Followers

Sunday, 1 March 2026

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 


नवी मुंबई :  “हिंद दी चादर” म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, प्रत्येक गुरुद्वारा आणि प्रत्येक वस्तीपर्यंत ‘हिंद दी चादर’चा संदेश पोहोचविण्यासाठी बाबा हरनाम सिंगजी यांनी मोठे कार्य केले आहे. राज्य शासनाने यापूर्वी नांदेड व नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंद दी चादर’ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवी मुंबईतील कार्यक्रमात शीख बांधवांसह विविध समाजघटकांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शीख समाजासाठी सेवाकार्याची संधी साधत विविध प्रसंगी त्यांच्या परंपरा, श्रद्धा आणि योगदानाचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर देशभर ‘हिंद दी चादर’ पर्वाचे आयोजन करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

यावेळी संत परंपरेचे स्मरण करताना त्यांनी पोहरादेवी येथील सेवालाल महाराज तसेच संत नामदेव महाराज यांना वंदन केले. संत नामदेव यांच्या रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये झालेला आहे, ही भारतीय संतपरंपरेच्या व्यापकतेची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत रविदास यांसारख्या संतांच्या विचारांनाही गुरु ग्रंथ साहेबमध्ये स्थान मिळाले आहे, यावरून भारतीय अध्यात्माची सर्वसमावेशकता स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

नववे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहादतीचा विशेष उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, अन्याय आणि अत्याचारांविरोधात उभे राहून त्यांनी दिलेले शहिदत्व भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. “शीश दिया, पर सिर न झुकाया” हीच शीख गुरुपरंपरेची ओळख असून भारताच्या अखंडतेचा तो आधार आहे.

  शीख परंपरेतील नामजप, आराधना आणि लंगर यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, या मूल्यांमधून समाजातील समरसता आणि बंधुभाव दृढ होतो. गुरु गोविंद सिंग यांच्या काळात खालसा पंथाची स्थापना झाली आणि धर्मरक्षणासाठी अद्वितीय त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली. त्यांच्या चारही सुपुत्रांच्या शहादतीनेही या परंपरेला अमरत्व प्राप्त झाले, असे त्यांनी नमूद केले.

आनंदपूर साहिबसारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, अन्यायकारक फर्मानांसमोर न झुकता गुरूंनी दाखवलेले साहस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. नववे गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा संदेश महाराष्ट्र शासन राज्यातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत पोहोचवत आहे, याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

भारताची संस्कृती ‘सर्व धर्म समभाव’ या तत्वावर आधारलेली आहे. ही परंपरा जपण्यासाठी शीख गुरूंनी केलेले योगदान अमूल्य आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहणे हीच खरी देशभक्ती असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यानंतरही देशाच्या सुरक्षेसाठी शीख जवानांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यक्रमांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा ‍हरनाम सिंग जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शाह यांना जफरनामा देऊन सत्कार करण्यात आला.

*महाराष्ट्र आणि पंजाबमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक संबंध* 

*बाबा‍ हरनाम सिंग जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज*

राज्य समन्वय  समितीचे मार्गदर्शक बाबा ‍ हरनाम सिंग म्हणाले की, नागपूर आणि तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेडनंतरचा हा तिसरा आणि सर्वात मोठा कार्यक्रम ऐतिहासिक उत्साहात पार पडला. यावेळी  महाराष्ट्र आणि पंजाबमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला.   

   

            भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज भारतीय संस्कृती सुरक्षित आहे. संत नामदेव महाराज आणि गुरु नानक देव जी यांच्या काळापासून हे दोन्ही प्रांत जोडलेले आहेत.  दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी यांनी पंजाबमधून येऊन नांदेडच्या पावन भूमीवर वास्तव्य केले, ज्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे.


