Followers

Tuesday 6 November 2018

जनतेत पोलिसांच्या कामातून सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





उस्मानाबाद ,दि. 6 : गुन्हे प्रकरणातील दोषींच्या प्रमाणात वाढ होत असली तरी घरफोडी, मोबाईल व मोटारसायकल चोरी प्रकरणातील मुद्देमालही लोकांना परत मिळाला पाहिजे, या पोलिसांच्या कामातूनच लोकांना सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, यासाठी पोलिस दलाने अत्यंत दक्षपणे काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उस्मानाबाद जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करीत होते.
यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्यासह सर्व विभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागाने गुन्ह्यांची उकल व दोषसिध्दीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. गुन्हे प्रकरणात आरोपपत्र योग्य पद्धतीने दाखल करा व यामध्ये त्रुटी राहता कामा नयेत,  असेही त्यांनी सांगितले. पोलीस विभाग व शासकीय अभियोक्त्यांनी अधिक दक्षपणे काम करावे. त्याप्रमाणेच सर्व सरकारी वकील व पोलिस विभागाने परस्परात योग्य समन्वय राखून दोषसिध्दीचे  प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. दोषसिध्दीचे  प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्या विविध 14 शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून महिलांवरील गुन्हयातील गुन्हेगार, दारू-सट्टा गुन्हेगार यावर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पोलीस स्टेशननिहाय आढावा घेवून गुन्हे प्रकरणातील दोषसिध्दीच्या प्रमाणात  अधिक वाढ करणे गरजेचे आहे, असे सांगितले. महिलांवरील अत्याचार, गुन्हे उकल प्रमाण, अवैध दारू विक्री, सटटेबाजार, घरफोडी,खून, मोबाईल व सायकल चोरी इत्यादी बाबींचा पोलीस स्टेशननिहाय  सविस्तर आढावा घेऊन पोलिस दलाने तपासाचा दर्जा सुधारल्याशिवाय गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढणार नाही, असे सांगून विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी यात लक्ष घालून काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सादरीकरणाद्वारे पोलिस विभागाची माहिती दिली. यावेळी सर्व सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment