत.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी

 




 सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा घेतला आढावा

 हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक 

नांदेड :- नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सर्व भाविकांची व्यवस्था चोख होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, समितीचे शासकीय समन्वयक डॉ.जगदीश सकवान, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

श्री. परदेशी यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी कार्यक्रमाच्या तयारीबाबत विचारणा केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना केल्या. 

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले की, मोदी मैदानावरील कार्यक्रम ठिकाणच्या परिसरात ५२ एकर मैदानावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात येत आहेत. प्रशासनाने यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मैदानालगत दोन टेन्ट सिटी, त्यामध्ये सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता, हॉटेल्स, शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

गुरुद्वारा बोर्डाचे  प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. श्री. नाईक यांनी हा कार्यक्रम नऊ समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन, समाज मिळून प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा या दृष्टीने जनजागृती व्हावी. यासह शालेय स्तरापासून महाविद्यालयापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिकाधिक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

विशेष वृत्त:अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !



अहिल्यानगर : - नांदेड येथे 'हिंद की चादर' श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या पावन स्मृती पर्वाच्या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात मोलाची भर घालणाऱ्या अहिल्यानगर शहराला लाभलेल्या शीख इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण पर्वावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते. गोविंदपुरा येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' हे स्थान शीख इतिहासातील 'झफरनामा' या निर्णायक घटनेचा थेट साक्षीदार मानले जाते.

इतिहासाच्या पानांवर कोरलेली ही महत्त्वपूर्ण घटना १८ व्या शतकाच्या सुरुवातीची (सन १७०५-०६) आहे. शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांनी स्वतःच्या वडिलांचे व पुत्रांचे मारेकरी ठरलेल्या  तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र पाठविले होते, जे इतिहासात 'झफरनामा' (विजयाचे पत्र) म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची व जोखमीची जबाबदारी गुरु गोविंदसिंगजींनी 'पंच प्याऱ्यां' पैकी एक असलेल्या 'भाई दया सिंगजी' यांच्यावर सोपविली होती.

या ऐतिहासिक घटनेचे धागेदोरे थेट अहिल्यानगर शहराशी जोडलेले आहेत. श्री गुरु गोविंदसिंगजी महाराजांनी बादशहा औरंगजेबापर्यंत झफरनामा पोहोचविण्यासाठी भाई दया सिंगजी यांना पाठविले. भाई दया सिंगजी प्रथम औरंगाबाद येथे आले. तेथे त्यांना समजले की औरंगजेब हा अहमदनगरजवळील आलमगीर येथे आहे. त्यानुसार भाई दया सिंगजी अहमदनगर येथे आले; मात्र त्या वेळी त्यांना औरंगजेबाची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील धवणी महल्ला येथे मुक्काम करून प्रयत्न सुरू ठेवले.

सुमारे तीन ते चार महिने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर भाई दया सिंगजींना अहिल्यानगर येथे खुले दरबारात औरंगजेबाची भेट मिळाली व त्यांनी झफरनामा त्याच्यासमोर सादर केला. त्या काळी औरंगजेब अहमदनगरच्या भिंगार भागात छावणीत होता. त्या छावणीच्या बाहेरील मर्यादेत असलेल्या सध्याच्या गोविंदपुरा परिसरात (अहिल्यानगर) भाई दया सिंगजी, औरंगजेबाची भेट मिळावी व झफरनामा सादर करता यावा यासाठी  थांबले होते.

याच पवित्र भूमीवर, जी भाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झाली आहे, त्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख समाजाने श्रद्धेने व स्वखर्चाने करून आज ती जागा “गुरुद्वारा भाई दया सिंगजी साहिब, गोविंदपुरा, अहिल्यानगर” म्हणून ओळखली जाते.