महाराष्ट्र शासनाने अतिशय स्तुत्य निर्णय घेतले आहेत. ब्रिटीश काळापासून सिखलीगर समाजावर लादलेले निर्बंध हटवून त्यांना सन्मानाचे आणि समानतेचे अधिकार देण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


*राज्य शासनाच्या सहकार्याने जनजागरण- शरदराव ढोले*

अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी प्रास्ताविकात संत नामदेव महाराजांच्या पंजाब-महाराष्ट्रातील आध्यात्मिक नात्याचा उल्लेख केला आणि वारकरी, सिंधी, मोहियाल तसेच गुरु नानकांना गुरु मानणाऱ्या विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. उदासीन संप्रदायाच्या सहभागासह महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ९६ रथांच्या माध्यमातून सुमारे २० हजार गावांमध्ये जनजागरण करण्यात आले असून ५०० हून अधिक पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या तीन महिन्यांच्या परिश्रमातून हा भव्य कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश



गुरु तेग बहादूरांच्या शौर्याची परंपरा नवी पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

खारघर : महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितद्वारे दाखविण्यात आला.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले की, गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिब, नांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादूर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

देशभरात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याचे सांगत हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी सांगितला. केंद्र शासन गुरूं संबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्व, स्मृतिचिन्ह टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचे प्रकाशन, तसेच गुरु नानक देव यांचा ५५०वा प्रकाश पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सांगितले की, करतारपूर साहिब कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी सुविधा उभारण्यात आल्या. शीख संघटना आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत सवलती देण्यात आल्या. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम केले. गुरु ग्रंथ साहिबांचे स्वरूप सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे ही आमची जबाबदारी असून ही सेवा करण्याचे आम्हाला सौभाग्य लाभले आहे, असे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या मूल्यांशी जोडली गेली पाहिजे, असे आवाहन केले. इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर

Saturday, 28 February 2026

जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो*- योगगुरू रामदेव बाबा



मुंबई, दि. 28 - वेदवाणी आणि गुरुवाणी मानवतेला मार्गदर्शन करणाऱ्या असून आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो, असा विश्वास योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

खारघर येथे आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमात योगगुरू रामदेव यांनी गुरु परंपरेच्या त्याग, शौर्य आणि अध्यात्मिक वारशाचे स्मरण करून राष्ट्रएकतेचा संदेश दिला. गुरुंनी समाजासमोर महान आदर्श ठेवला असून आपण त्या परंपरेचे वारसदार आहोत, असे सांगत त्यांनी गुरुंच्या मार्गावर श्रद्धा आणि कृतज्ञतेने चालण्याचे आवाहन केले. 

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. यावेळी जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जी, श्री बाबू सिंग महाराज,  श्री शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग जी,  ज्ञानी गुरुदयाल जी,  रघुवीर बाबा,  ग्यानी हरमिंदर साहेब,  प्रधान गुरुविंदर सिंग, हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील  आदिसह विविध संत ग्यानी उपस्थित होते.

या सोहळ्यात सिख समाजासह बंजारा, लबाना, वारकरी, सिंधी, वाल्मीकि आणि उदासीन परंपरेतील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा केवळ मेळावा नसून गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाज एकतेचा संकल्प दृढ करण्याचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व असून धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी गुरुंनी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यागामुळेच सनातन परंपरा आजही टिकून आहे. गुरु नानक देवांपासून गुरु गोविंद सिंह महाराजांपर्यंतची परंपरा हि शौर्य, त्याग आणि अध्यात्माची असल्याचे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.

रामेश्वर नाईक म्हणाले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नाम संगत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ व छत्तीसगडच्या संगतीच्या उपस्थितीत शहीदी समारंभ झाला. त्यानंतर २४ व २५ जानेवारीला नांदेड मधील तख्त श्री हजूर साहिब येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कोकण विभागासह राज्यभरातून आणि देश-विदेशातून आलेल्या संगतीने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेत आहेत . विविध समाजघटक, उदासीन संप्रदाय आणि वारकरी परंपरेतील भक्तांनी एकत्र येत धार्मिक एकतेचा संदेश दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शीख गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची गाथा सांगताना त्यांच्या शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा उल्लेख करून काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली शहादत ही मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय घटना असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक संस्था, ग्रामसभा आणि विविध उपक्रमांतून गुरुंचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

