Followers

Tuesday 25 December 2018

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक संपन्न



उस्मानाबाद ,दि,25:-   दुष्काळी परिस्थितीत पाणी ,गुरांना चारा व ग्रामीण भागातील मजूरांचे स्थलांतर अशा विविध विषयांबाबत जिल्हा प्रशासन करीत असलेल्या तयारीची आढावा बैठक विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिंगोली येथील विश्रामगृहामध्ये संपन्न झाली.
       या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनूप शेंगुलवार,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी रामचंद्र चोबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख,स्वप्नील मोरे,विठ्ठल उदमले,जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे हे उपस्थित होते.
      यावेळी विभागीय आयुक्त श्री.भापकर यांनी टंचाईसंदर्भात विविध बाबींचा आढावा घेताना मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष त्या-त्या गावात जाऊन पाहणी करावी, अधिग्रहित विहिरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसांपर्यंत पुरेल तसेच जिथे टॅंकरने पाणीपुरवठा होत असेल त्या गावातील पाणीसाठयासाठी उपलब्ध असलेली विहीर,हौद किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुध्द आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी. गाळपेर्‍याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यांपर्यंत हिरवा चारा पुरेल,हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपेर्‍यासाठी  अधिग्रहित केले आहे? या क्षेत्रात बाजरी,ज्वारी,मका या बियाणांची पेरणी करुन जनावरांसाठी  हिरवा चारा निर्माण करावा. 5 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चार्‍यासाठी उपलब्ध झाले पाहिजे म्हणजे चार्‍याची टंचाई भासणार नाही. रोजगार हमी योजनेवर जास्तीत जास्त मजूरांना काम द्यावे म्हणजे मजूरांचे स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबर महिना संपण्याच्या आत गावांमध्ये ग्रामसभा घेऊन  व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदारांमध्ये प्रात्याक्षिकाव्दारे जनजागृती करावी,त्यामुळे गावातील किती ग्रामस्थ व विद्यार्थी स्थलांतरीत झाले आहे,याचा नेमका अंदाज येईल. पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुलांचे वाटप झाले? शेततळयाचे दिलेले उद्दिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी 10 विहिरींचे काम झाले  तर येणार्‍या काळात पाणी टंचाई भासणार नाही,यासाठी शासनाने दिलेली उद्दिष्टये वेळेत पूर्ण करावेत,अशा  आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
        यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेट्टे, जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी श्री. गायकवाड,  जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता श्री.जगताप  पाणीपुरवठा विभागाचे श्री. देवकर, सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. काळे-गोरे, कार्यकारी अभियंता श्री.मरकड,जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री.पांडव, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.पाटील, कृषी उपसंचालक श्री.चोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सर्व तहसिलदार तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते.


विभागीय आयुक्तांनी प्रात्यक्षिकाव्दारे जाणून घेतली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती


     उस्मानाबाद,दि.25 :- आगामी लोकसभा निवडणूक-2019 साठीच्या निवडणुकीत वापरण्यात येणार्‍या नवीन M-3 प्रकारच्या  मतदारयत्रांच्या (ईव्हीएम व व्हीव्हीपॅट) मशीनची माहिती प्रात्यक्षिकाव्दारे आज विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी जाणून घेतली.
           नवीन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनव्दारे प्रत्यक्ष मतदान कसे होणार? त्याविषयी सखोल माहिती जनतेला व्हावी यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या वेळी या मशीनवर मतदान कसे करायचे, हे मतदारांना समजले पाहिजे, त्यासाठी मतदारांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी अधिकार्‍यांनी झटून प्रयत्न करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या. 
        भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण व प्रात्याक्षिकाचे आयोजन शिंगोली येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी,तहसिलदार विजय राऊत तसेच निवडणुकीच्या कामकाजाशी संबधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजणी करुन दाखविली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे, त्यानंतर ही चिठ्ठी या मशीनच्या बॉक्समध्ये संकलित होणार आहे,असे सांगितले.
             ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदारसंघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकांच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदान केंद्रांवर अशा विविध ठिकाणी प्रात्याक्षिकाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वांनाच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे,काही अडचण येणार नाही,असेही श्री.श्रींगी यांनी यावेळी सांगितले. प्रात्यक्षिकादरम्यान मशीनमध्ये मतपत्रिकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह ) यासाठी सांकेतिक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता. या बैठकीस अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार  मोठया संख्येने उपस्थित होते.

Monday 17 December 2018

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’


प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्षम सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉटसॲप क्रमांकावर दि. 28 डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
इच्छूक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडेही दि. 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.

Friday 14 December 2018

पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते 16 मराठा जातीचे प्रमाणपत्र देऊन प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ




*निलंगा तालुक्यातील सावनगीरा येथील प्रगती सोळुंके ह्या विध्यार्थ्यांनीला पहिलं मराठा जात प्रमाणपत्रचा मान

     लातूर, ता. 14  : मराठा समाजाला  आरक्षण देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश शासनाने सर्व यंत्रणेला दिले. त्याचाच एक भाग म्हणून कामगार कल्याण,कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा तालुक्यातील 16 युवकांना  आज मराठा जातीच्या   जात प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करून मराठा जात प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री निलंगेकर यांच्या हस्ते प्रगती सोळुंके (सावनगीरा ता निलंगा) या विद्यार्थ्यांनिस लातुर जिल्ह्यातुन मराठा जातीचे पहिले जात प्रमाणपत्र मिळण्याचा मान मिळाला.

       महाराष्ट्र शासनाने प्रथमच अधिसूचना काढून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठ्या प्रमाणात आधिकारी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली असून त्यात मराठा समाजासाठी आरक्षित जागा दिल्यामुळे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या युवकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. निलंगा मतदार संघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून मराठा जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात प्रगती सोंळूके (सावनगिरा), उमेश सोंळूके (सावनगिरा). जयश्री जाधव( दापका), शुभम माने (अनसरवाडा), नामदेव सूर्यवंशी( माकणी), शिवनंदा आरीकर (निलंगा), माधव सुभेदार( निलंगा), वासूदेव कदम (खडकउमरगा) अशा 16 विध्यार्थांना मराठा जातप्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय आधिकारी विकास माने, तहसीलदार विक्रम देशमुख, नायबतहसीलदार सौदागर तांदळे, दगडू सोंळूके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे  आदी उपस्थित होते. 
  मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णय असून हे आरक्षण सर्व कायदेशीर बाबीचा आभ्यास करून देण्यात आले आहे. या आरक्षणाचा समाजातील विद्यार्थी तसेच तरूण युवकांनी मोठया प्रमाणावर  लाभ घ्यावा, असे अवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

Thursday 6 December 2018

पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरते मुत्रालयाचे लोकार्पण


* महिलासाठी दोन फिरते मूत्रालय लवकरच सुरु होणार
* लातूर शहरातील सर्व शौचालयांचे एका महिन्यात लोकार्पण करणार
       



    लातूर,दि.6:- लातूर शहरातील नागरिकांना  सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची  सुविधा नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. स्वच्छ भारत अभियानांतर्गत  फिरते मुत्रालय (मोबाईल युरिनल व्हॅन )  आज पासून सुरु करण्यात येत असून या फिरते मुत्रालयाचे  लोकार्पण कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांच्या हस्ते आज येथे झाले.
     भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नंदी स्टॉप येथे  फिरते मूत्रालय लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे प्रभागातील सर्व नगर सेवक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
       या फिरते मूत्रलयामुळे लातूर शहरातील व बाहेरुन येथे येणाऱ्या नागरिकांसाठी  चांगली सुविधा निर्माण झाली असून लवकरच फक्त महिलांसाठी ही दोन स्वतंत्र फिरते  शौचालय सुरु केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री  निलंगेकर यांनी दिली. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व बाजारपेठेच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधली जात आहेत. या  सर्व शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात असून ही सर्व शौचालयांचे एका महिन्यात लोकार्पण  केले जाणार असून लातूरकरांसाठी व लातूर शहरात जिल्हयातून व इतर ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना शौचालयाची सुविधा मिळणार आहे. तसेच लातूर शहर हे सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाईल. या स्वच्छता अभियानात सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी यावेळी केले.
       फिरते मूत्रालयाची संकल्पना ही नावीन्यपूर्ण असून कदाचित  राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग असेल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगून या सुविधेचा नागरिकांनी  लाभ घेऊन आपलं शहर स्वच्छ ठेवावे, असे त्यांनी म्हटले. यावेळी खासदार डॉ. गायकवाड यांनी  या उपक्रमाचे कौतूक करुन केंद्रीय स्तरावरुन मदत देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक शैलश कुलकर्णी यांनी केले तर आभार श्री. पत्की यांनी मानले.

Wednesday 5 December 2018

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ सात हजार नऊशे बासष्ट कोटींची आवश्यकता - कृषी सचिव एकनाथ डवले



औरंगाबाद दि. 5 (जिमाका)- गेल्या काही वर्षापासून सातत्याने अनियमित पावसामूळे राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ  7 हजार नऊशे बासष्ट  कोटी 63 लाख रु.निधीची आवश्यकता  असल्याचे राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकासोबत दुष्काळ परिस्थितीबाबतची आढावा बैठक पथकाच्या प्रमुख श्रीमती छावी झा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली ,त्यावेळी श्री.डवले यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर आकडेवारी निहाय माहिती देऊन दुष्काळी परिस्थितीला यशस्वीरित्या हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना व निधीबाबतची माहिती दिली.बैठकीस इंटर मिनिस्टरीयल सेंट्रल टिम (आयएमसीटी)अतंर्गत येणा-या पथकाच्या प्रमुख केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव श्रीमती छावी झा,कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए.के.तिवारी, केंद्रिय जलसमितीचे  संचालक आर.डी.देशपांडे, केंद्रीय कृषी विभागाच्या डॉ.शालिनी सक्सेना, सुभाष चंद्र मीना ,एफसीआयचे ए.जी.टेबुंर्णे,विजय ठाकरे,नीती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी,वरिष्ठ सल्लागार एस.सी.शर्मा,एस.एन.मिश्रा, ,राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंघ,प्रशांत राजणकर, , औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, नाशिक विभागाचे आयुक्त राजाराम माने, पुणे विभागाचे आयुक्त दिपक म्हैसकर, यांच्यासह उपसचिव एस.एच.उमराणीकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर    यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.डवले यांनी राज्यात बहुतांश भागात गेल्या काही वर्षापासून सातत्याने कमी पर्जन्यमानामूळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षातील पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये अपु-या पावसामुळे कोकण,नाशिक,पुणे,औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या विभागातील एकूण 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यातील 13984 गावांत पाण्याची पातळी खालावलेली आहे. अनियमित आणि कमी पावसामूळे रब्बीचा पेरा ही  कमी  झाला आहे.त्यामुळे चा-याच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे.अवेळीच्या आणि तुरळक पावसामुळे खरीप उत्पन्न 73 टक्के कमी झाले असून फळबागाही सुकुन गेल्या आहेत.पिकांची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने शेतक-यांच्या उत्पन्नात त्यामुळे मोठ्याप्रमाणात घट आलेली आहे.या परिस्थितीला बदलण्यासाठी ,पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी राज्य शासनास कृषी अंर्तगत शेतक-यांच्या सहाय्या करिता 7103.79 कोटी रु. तसेच  पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी 105.69 कोटी रु.निधीची मागणी असून राज्य शासनाने जूलै ते सप्टेंबर 2018  या कालावधीत 15.12  कोटी रु टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्यावर खर्च केले आहे तर जून 2019 पर्यंत टॅंकरसाठी  अंदाजे 202 .53 कोटी निधीची आवश्यकता भासणार आहे तसेच चारा  उपलब्धतेच्या दृष्टीने जून 2019 पर्यंत चारा छावण्यांसाठी 535 कोटी 50 लाख  खर्च अपेक्षित असून  या सगळ्यांसाठी एकुण 7962.63 कोटी रु.निधीची आवश्यकता असल्याचे श्री.डवले यांनी बाबनिहाय स्पष्ट केले.
राज्य शासनाने बळीराजा संजीवनी योजनेतंर्गत आठ मोठे ,मध्यम आणि 83 लघु सिंचन प्रकल्प राज्यात सुरु असून या प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर अतिरिक्त सिचंन क्षमतेत 3.77 लाख हेक्टरची भर पडेल तसेच पंतप्रधान शेती सिंचन योजनेतंर्गत राज्यात 26 मोठे,मध्यम प्रकल्प कार्यरत असून त्यांच्या पूर्ततेनंतर अतिरिक्त 5.57 लाख हेक्टर क्षेत्र वाढ होईल.तसेच या दुष्काळी परिस्थिती मनरेगा योजनेतंर्गत 5 लाख 26 हजार कामे शेल्फवर असून 36 हजार 458 कामे सुरु आहेत त्यात एक लाख 70 हजार 821 इतके मजूर कामावर आहेत, असेही श्री.डवले यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी यावेळी मराठवाड्यातील एकुण 33.71 लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळ बाधीत  झाले असून 47 तहसिलमधील 5303 गावे दुष्काळांने प्रभावित झालेली आहेत.विभागातील 421 मंडळांपैकी 313 मंडळात 75 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.चारापिकाची तसेच पिण्याच्या पाण्यीची टंचाई परिस्थिती गंभीर असून खरीप 2018 मध्ये 48.61 लाख हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.सद्यस्थितीत 23 टक्के पाणीसाठा शिल्लक असून 520 टॅंकर सुरु असल्याची माहिती यावेळी दिली.पुणे तसेच नाशिक विभागातील पाणीसाठा,पिक परिस्थिती,पर्जन्यमानाबाबत संबंधित आयुक्तांनी आकडेनिहाय सविस्तर माहिती यावेळी दिली.
सुत्रसंचलन उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर यांनी केले.आभार उपायुक्त वर्शा ठाकूर यांनी व्यक्त केले.विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हा प्रशासन तसेच सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते

Monday 3 December 2018

प्रत्येक व्यक्तींनी दिव्यांगाचा सन्मान करावा-जिल्हाधिकारी जी.श्रीकांत






      लातूर,दि.3:- प्रत्येक व्यक्तींनी  दिव्यांगाची  वेदना ओळखून  दिव्यांग व्यक्तीचा सन्मान करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जागतिक अपंग दिना निमित्त्‍ जिल्हा नियोजन समिती सभागृह आयोजित कार्यक्रमात केले.
     सुलभ निवडणूकाकार्यक्रमातंर्गत  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत  आयोजित  कार्यक्रमात बोलत  होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे  मुख्यकार्यकारी अधिकारी  डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिकेचे  आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर,उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी रामेश्वर रोडगे, जि.प. चे समाज कल्याण अधिकारी श्री.मिनगीरे, तहसिलदार  अविनाश कांबळे उपस्थित होते.
     या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत  म्हणाले की, लोकशाहीमध्ये  प्रत्येक समस्येला उत्तर देणे महत्वाचे आहे. दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी  स्वंयसेवी संस्थे बरोबरच सर्वांनी पूढे यावे, तसेच यापुढे दिव्यांगासाठी  प्रत्येक कार्यक्रम  तळमजल्यावरच ठेवण्याचा संबंधितांना सुचना केल्या व समाज कल्याण विभागाने परिपत्रक करुन  प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याने  दिव्यांग व्यक्तींची  भेट घ्यावी  अशा सुचना दिल्या. या पुढे दिव्यांगाच्या प्रत्येक मुकबधीर/कर्नबधीर कार्यक्रमास ट्रान्सलेटर ठेवावा असेही त्यांनी  सूचित केले.
      यावेळी जिल्हयातील  नवीन दिव्यांग मतदार झालेल्या मतदारांना मतदान कार्ड देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हयातील दिव्यागांसाठी  काम करणाऱ्या  सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा व दिव्यांग खेळाडूंचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र देवून  सत्कार करण्यात आला.
    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटानकर,आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सेवाभावी संस्थेचे अण्णा कदम यांचे दिव्यांगाच्या प्रति मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी (निवडणूक )  प्रताप काळे यांनी तर कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन सुनिता कुलकर्णी यांनी  केले आभार तहसिलदार अविनाश कांबळे यांनी मानले.
      दिव्यांगाच्या प्रति प्रशासनातर्फे दिव्यांग रॅली :-  जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने  जिल्हा क्रिडा संकुल ते जिल्हा परिषद यशवंतराव सभागृह पर्यंत  रॅली  काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन जि.प.चे अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प.चे  मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
      या रॅलीत  शहरातील अपंग शाळेचे विद्यार्थी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी प्रशासनातील,अधिकारी, कर्मचारी  तसेच पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे उद्घाटन
अकोला, दि. 3 : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढयामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाचे कॅन्सर केअर हॉस्पीटलचे          उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पीटलच्या अध्यक्षा श्रीमती टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती. तसेच उद्घघाटनाप्रसंगी महापौर विजय अग्रवाल, आमदार बळीराम सिरस्कार, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदींची उपस्थित होती.
कुटुंबात कुणाला कॅन्सर झाल्यास तो रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उध्दवस्त होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडीही विस्कटून जाते. अशा परिस्थितीत कुटुंबाला मानसिकतेसह आर्थिक आधार देणे गरजेचे असते. राज्य शासन हे महात्मा फुले जनआरोग्य अभियान व केंद्र सरकारच्‍या आयुष्यमान भारत या योजनेतून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णाला सहाय्य करते.
ते पुढे म्हणाले, विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. या कर्करोगाच्या प्रकारापासून समाजाला मुक्त करण्यासाठी मोठया प्रमाणावर जाणीव जागृती  होणे आवश्यक आहे. शासनाने गत कालावधीत मुख कर्करोग तपासणी मोहिमही राबविली. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आता परदेशात किंवा मेट्रो शहरामध्ये जाण्याची गरज नसून अकोल्यासारख्या शहरात ही सुविधा रिलायन्सने उपलब्ध करुन दिली आहे. कुठलेही काम समर्पित भावनेने केल्यास ते निश्चितच फळाला येते हे येथे दिसून येते.
प्रास्ताविकात श्रीमती टिना अंबानी म्हणाल्या, रिलायन्सने अकोला शहरात कॅन्सरवर उपचार करणारे आधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कॅन्सर पिडीत रुग्णांनी उपचार घ्यावेत. यानंतर पुढच्या टप्प्यात रिलायन्स सोलापूर व गोंदीया येथे कॅन्सर चिकित्सा रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी मिळत असलेल्या राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. राम नारायन यांनी केले. कॅन्सर हॉस्पीटलमध्ये असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Tuesday 27 November 2018