गुरु गोविंदसिंगजींनी हे पत्र मूळ पर्शियन (फारसी) भाषेत लिहिले असून त्यात एकूण १११ कडवी (शेर) आहेत.'झफरनामा' म्हणजे केवळ एक पत्र नसून ती अन्यायाविरुद्ध पुकारलेली नैतिक विजयाची ललकारी होती. या पत्रात गुरूजींनी चमकौरचे युद्ध, आपल्या पुत्रांचे बलिदान व औरंगजेबाच्या सैन्याने पवित्र कुराण पाठवुन दिलेले शब्द न पाळता केलेला विश्वासघात, यावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. याच पत्रात शीख इतिहासातील प्रसिद्ध ओळ नमूद आहे - कुन् कर अझ हमेह् हील्-ते दार गुज़श्त, हलाल अस्त बुर्दन बा शमशेर दस्त ||२२||

जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये हो, न्याय का मार्ग अवरुद्ध हो, तब तलवार उठाना सही है" (जेव्हा अन्यायाचा प्रतिकार करण्याचे शांततेचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा हाती तलवार घेणे हेच उचित व धर्मसंमत ठरते). विशेष म्हणजे, भाई दया सिंगजींनी हे पत्र दिल्यावर खुद्द औरंगजेबाने त्याचा सकारात्मक स्वीकार केला होता व गुरूजींना सन्मानाने भेटीसाठी आमंत्रित करणारे शाही पत्र जारी केले होते, अशी साक्ष येथील इतिहास देतो.

भाई दया सिंगजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शीख समाजासाठी अत्यंत पवित्र असून, ती एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष देत उभी आहे. हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून, भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे व गुरु गोविंदसिंगजींच्या सर्वोच्च नीतिमत्तेचे प्रतीक आहे. हा अमूल्य ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

विशेष लेख : श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

 


‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती... 

​महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. धर्म, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या दुर्मिळ सन्मानाने गौरवण्यात आले. आपण श्री गुरु तेग बहादूरजींचा ३५० वा शहिदी समागम वर्ष साजरा करत असताना, धार्मिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मानवजातीच्या व मातृभूमीच्या कल्याणाविषयी शिकवण देणाऱ्या त्यांच्या महान आदर्शांना पुन्हा समर्पित करणे आवश्यक आहे. 

​अतुलनीय श्री गुरु तेग बहादूरजींनी आपल्याला निर्भयपणे मुक्त जीवन जगण्याची शिकवण दिली. मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या अत्यंत छळास ते शरण गेले नाहीत, तर दैवी शांततेने तो सहन केला. त्यागमल ते तेग बहादूर असे झालेले त्यांचे परिवर्तन मानवी इतिहासात फार कमी समांतर असलेली धार्मिक दृढता, औचित्य, नैतिकता आणि शौर्याची कथा आहे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण सत्याचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या देवत्वाची अशी शक्ती होती की जेव्हा त्यांच्या शिष्यांना त्यांच्या समोर मारण्यात आले, तेव्हा ते खोल ध्यानात राहिले. जेव्हा त्यांनी स्वतः परम त्याग केला, तेव्हाही ते ध्यानात मग्न होते. श्री गुरु तेग बहादूरजी म्हणाले की धर्म हा केवळ पूजा-पाठ नसून कर्तव्य आहे आणि एक आदर्श जीवनपद्धती आहे. 

​आजच्या तरुण पिढीने श्री गुरु तेग बहादूरजींच्या जीवनातून, चारित्र्यातून आणि त्यागातून प्रेरणा घेऊन मानवता आणि नैतिक मूल्ये अंगीकारण्याची गरज आहे, जेणेकरून भारत पुन्हा विश्वगुरू होईल. अत्याचार आणि अन्यायापुढे झुकण्यास त्यांनी ठाम नकार दिला. त्यांनी आदर्श आणि तत्त्वांच्या मार्गावर चालण्याची निवड केली. काश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ श्री गुरु तेग बहादूरजींना भेटण्यासाठी आजच्या श्री आनंदपूर साहिब येथे आले, ज्याला चक्क नानकी असेही म्हणतात. त्यांचे म्हणणे धीराने ऐकून घेतल्यानंतर, त्यांनी त्यांना औरंगजेबाला किंवा त्याच्या माणसांना सांगण्यास सांगितले की जर त्यांचे गुरू धर्म सोडतील, तरच ते आपला धर्म सोडतील. 

​त्यानंतर औरंगजेबाने केलेले कारनामे इतके भयानक होते की आजही त्यांची आठवण झाल्यावर अंगावर काटा उभा राहतो. श्री गुरु तेग बहादूरजी आणि त्यांच्या तीन भक्तांना -भाई सती दास, भाई मती दास आणि भाई दयाला - बंदिवान करण्यात आले. त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्या उदात्त त्रिकूटांना त्यांच्या गुरूंसमोर फाशी देण्यात आले. त्यांनी धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिले. इ.स. १६७५ मध्ये श्री गुरु तेग बहादूरजींनी अत्यंत शांतपणे हौतात्म्य पत्करले. जुन्या दिल्लीतील चांदणी चौकातील गुरुद्वारा शीशगंज साहिब हे ‘त्याग’ आणि ‘बलिदान’ यांच्या अंतिम गाथेचे प्रतीक आहे, ज्याला मानवी इतिहासात तोड नाही. भाई जैता सिंग यांनी श्री गुरु तेग बहादूरजींचे पवित्र शीश श्री आनंदपूर साहिब येथे नेले, जे जगभरातील शीखांसाठी सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. 

​त्यांच्या बलिदानामुळे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित प्राचीन सभ्यता आणि संस्कृती केवळ नष्ट होण्यापासून वाचली नाही, तर एक दृढ आणि सर्वसमावेशक राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये तो एक ऐतिहासिक टप्पा ठरला. शीख धर्माचा पाया हा मानवी इतिहासातील सामान्य विकास नव्हता, तर तो सर्व प्रकारच्या अत्याचारांविरुद्ध मानवतेची ढाल बनला. ही एक महान परंपरा होती आणि आजही आहे. नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजींनी केवळ लोकांचा धर्मरक्षणाचा संकल्प जपला आणि बळकट केला नाही, तर शीख धर्माला महानतेच्या पुढील स्तरावर नेले. 

​श्री गुरु तेग बहादूरजींना माहीत होते की त्यांच्या भक्तांनी कोणताही पश्चात्ताप न करता धर्मासाठी किंमत मोजली. त्यांनी सर्व मोह नाकारले, सर्व वेदना आणि त्रास सहन केले, पण अश्रू ढाळले नाहीत. धर्मकार्यावरील त्यांची बांधिलकी आणि श्रद्धा अतूट होती. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन हे धर्म आणि मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानांचे सर्वोच्च उदाहरण आहे. औरंगजेबाच्या क्रूरतेपुढे त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही. प्रत्येक प्रश्नाला त्यांचे उत्तर स्पष्ट होते - मी शीख आहे आणि शीखच राहणार! 

​श्री गुरु तेग बहादूरजींच्या शिकवणीतून आणि त्यागातून आपल्याला अनेक आणि बहुआयामी धडे मिळतात. त्यांचा त्याग, सत्यावरील अढळ विश्वास, अहिंसा आणि सर्वांप्रती परोपकारी दृष्टीकोन आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला, जेणेकरून प्रत्येक मानवाला आपल्या आवडीचे जीवन जगता येईल. धर्म हे सर्वांचे कर्तव्य आहे. खरा धर्म आपल्याला सर्वांशी चांगले वर्तन करण्याची आणि समाजाची शक्य तितकी सेवा करण्याची शिकवण देतो. त्यांनी दुर्बल आणि वंचितांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्यांचे पुत्र श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी केवळ वडिलांची तत्त्वे आणि मूल्ये जपली नाहीत, तर खालसा निर्माण करून त्यांना पुढे नेले, जो धार्मिकता आणि न्यायासाठी लढण्याचे प्रतीक आहे. 