श्री रामराव महाराज यांनी महाराष्ट्र सरकार गुरु गोविंद सिंह महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी भगवान संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केला. संत सेवालाल महाराजांनी देशभर भ्रमंती करून समाजजागृती केली, व्यापार आणि संघटनाच्या माध्यमातून बंजारा समाजाला बळ दिले, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थित संताचा, गुरूंचा सन्मान करण्यात आला.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

खारघर येथे गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन




नवी मुंबई : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्ष, दंतरोग तज्ञ कक्ष, अस्थिरोग तज्ञ कक्ष, कान-नाक-घसा तज्ञ कक्ष, हृदयरोग तज्ञ कक्ष, मेडिसिन विभाग, तसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंग चाचण्या आणि मोफत केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटपाचीही सोय करण्यात आली होती.

या शिबिरात एमजीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे  डीन डॉ. जी. एस. नरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रदीप सावर्डेकर, डॉ. नव्या बाबू, डॉ. आदित्य ढाकणे, डॉ. मोहिनी धर्मा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

भाविकांनी मोठ्या संख्येने विविध तपासण्या करून घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे समागमाला सामाजिक उत्तरदायित्वाची भक्कम जोड मिळाली.

मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या आरोग्य शिबिराने “सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश अधोरेखित करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर

‘हिंद-दी-चादर’ समागमात भव्य लंगर व्यवस्थाला लाखो भाविकांनी घेतला लंगर सेवेचा लाभ




  नवी मुंबई : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक लंगर सेवेचा लाभ घेतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

   कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे भोजन व्यवस्था सुरू असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापन सुरळीत पार पडत आहे.

    स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आणि गुरुद्वारातील सेवादार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्न तयार करणे, वाढप, स्वच्छता आणि व्यवस्थापनाची चोख जबाबदारी पार पाडली जात आहे.

लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटी, भाजी, डाळ, भात तसेच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो स्वयंसेवक सेवेत सहभागी झाले असून ‘सेवा’ हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

  या समागमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात भाविक दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत आहेत.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण

 



▪️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी

▪️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची  सोप्या भाषेत आकर्षक सचित्र मांडणी

मुंबई : खारघर ओवे मैदान येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत. 

शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहास, त्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे. 

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीख' या प्रदर्शनाला भेट देत आहेत. 

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

‘हिंद-दी-चादर’ समागमात बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य सादरीकरण

 



नवी मुंबई : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 रंगीत पारंपरिक वेशभूषा आणि आकर्षक दागिने परिधान करून सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

समागमाच्या निमित्ताने धर्म, संस्कृती आणि परंपरांचा संगम पाहायला मिळाला. बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या सादरीकरणातून एकता, बंधुता आणि सांस्कृतिक वैविध्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता आणि मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

खारघर येथे “हिंद-दी-चादर” शहीदी समागमात भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संगम

 




नवी मुंबई :खारघर नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित समागमात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.

समागमस्थळी अखंड कीर्तन सुरू असून “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. रागी जत्थेदारांच्या कीर्तनात भाविक भावनिकरित्या तल्लीन झालेले दिसत होते. विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी स्क्रीनमुळे प्रत्येक भाविकाला कीर्तनाचा लाभ घेता आला.

‘विरासत-ए-सीख’ या प्रदर्शनातून शीख समाजाचा इतिहास, शौर्यगाथा आणि परंपरा सचित्र स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू असून सर्व धर्मीयांना प्रेमपूर्वक भोजन दिले जात आहे. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. हजारो स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ हा संदेश  दिला जात आहे.

समागमात मुख्यमंत्री सहायता निधी च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डोळ्यांची तपासणी करून मोफत *देवाभाऊ चष्मे* वाहनातून चष्मे  वितरित करण्याची सोयही करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. बंजारा व लबाना समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.

 शिखांची पारंपरिक मार्शल आर्ट ची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली.३३ पार्किंग स्थळे, मोफत पिकअप-ड्रॉप सुविधा, कडक वाहतूक नियोजन, पोलीस व अग्निशामक दलाचा बंदोबस्त यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे. स्वच्छता रथ व कचरा संकलन व्यवस्था सतत कार्यरत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.

