नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ यशस्वीपणे संपन्न नांदेड :- ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले.
स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकातील नव्या निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण व डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त डॉ. पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक महेश कोकरे यांच्यासह स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटक यांची उपस्थिती होती डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, “महाराष्ट्र स्टार्टअप धोरणाअंतर्गत राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला सर्वसमावेशक सहाय्य दिले जात आहे. स्टार्टअप परिसंस्था केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे हे राज्याचे स्पष्ट धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले. याच अनुषंगाने, स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करताना केंद्र सरकारने स्टार्टअप मान्यतेची चौकट अधिक सक्षम व भविष्याभिमुख केल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले. नव्या अधिसूचनेनुसार स्टार्टअपसाठी उलाढाल मर्यादा २०० कोटीं रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, डीप टेक स्टार्टअपसाठी स्वतंत्र श्रेणी निर्माण करून त्यांची वयोमर्यादा २० वर्षे आणि उलाढाल मर्यादा ३०० कोटी रुपयांपर्यत निश्चित करण्यात आले आहे. तसेच सहकारी संस्थांनाही स्टार्टअप मान्यतेत समाविष्ट करून कृषी, ग्रामीण आणि समुदायाधारित नवोपक्रमांना नवे बळ देण्यात आले आहे. या धोरणामुळे येणाऱ्या काळात गाव समृध्द होणार असून, यासाठी प्रत्येक गावपातळीवरील नवकल्पना देशपातळीवर न्यायची आहे. यासाठी महाविद्यालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मत डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर 'इनोव्हेशन सिटी' विकसित करण्यात येत असून, ही जगातील एक अद्वितीय संकल्पना ठरणार आहे. स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांना एकाच परिसंस्थेत आणून नवकल्पनांना जागतिक स्तरावर नेण्याचा उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार आहे.”अशी माहिती यावेळी डॉ. पाटील यांनी दिली.
संचालक डॉ. महेश कोकरे यांनी सर्वह इन्क्युबेशन फाऊंडेशन (SARVAH Incubation Foundation) बाबत स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित १०,००० चौ. फूटांच्या नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता क्षेत्र (Innovation & Entrepreneurship Space) ची माहिती देण्यात आली. या माध्यमातून नांदेड व मराठवाडा विभागात एक सक्षम स्टार्टअप व नाविन्यपूर्ण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे असे डॉ. कोकरे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी व स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे सादरीकरण, थेट संवाद सत्र आणि डेमो स्टॉल्सद्वारे पाहणी करण्यात आली. हा संवाद कार्यक्रम नाविन्यपूर्ण विकास, प्रादेशिक उद्योजकता आणि युवकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग असून, नांदेडसारख्या प्रादेशिक शहरांना स्टार्टअप नकाशावर अग्रस्थानी नेण्यास निश्चितच महत्वाचा ठरणार आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