​आपण श्री गुरु तेग बहादूरजींचे हे महान वचन सदैव लक्षात ठेवले पाहिजे -“आपण आपले जीवन सुख-दुःखात तसेच मान-अपमानात समान भावनेने जगले पाहिजे.” त्यांच्या शिकवणीतून जीवनाचा उद्देश तसेच समता, समरसता आणि त्याग यांचे महत्त्व अधोरेखित होते. श्री गुरु तेग बहादूरजींचे महान शब्द हे मानवतेसाठी ऊर्जा आणि ज्ञानाचे चिरंतन स्रोत आहेत. गुरूंच्या शब्दांच्या मधुर पठणाचा भक्तांवर खोल परिणाम होत असे. त्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि मानवतावादी मार्गाने निरंकुश व धर्मांध शासकाशी संघर्ष केला. त्यांची शिकवण कालातीत आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन आपल्याला प्रत्येक परिस्थितीला शांततेने आणि खंबीरतेने सामोरे जाण्याची तसेच सौहार्द, न्याय, समता आणि समरसतेवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा देते.                                                                                           

अनिल आलुरकर 

उपसंचालक (माहिती)  विभागीय माहिती कार्यालय, अमरावती


#हिंददीचादर

#गुरुतेगबहादूर 

#शहीदीसमागम 


श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जळकोट आश्रम शाळेत विविध स्पर्धां

 


 धाराशिव : हिंद-दी-चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रमशाळा, जळकोट ता.तुळजापूर,येथे आज २१ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

            या उपक्रमांच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य,मानवता,सहिष्णुता व बलिदानाचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमांतर्गत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ,जळकोटचे विद्यमान सचिव तसेच माध्यमिक आश्रम शाळा,जळकोटचे मुख्याध्यापक श्री.एस.एम.चव्हाण यांनी भूषविले.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.एन.एम.गुरव उपस्थित होते.

            वकृत्व स्पर्धेमध्ये एकूण चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या जीवनकार्य,त्यांचे धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान,तसेच समाजासाठी दिलेला त्याग याविषयी प्रभावीपणे विचार मांडले.

            निबंध स्पर्धेसाठी एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून,त्यांनी गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शौर्य,त्याग व मानवतावादी विचारांवर सविस्तर लेखन केले.गीत गायन स्पर्धेमध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण केले.

            यावेळी विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपर डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली.या चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शहीदीचे ऐतिहासिक महत्त्व,३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य आणि आजच्या समाजात त्यांच्या विचारांचे असलेले महत्व समजावून सांगण्यात आले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एस.एम.चव्हाण यांनी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानामुळेच भारतात सर्व धर्मांना समान स्वातंत्र्य लाभले,असे सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन जीवनात सत्य, धैर्य व मानवतेचे मूल्य जपावे,असे आवाहन केले.प्रमुख पाहुणे श्री.एन.एम. गुरव यांनीही गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शौर्यगाथेचा उल्लेख करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व नैतिक मूल्यांची रुजवण होते,असे मत व्यक्त केले.

            या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण,अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास तसेच सामाजिक व नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली असून,शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

#गुरुतेगबहादूर 

#हिंददीचादर

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम पथनाट्यातून मांडली श्री गुरु तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा लातूर जिल्हास्तरीय शालेय पथनाट्य स्पर्धेत ३४ विद्यार्थ्यांचा सहभाग

 




लातूर, : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ‘हिंद दी चादर’ पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून श्री गुरु तेग बहादूरजी यांची जीवनगाथा उभी केली. हा उपक्रम श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अमर बलिदानाची आठवण करून देणारा आणि धार्मिक सहिष्णुता, मानवतावाद व धैर्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा ठरला.
या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय, औसा तालुक्यातील सेलू येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, भादा येथील जिल्हा परिषद प्रशाला, लामजना येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा यासह इतर शाळातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप नागरगोजे, स्पर्धेचे समन्वयक सतीश भापकर, परीक्षक विजय म्हस्के व हरी कुंभार यावेळी उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादूरजींना "हिंद दी चादर" अर्थात भारताची ढाल म्हणून ओळखले जाते, त्यांनी सहिष्णुता, मानवतावादासाठी आपले बलिदान दिले. त्यांच्या शहीदीला ३५० वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जनजागृतीसाठी लातूर शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.