जिल्ह्यातील एकही बालक गोवर- रूबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत




लातूर,दिनांक 27:- जिल्ह्यातील 9 महिने  ते 15 वर्षे वयोगटातील एकही बालक गोवर- रूबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची आरोग्य यंत्रणा व पालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले.
            जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय गोवर रूबेला लसीकरण शुभारंभ जिल्हा परिषद कन्या शासकीय वसाहत शाळेत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवदास काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन ईटनकर,अधिव्याख्याता डॉ. राजाराम पवार,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, आय. एम. ए.चे डॉ. भऱ्हाटे उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, गोवर-रूबेला लसीकरण कार्यक्रम जिल्हाभरात सहा आठवडे चालू राहणार आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या बालकास लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी  केले.  या लसीकरण शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची कन्या कुमारी शास्वती  व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर  यांचे चिरंजीव आयान यांच्यासह उपस्थित असलेल्य बालकांना लसीकरण करून कार्ड वाटप करण्यात आले.     
            यावेळी महापौर सुरेश पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन ईटनकर, आरोग्य सभापती प्रकाश देशमुख व  नगरसेविका श्रीमती यादव यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती माधुरी वलसे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी मानले. 

Monday 19 November 2018

डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायकरित्या वापरणे गरजेचे - माहिती संचालक यशवंत भंडारे





  औरंगाबाद, दिनांक 16-  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये “डिजीटल पत्रकारिता” ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहे. या माध्यमाची पोहोच आणि गतिमानता ही बलस्थाने लक्षात घेऊन डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केले.

एमजीएम महाविद्यालयाच्या सभागृहात आज जिल्हा माहिती कार्यालय व एमजीएम महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त “डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान” या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक यशवंत भंडारे, दै. सकाळ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड,  एमजीएम महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या संचालिका प्राचार्या डॉ. रेखा शेळके, माहिती अधिकारी वंदना थोरात, मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, यांची उपस्थिती होती. 
श्री भंडारे यावेळी म्हणाले की, समाजाच्या सकस वाढीसाठी लोकशाही मुल्यांची जपवणूक आवश्यक आहे. त्यामध्ये माध्यमांची भूमिका ही सातत्याने महत्वपूर्ण राहिलेली असून त्या पार्श्वभूमिवर डिजीटल माध्यम जे कमी वेळात असंख्यांपर्यंत एखादी गोष्ट, माहिती पोहचवते त्याच्याकडे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक या सर्व दृष्टीकोणातुन बघणे गरजेचे आहे. साधन आणि साध्य याचा योग्य तो मेळ बसवूण त्याचा वापर हा विधायक कामांसाठीच केला जाणे हे भान वापरकर्त्यांनी प्राधान्याने जपणे ही डिजीटल पत्रकारितेसमोरचे आव्हान आहे, असे सांगूण श्री भंडारे म्हणाले की, राष्ट्रउभारणीचे काम करण्यासाठी, त्या कामाला योग्य ती दिशा देण्यासाठी माध्यमांचा प्रामुख्याने डि‍जीटल माध्यमांचा वापर करतांना काही बंधने आणि मर्यादा पाळणे नीतीमुल्यांचा आदर राखणे हे आजच्या काळात जास्त गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने या माध्यमांचा योग्य वापर करावा, असे आवाहन श्री. भंडारे यांनी यावेळी केले.
संपादक संजय वरकड म्हणाले की, प्रसार माध्यम हे प्रदीर्घ काळापासून आपले स्थान अबाधित ठेऊन आहे. या मुद्रीत माध्यमाने डिजीटल माध्यमांशी सांगड घालून बदलत्या काळाचा वेग ग्रहन केला आहे. डिजीटल माध्यम हे आजचे लोकप्रिय माध्यम बनले असून प्रामुख्याने स्मार्टफोनमुळे आज प्रत्येकजन पत्रकार झाला आहे. त्यामुळे माहितीचा प्रचंड साठा आज उपलब्ध होत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुळात पत्रकारिता ही  संकल्पना विस्ताराने समजून घेणे आवश्यक आहे. एकदा ही संकल्पना तिची नीतीमुल्ये समजून घेता आली म्हणजे माध्यम कोणतेही असो इलेक्ट्रॉनिक, डिजीटल, प्रिंट त्या-त्या माध्यमाचा ठराविक ग्राहक समजून घेणे आणि त्यानुसार माहिती देणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमक काय करायच आहे याबाबत ठाम असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करून आपल्या क्षमतांचा विकास करणे आजच्या डिजीटल माध्यमांमुळे सोपे झाले आहे. संधींची संख्या ज्याप्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात स्पर्धाही वाढत आहे. हे लक्षात घेऊन आपल्या इच्छित क्षेत्रामध्ये नीतीमुल्ये जपून काम करावे, असे आवाहन श्री वरकड यांनी यावेळी केले.
श्रीमती भोसले म्हणाल्या की, माध्यमांचे काम प्रबोधन करणे हे आहे मात्र त्यासाठी आपल्याकडे असलेल्या माध्यमाचा योग्य वापर करण्याची ठाम भूमिका पत्रकारांनी  घेणे हे आजच्या काळात गरजेचे आहे. विशेषत: डिजीटल माध्यमासारख्या क्षेत्रात काम करत असतांना हे तंत्रज्ञान नेमक कस वापरायचं, कुणासाठी वापरायचं, यातून काय साध्य होणार आहे याचा फारसा गांभिर्याने विचार न करता आज व्हॉट्सअप वरून सर्रास मेसेज, व्हिडीओ यांच्या प्रसारणातुन समाजावर नेमका काय परिणाम होईल याचे गांभिर्य लक्षात न घेता एकमेकांना पाठवले जातात. हे सामाजिक स्वाथ्याच्या, सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. हे लक्षात घेऊन डिजीटल माध्यम हाताळले पाहिजे. फेकन्यूजबाबत दक्षता घेऊन प्रत्येकाने आपण माध्यम वापरतोय की आपला वापर केला जातोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे श्रीमती भोसले यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी केले. सूत्रसंचलन माहिती सहायक श्याम टरके यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. विशाखा गारखेडकर, प्रा. श्रीमती सोनी, प्रा. श्रीमती देशपांडे यांच्यासह प्रत्रकार बांधव, विद्यार्थी उपस्थित होते

Sunday 18 November 2018

लातूर-पंढरपूर कार्तिकी स्पेशल रेल्वेचा खा.सुनील गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ


    
          लातूर दि.19:- जिल्हयातील भाविक-भक्तांना  कार्तिकी एकादशी  निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी लातूर-पंढरपूर  कार्तिकी  रेल्वेचा शुभारंभ  खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
    या कार्तिकीचे  स्पेशल रेल्वे  शुभारंभ कार्यक्रमास महापौर सुरेश पवार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार  समितीचे सदस्य निजाम शेख , बालाजी पाटील चाकूरकर, गुरुनाथ मगे,नागनाथ सरवदे, विजय कुमार गायकवाड, लातूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक विमलकुमार तिवारी, पी.के. मिश्रा, श्रीकांत रंगनाथ उपस्थित होते.
      यावेळी खासदार सुनील गायकवाड म्हणाले की, कार्तिकी एकादशी  निमित्त्‍ लातूर येथून कार्तिकी स्पेशल रेल्वे बरोबरच बिदर-पंढरपूर, अदिलाबाद-पंढरपूर रेल्वे गाडया खास भाविक भक्तांची सोय व्हावी म्हणून  सुरु केलेल्या आहेत. तरी या सुविधेचा  सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार गायकवाड यांनी केले.

Friday 16 November 2018

राज्य वीज वितरण कंपनीने टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन सूक्ष्म आराखडा सादर करावा-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर


* शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांचा पालकमंत्र्यांकडून सविस्तर आढावा
* कृषि विभागाच्या आरोग्यवर्धक ज्वारीचे  पदार्थ घडीपत्रिकेचे विमोचन
* लोकराज्य मासीकाच्या माहे नोव्हेंबर 2018 च्या अंकाचे विमोचन

         



      लातूर,दि.16:-  टंचाई काळात राज्य वीज वितरण कंपीनीच्या  डीपी नसणे, डीपी करिता  ऑईल नसणे व वीज पुरवठा  खंडित होणे  या कामांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष  निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  संभाव्य टंचाई  कृती आराखडयाप्रमाणे  वीज विभागाचा सूक्ष्म आराखडा स्वतंत्रपणे सादर करावा , असे निर्देश कामगार कल्याण,कौशल्य विकास,भूकंप पुनर्वसन,माजी सैनिक कल्याण  मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आयोजित जिल्हा आढावा बैठकीत श्री. निलंगेकर  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत , पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, मनपा आयुक्त  कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. संजय ढगे, आत्मा प्रकल्प संचालक डी. जाधव, आदिसह सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
 पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की,राज्य वीज वितरण विभागाने  जिल्हयातील सर्व पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती घ्यावी. टंचाई काळात  ज्या गोष्टी प्राधान्याने  करणे गरजेचे आहे अशा कामांचा सूक्ष्म  आराखडा तयार करुन  त्या  कामांना अधिक प्राधान्य दयावे, जेणे करुन  नागरिकांना वीज विभागाकडून  योग्य व वेळेत  सेवा उपलब्ध्‍ होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही  पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे त्यांनी सूचित केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंची सर्व कामे अधिक गतीने पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून अडचणी  निर्माण होत असतील तर  संबंधित तहसिलदार  व बीडीओ नी लक्ष घालून  सामंजसपणे आडचणी सोडवाव्यात, अशी सूचना श्री. निलंगेकर यांनी केली. त्याप्रमाणेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे त्या त्या गावांत त्वरित  उपलब्ध्‍ होतील याबाबत दक्षता घ्यावी, असे ही त्यांनी निर्देशीत केले.
 मागेल त्याला शेततळे योजनेत दिलेले उदिष्ट हे किमान आहे. त्यामुळे  यंत्रणांनी जास्तीत जास्त शेततळे  शेतकऱ्यांनी  घ्यावीत यासाठी प्रयत्न करावेत. शेततळे मुळे पिकांना  संरक्षित पाणी उपलब्ध्‍ होऊन पिकांची  उत्पादकता ही वाढत आहे., असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. अमृत योजनेंतर्गत लातूर महापालिकेने  सर्व कामे डिसेंबर 2018 अखेर पर्यंत  पूर्ण करुन  घ्यावीत, अशी सूचना त्यांनी केली.
 जलयुक्त शिवार अंतर्गत जे गावे जलपरिपूर्ण झालेली आहेत त्या गावांत पून्हा पाणी टंचाई होणार नाही या बाबत दक्षता घ्यावी. तसेच पूर्ण  झालेल्या सर्व कामांचे जिओ टॅगिंग करावे. व जलयुक्तच्या कामांचा गावनिहाय कशा पध्दतीने सकारात्मक  परिणाम झाला त्याची माहिती ही संकलित करावी,अशी सूचना श्री. निलंगेकर यांनी केली. त्याप्रमाणेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी  घरकूल योजनेअंतर्गत एकही  पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
 जिल्हयातील सर्व साखर कारखान्यांनी  जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप माहे फेब्रुवारी  2019 पर्यंत केले पाहीजे, या बाबत जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, असे निलंगेकर यांनी सांगितले. तसेच चारा उपलब्धतेबाबत योग्य ती काळजी  घेऊन हिरवा चारा  शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित करावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
 प्रारंभी  जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सादरीकरणाव्दारे सर्व शासकीय योजनांची माहिती सादर केली. लातूर शहराला जून 2019 अखेर पर्यंत पूरेल इतके पिण्याचे पाणी  उपलब्ध्‍ असून आजपर्यंत  जिल्हयात एक ही टँकरची मागणी आलेली नाही. तसेच विहिर अधिग्रहण प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी यांनी चार दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
   ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी  ठिंबक सिंचनाचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले जात असून याबाबत  साखर कारखान्यांनाही ठिंबक नाही तर ऊस गाळप न करण्याबाबत लेखी कळविण्यात  येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून प्रधानमंत्री  सुक्ष्म  सिंचन योजनेतून मागेल त्याला ठिंबक संच पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पर्जन्यमान ,पाणी साठा, पिक परिस्थिती, बोंड अळी अनुदान, जलयुक्त शिवार  अभियान, प्रधानमंत्री घरकूल आवास योजना, अमृत योजना ,संभाव्य टंचाई आराखडा, चारा उपलब्धता ,नरेगा,सिंचन विहिर, मागेल त्याला शेततळे, शौचालये,मुद्रा, शिष्यवृती योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुद्रा अदिंची सविस्तर माहिती  सांगितली. तर या सर्व योजना अधिक काटेकोरपणे राबविण्याचे  आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी सर्व यंत्रणा प्रमुखांना करुन त्याबाबत साविस्तर मार्गदर्शन केले.
लोकराज्य अंक व घडिपत्रिकेचे विमोचन :-
 माहिती व जनसंपर्क विभागामार्फत  लोकराज्य मासीक प्रकाशित केले जाते. या मासीकाच्या माहे नोव्हेंबर 2018 रोजीच्या  दीपोत्सव महाराष्ट्राच्या प्रगतीचा या अंकाचे विमोचन पालकमंत्री संभाजी पाटील  निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रमाणेच राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2018-19 अंतर्गत  कृषि विभागाने  निर्माण केलेल्या आरोग्यवर्धक  ज्वारीचे पदार्थ या घडिपत्रिकेचे विमोचन ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

Monday 12 November 2018

महिला बचत गटांना जनावरांसाठी चारा डेपो देणार -पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर




लातूर,12:- राज्यात बहुतांश तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या भागातील जनावरांसाठी  लागणारा चारा डेपो महिला  बचत  गटांना प्राधान्याने चारा डेपो देण्यात येतील  असे प्रतिपादन  पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केली.
      लोदगा ता.औसा  येथील  पशु सर्वरोग निदान शिबीर व पशुसंर्धन  दवाखाना उद्घाटन  कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषिमूल्य आयोगाचे  अध्यक्ष पाशा पटेल, कन्हेरी  मठ कोल्हापूर  येथील  काडसिध्देश्वर स्वामी,परभणी येथील पशुसंवर्धन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.मार्कंडे ,प्रादशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एन.सूर्यवंशी,पशुवैद्ययक तज्ञ डॉ. अनिल भिकाने जिल्हा परिषदचे डॉ.बोधनकर  उपस्थित होते.
     यावेळी मार्गदर्शन करताना  पशुधन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय  मंत्री महादेव जानकर म्हणाले की, राज्यात यापुढे  जलयुक्त्‍शिवार   सारखीच  चारायुक्त शिवार  योजना चालू करण्यात येत आहे. आपले गाव सुजलाम –सुफलाम  करण्यासाठी  सर्वानी एकत्र  येऊन गटशेती करावी व दुग्धविकास  कार्यक्रम राबवावा शासन  आपल्या पाठीशी  खंबीरपणे उभे आहे.
    राज्यातील  शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा कमी  पडू  दिला जाणार नाही. पशुसंवर्धन विभागाच्या  सर्व सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. राज्यात शासनाने  पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायासाठी  मोठया प्रमाणात  निधी दिलेला असल्याने  शेतकरी वर्गाने   घाबरुन जाण्याचे काम नाही. शेती व्यवसायाबरोबरच  दुग्धव्यवसायाकडे  शेतकऱ्यांनी  लक्ष दयावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोदगा ता.औसा येथील पशुसंवर्धन चिकित्सालय हे आठवडयातून तीन दिवस चालू राहणार असून यामध्ये तज्ञ डॉर्क्टरांचा  समावेश असेल या दवाखान्यामुळे या भागातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याने  शेतकारी वर्गाने आपल्या पशुधनास वेळेवर उपचार करून घ्यावेत यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, यांची ग्वाही दिली . यावेळी डॉ.सुरेश गंगावणे लिखित आपण दुग्ध व्यवसाईक या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री महादेव जानकर,कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धनाची माहिती विषद करून लोदगा येथे लवकरच  चिलिंग प्लॅन्ट चालू करण्यात  असल्याची माहिती दिली.
         यावेळी कन्हेरी मठ,कोल्हापूर येथील काडसिध्देश्वर स्वामी, पशुवैद्यकिय तज्ञ डॉ.अनिल भिकाने, परभणी येथील पशुधन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.मार्कंडे, प्रादेशिक पशुवसंर्धन सहआयुक्त डॉ.एस.एन.सूर्यवंशी,डॉ.पाचेगावकर व डॉ.गंगावणे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमास लोदग्याचे सरपंच गोपाळराव पाटील,पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी,कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर गोमारे यांनी तर आभार दयांनद उजळंबे  यांनी मानले.

Tuesday 6 November 2018

जनतेत पोलिसांच्या कामातून सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





उस्मानाबाद ,दि. 6 : गुन्हे प्रकरणातील दोषींच्या प्रमाणात वाढ होत असली तरी घरफोडी, मोबाईल व मोटारसायकल चोरी प्रकरणातील मुद्देमालही लोकांना परत मिळाला पाहिजे, या पोलिसांच्या कामातूनच लोकांना सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, यासाठी पोलिस दलाने अत्यंत दक्षपणे काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उस्मानाबाद जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करीत होते.
यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्यासह सर्व विभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागाने गुन्ह्यांची उकल व दोषसिध्दीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. गुन्हे प्रकरणात आरोपपत्र योग्य पद्धतीने दाखल करा व यामध्ये त्रुटी राहता कामा नयेत,  असेही त्यांनी सांगितले. पोलीस विभाग व शासकीय अभियोक्त्यांनी अधिक दक्षपणे काम करावे. त्याप्रमाणेच सर्व सरकारी वकील व पोलिस विभागाने परस्परात योग्य समन्वय राखून दोषसिध्दीचे  प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. दोषसिध्दीचे  प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्या विविध 14 शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून महिलांवरील गुन्हयातील गुन्हेगार, दारू-सट्टा गुन्हेगार यावर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पोलीस स्टेशननिहाय आढावा घेवून गुन्हे प्रकरणातील दोषसिध्दीच्या प्रमाणात  अधिक वाढ करणे गरजेचे आहे, असे सांगितले. महिलांवरील अत्याचार, गुन्हे उकल प्रमाण, अवैध दारू विक्री, सटटेबाजार, घरफोडी,खून, मोबाईल व सायकल चोरी इत्यादी बाबींचा पोलीस स्टेशननिहाय  सविस्तर आढावा घेऊन पोलिस दलाने तपासाचा दर्जा सुधारल्याशिवाय गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढणार नाही, असे सांगून विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी यात लक्ष घालून काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सादरीकरणाद्वारे पोलिस विभागाची माहिती दिली. यावेळी सर्व सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळातील कामांना प्रशासनाने प्राधान्यक्रम दयावा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 2200 कोटींचा निधी देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





