Followers

Monday 3 December 2018

कॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे उद्घाटन
अकोला, दि. 3 : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढयामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाचे कॅन्सर केअर हॉस्पीटलचे          उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पीटलच्या अध्यक्षा श्रीमती टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती. तसेच उद्घघाटनाप्रसंगी महापौर विजय अग्रवाल, आमदार बळीराम सिरस्कार, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदींची उपस्थित होती.
कुटुंबात कुणाला कॅन्सर झाल्यास तो रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उध्दवस्त होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडीही विस्कटून जाते. अशा परिस्थितीत कुटुंबाला मानसिकतेसह आर्थिक आधार देणे गरजेचे असते. राज्य शासन हे महात्मा फुले जनआरोग्य अभियान व केंद्र सरकारच्‍या आयुष्यमान भारत या योजनेतून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णाला सहाय्य करते.
ते पुढे म्हणाले, विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. या कर्करोगाच्या प्रकारापासून समाजाला मुक्त करण्यासाठी मोठया प्रमाणावर जाणीव जागृती  होणे आवश्यक आहे. शासनाने गत कालावधीत मुख कर्करोग तपासणी मोहिमही राबविली. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आता परदेशात किंवा मेट्रो शहरामध्ये जाण्याची गरज नसून अकोल्यासारख्या शहरात ही सुविधा रिलायन्सने उपलब्ध करुन दिली आहे. कुठलेही काम समर्पित भावनेने केल्यास ते निश्चितच फळाला येते हे येथे दिसून येते.
प्रास्ताविकात श्रीमती टिना अंबानी म्हणाल्या, रिलायन्सने अकोला शहरात कॅन्सरवर उपचार करणारे आधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कॅन्सर पिडीत रुग्णांनी उपचार घ्यावेत. यानंतर पुढच्या टप्प्यात रिलायन्स सोलापूर व गोंदीया येथे कॅन्सर चिकित्सा रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी मिळत असलेल्या राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. राम नारायन यांनी केले. कॅन्सर हॉस्पीटलमध्ये असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment