Followers

Wednesday 30 October 2019

लातूर विभागात एकता दौड ची तयारी पूर्ण


लातूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस  म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय,  शाळा,  महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड,  आणि हिंगोली अशा चारही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि.31 ऑक्टोबर रोजी ‘एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर येथून गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर 2019  रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला टाऊन हॉल येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे.ही यशस्वी करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि विविध विभागांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 वाजता ही दौड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून सुरु होवून बार्शी नाका-लेडीज क्लब-छ.शिवाजी हायस्कूल-काळा मारुती चौक-ताजमहल टॉकीज-शिवाजी पुतळा या मार्गाने जावून पोलीस मुख्यालय येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. जिल्हाभर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा, राष्ट्रीय एकतेची शपथ तसेच उस्मानाबाद येथे राष्ट्रीय एकता दौड,संचलन,जनजागृतीपर कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद, कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, रोटरी क्लब, आर्ट ऑफ लिव्हिंग, मराठवाडा साहित्य परिषद शाखा,उस्मानाबाद, एकता फाऊंडेशन तसेच उस्मानाबाद शहरातील युवा मंडळ,क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचा सहभाग असणार आहे. 
 नांदेड येथे सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार असून जुना मोंढा टॉवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी आवाहन केले आहे.
हिंगोली येथून सकाळी 7 वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला अग्रसेन चौक ( नांदेड नाका ) येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड बस स्थानक-इंदिरा गांधी चौक-महेश चौक मार्गे महात्मा गांधी चौक येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. 

No comments:

Post a Comment