Followers

Monday 19 November 2018

डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायकरित्या वापरणे गरजेचे - माहिती संचालक यशवंत भंडारे





  औरंगाबाद, दिनांक 16-  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये “डिजीटल पत्रकारिता” ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहे. या माध्यमाची पोहोच आणि गतिमानता ही बलस्थाने लक्षात घेऊन डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केले.

एमजीएम महाविद्यालयाच्या सभागृहात आज जिल्हा माहिती कार्यालय व एमजीएम महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त “डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान” या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक यशवंत भंडारे, दै. सकाळ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड,  एमजीएम महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या संचालिका प्राचार्या डॉ. रेखा शेळके, माहिती अधिकारी वंदना थोरात, मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, यांची उपस्थिती होती. 
श्री भंडारे यावेळी म्हणाले की, समाजाच्या सकस वाढीसाठी लोकशाही मुल्यांची जपवणूक आवश्यक आहे. त्यामध्ये माध्यमांची भूमिका ही सातत्याने महत्वपूर्ण राहिलेली असून त्या पार्श्वभूमिवर डिजीटल माध्यम जे कमी वेळात असंख्यांपर्यंत एखादी गोष्ट, माहिती पोहचवते त्याच्याकडे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक या सर्व दृष्टीकोणातुन बघणे गरजेचे आहे. साधन आणि साध्य याचा योग्य तो मेळ बसवूण त्याचा वापर हा विधायक कामांसाठीच केला जाणे हे भान वापरकर्त्यांनी प्राधान्याने जपणे ही डिजीटल पत्रकारितेसमोरचे आव्हान आहे, असे सांगूण श्री भंडारे म्हणाले की, राष्ट्रउभारणीचे काम करण्यासाठी, त्या कामाला योग्य ती दिशा देण्यासाठी माध्यमांचा प्रामुख्याने डि‍जीटल माध्यमांचा वापर करतांना काही बंधने आणि मर्यादा पाळणे नीतीमुल्यांचा आदर राखणे हे आजच्या काळात जास्त गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने या माध्यमांचा योग्य वापर करावा, असे आवाहन श्री. भंडारे यांनी यावेळी केले.
संपादक संजय वरकड म्हणाले की, प्रसार माध्यम हे प्रदीर्घ काळापासून आपले स्थान अबाधित ठेऊन आहे. या मुद्रीत माध्यमाने डिजीटल माध्यमांशी सांगड घालून बदलत्या काळाचा वेग ग्रहन केला आहे. डिजीटल माध्यम हे आजचे लोकप्रिय माध्यम बनले असून प्रामुख्याने स्मार्टफोनमुळे आज प्रत्येकजन पत्रकार झाला आहे. त्यामुळे माहितीचा प्रचंड साठा आज उपलब्ध होत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुळात पत्रकारिता ही  संकल्पना विस्ताराने समजून घेणे आवश्यक आहे. एकदा ही संकल्पना तिची नीतीमुल्ये समजून घेता आली म्हणजे माध्यम कोणतेही असो इलेक्ट्रॉनिक, डिजीटल, प्रिंट त्या-त्या माध्यमाचा ठराविक ग्राहक समजून घेणे आणि त्यानुसार माहिती देणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमक काय करायच आहे याबाबत ठाम असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करून आपल्या क्षमतांचा विकास करणे आजच्या डिजीटल माध्यमांमुळे सोपे झाले आहे. संधींची संख्या ज्याप्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात स्पर्धाही वाढत आहे. हे लक्षात घेऊन आपल्या इच्छित क्षेत्रामध्ये नीतीमुल्ये जपून काम करावे, असे आवाहन श्री वरकड यांनी यावेळी केले.
श्रीमती भोसले म्हणाल्या की, माध्यमांचे काम प्रबोधन करणे हे आहे मात्र त्यासाठी आपल्याकडे असलेल्या माध्यमाचा योग्य वापर करण्याची ठाम भूमिका पत्रकारांनी  घेणे हे आजच्या काळात गरजेचे आहे. विशेषत: डिजीटल माध्यमासारख्या क्षेत्रात काम करत असतांना हे तंत्रज्ञान नेमक कस वापरायचं, कुणासाठी वापरायचं, यातून काय साध्य होणार आहे याचा फारसा गांभिर्याने विचार न करता आज व्हॉट्सअप वरून सर्रास मेसेज, व्हिडीओ यांच्या प्रसारणातुन समाजावर नेमका काय परिणाम होईल याचे गांभिर्य लक्षात न घेता एकमेकांना पाठवले जातात. हे सामाजिक स्वाथ्याच्या, सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. हे लक्षात घेऊन डिजीटल माध्यम हाताळले पाहिजे. फेकन्यूजबाबत दक्षता घेऊन प्रत्येकाने आपण माध्यम वापरतोय की आपला वापर केला जातोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे श्रीमती भोसले यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी केले. सूत्रसंचलन माहिती सहायक श्याम टरके यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. विशाखा गारखेडकर, प्रा. श्रीमती सोनी, प्रा. श्रीमती देशपांडे यांच्यासह प्रत्रकार बांधव, विद्यार्थी उपस्थित होते

No comments:

Post a Comment