उस्मानाबाद,दि.6:- राज्य शासनाने कृष्णा खोऱ्यातील मराठवाडयाच्या हिस्यांचे पाणी मराठवाडयात मिळावे म्हणून बंद पडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुनरुज्जीवन करून 800 कोटींचा निधी देऊन या प्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहेत. यात  प्रामुख्याने टनेल व स्थलरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. उर्वरित कामांसाठी शासन नाबार्डमार्फत 2 हजार 200 कोटी रुपये लवकरच उपलब्ध करून देणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही देऊन दुष्काळातील कामांना प्रशासनाने प्राधान्यक्रम देऊन मिशन मोड मध्ये काम करावे, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार रवींद्र गायकवाड ,आमदार सर्वश्री सुजितसिंह ठाकूर सुरेश धस, विक्रम काळे ,मधुकर चव्हाण, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,दत्ता कुलकर्णी, कैलास पाटील, नितीन काळे, अनिल काळे, मिलींद पाटील, अविनाश कोळी आदींसह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री  म्हणाले की, राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी पर्यावरणीय मंजूरी मिळविण्यात आली. व या प्रकल्पासाठी शासनाने 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गतची कामे वेगाने सुरू आहेत व पुढील कामांसाठीही दोन हजार 200 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजना राबवताना प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे तसेच या काळात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊन चारा नियोजन योग्य पद्धतीने करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना
 चाऱ्यासाठी बी बियाणे उपलब्ध करून देण्याची सूचना केली. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर 2018 पूर्वी पूर्ण झाले पाहिजे. या योजनेचा दर पंधरा दिवसांनी आढावा पालकमंत्र्यांनी घ्यावा तसेच हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात यावी, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी निर्देशित केले. त्यामुळे अमृत योजनेचे महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पूर्ण केले पाहिजे,असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माणाचे उस्मानाबाद जिल्ह्याचे काम 65 टक्के इतकेच असून ते प्रमाण निश्‍चितच कमी आहे. सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011 नुसार जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सात हजार 628 लाभार्थ्यांपैकी 3 हजार 384 घरकुलांना मंजुरी मिळाली असून 2 हजार 913 घरकुले पूर्ण झाली आहेत. या योजनेत कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट नाही त्यामुळे प्रशासनाने सर्व बेघरांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक गतीने काम करण्याचे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले तसेच सामाजिक आर्थिक सर्वेक्षणात समावेश न झालेल्या कुटुंबाचे पुन्हा सर्वेक्षण करून जून 2019 पर्यंत सर्वांना घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
 प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गतही सर्व नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये घरकूल योजनांची गती कमी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नगरपालिका प्रशासनाने याबाबत दक्षता घेऊन जातीने काम करावे तसेच झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या लाभार्थ्यांना दुसरीकडे जागा न देता आहे त्या जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देऊन त्यांना घरकूल बांधून दयावीत.
मागेल त्याला शेततळे योजना सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेली असून दिलेले उद्दिष्ट हे किमान असून या अंतर्गत जास्तीत जास्त शेततळे घेतली पाहिजेत. उस्मानाबाद जिल्ह्याने 3 हजार 717 उद्दिष्टांपैकी 2 हजार 520 शेततळी पूर्ण केली असून हे उद्दिष्टापेक्षाही खूप कमी काम आहे, या कामात अधिक लक्ष घालून मोठ्या प्रमाणात शेततळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कमी पावसात मागेल त्याला शेततळे योजना महत्त्वाची आहे.  या योजनेत शेतकऱ्यांने  एकदा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर  शेतकऱ्याला  अर्ज देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करून शेततळे झालेल्या ठिकाणी सामाजिक आर्थिक चांगला परिणाम होत आहे, असे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्री  म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयातील पाणीपुरवठयाच्या योजनेवर झालेल्या कामांचा निधी नॉर्मसप्रमाणे द्यावा व त्या व्यतिरिक्तचा
 निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून दयावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उमरगा तालुक्याचा जरी दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश झाला नसला तरी अग्रीकल्चर दुष्काळ या प्रकारामुळे उमरगा तालुक्यालाही दुष्काळी तालुक्यासाठी लागू होणाऱ्या उपाययोजना लागू केल्या जातील, असे स्पष्ट केले.तसेच उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात हे शासन यशस्वी ठरले आहे. याबरोबरच उस्मानाबाद आणि पालघर या दोन जिल्हयांमध्ये काऊ क्लब ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. ही संकल्पना या दोन जिल्हयामध्ये  यशस्वी ठरल्यास संपूर्ण राज्यात हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा आवर्जून उल्लेख करुन त्यांच्या कामांची प्रशंसा केली.
जिल्ह्यातील दहा ते बारा हजार नागरिकांनी नरेगांतर्गत शौचालये बांधली आहेत पण काही तरतुदीनुसार शौचालयाचा निधी लोकांना मिळत नाही. या लोकांनी शौचालयाची कामे पूर्ण झाली असल्याने याचे प्रमाणीकरण करून एका महिन्यात यांना निधी देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले. राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ती सर्व कामे दुष्काळी परिस्थितीचा विचार करता मार्च 2019 पर्यंत पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत असे सांगुन श्री. फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व मुद्रा बँक योजनेंतर्गत बँकांकडे आलेल्या सर्व कर्ज प्रकरणांना बँकांनी वेळेत मंजुरी दिली पाहिजे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. समाज कल्याण च्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत, कोणत्याही प्रकारे शासन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑफलाईन पद्धतीने देणार नाही. या कामात जी महाविद्यालये सहकार्य करणार नाहीत त्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील 917 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करुन या योजनेंतर्गत राज्यातील 30 हजार किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री ग्राम रस्त्यांची अधिक कामे दिली जातील असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत उमरगा बाह्यवळण रस्त्यावरील वीज वितरण कंपनीने पुढील आठ दिवसात विजेचे खांब काढण्याचे अंदाजपत्रक द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान सरासरी 767 मिलिमीटर इतकी असून सरासरी चारशे
 एक्कावन्न मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची 58.7 इतकी टक्केवारी असल्याचे सांगितले. मागील पंधरा वर्षाचा विचार करता जिल्ह्यात नऊ वर्षे पाणीटंचाई होती. मागील वर्षी नऊ गावात दहा टँकर तर यावर्षी उस्मानाबाद तालुक्यात कोळेवाडी गावात एक टँकर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मंडळनिहाय पर्जन्यमान, खरीप पीक परिस्थिती, झालेले शेतीपिकाचे नुकसान, बोंड अळी अनुदान वाटप,जिल्ह्याची सुधारित पैसेवारी 47.30 टक्के, चारा नियोजन, जलयुक्त शिवार व अन्य योजनांच्या माहितीचे सादरीकरण श्री.गमे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. सर्व लोकप्रतिनिधींनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतूक करून या योजनेस 2 हजार 200 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याबददल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करून अभिनंदनही केले.