एकंदरीत, श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरत आहे.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

Thursday, 26 February 2026

“गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक”

  


प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे

परीक्षा नियंत्रक,

केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम )

माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी      अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,

 

 

भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत कीज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे  कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरुश्री गुरु तेगबहादूर जीहे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्यन्यायकरुणाधर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला  350 वर्षे पूर्ण होत असतानात्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे.  

गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय

१ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादूर जी हे सहावे शीख गुरु श्री गुरु हरगोबिंद साहेब यांचे ते तेजस्वी पुत्र होते. बालपणापासूनच त्यांच्या जीवनावर अध्यात्मशौर्य आणि सेवाभावाचे संस्कार कोरले गेले. वेद-उपनिषदेइस्लामी तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल चिंतनातून त्यांच्या विचारांना सर्वधर्मसमभाव आणि उदात्त मानवतावादाची दिव्य झळाळी प्राप्त झाली.  गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हतेतर ते एक प्रभावी सामाजिक सुधारक होते. त्या काळात भारतीय समाज जातीय भेदभावधार्मिक अत्याचारअंधश्रद्धा आणि राजकीय दडपशाहीने ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी समाजाला सत्यसमानता आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला.

 धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार

भारतीय इतिहासात मुघल सम्राट औरंगजेब आणि शीख धर्माचे नववे गुरुश्री गुरु तेगबहादूर जीही दोन व्यक्तिमत्त्वे परस्परविरोधी विचारधारांचे प्रतीक म्हणून समोर येतात. एकीकडे सत्ताकट्टरता आणि धर्मांतराची सक्ती यांचे प्रतिनिधित्व करणारा औरंगजेबतर दुसरीकडे धर्मस्वातंत्र्यमानवता आणि सत्यासाठी प्राणांची आहुती देणारे गुरु तेगबहादूर जी—या संघर्षातून भारतीय समाजाला नैतिक मूल्यांची नवी दिशा मिळाली.

औरंगजेब (इ.स. १६५८–१७०७) हा मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट होता. तो अत्यंत कुशल प्रशासक आणि पराक्रमी सेनानी असलातरी त्याची ओळख प्रामुख्याने धार्मिक असहिष्णुता आणि जबरदस्तीच्या धर्मांतर धोरणांमुळे होते. त्याने जिझिया कर पुन्हा लागू केलाअनेक हिंदू मंदिरे पाडली आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला.

त्याच्या कारकिर्दीत विशेषतः काश्मीरमधील हिंदू पंडितांवर अमानुष अत्याचार झाले. धर्मांतर न स्वीकारल्यास कारावासछळ आणि मृत्यू अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण करण्यात आली. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. काश्मीरमधील पीडित पंडितांनी जेव्हा मदतीसाठी गुरु तेगबहादूर जी यांच्याकडे धाव घेतलीतेव्हा त्यांनी हा प्रश्न केवळ एका समाजाचा न मानता संपूर्ण मानवतेचा प्रश्न म्हणून स्वीकारला. त्यांच्या दृष्टीने धर्म बदलणे ही अंतःकरणाची बाब होतीती तलवारीच्या धाकाने लादता येत नव्हती. गुरु तेगबहादूर जी यांनी औरंगजेबाच्या अन्यायी धोरणांना उघड आव्हान दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले कीधर्मस्वातंत्र्यावर गदा आणणे हे अधर्माचे लक्षण आहे. औरंगजेबाने गुरुजींना इस्लाम स्वीकारण्याचा आदेश दिलापरंतु गुरु तेगबहादूर जी यांनी तो ठामपणे नाकारला. या नकारामागे हट्ट नव्हतातर तत्त्वनिष्ठा होती. जर गुरुजी नी  स्वतः धर्मांतर स्वीकारले असतेतर लाखो लोकांकडून या  अन्यायाला मौनसंमती मिळाली असती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याचा मार्ग स्वीकारला. गुरु तेगबहादूर जी यांचे हे  सर्वात महान सामाजिक योगदान होय याला  धर्मस्वातंत्र्याचे रक्षक असे ही संबोधता येईल गुरुजी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हतेतर मानवी स्वातंत्र्याचे सजग प्रहरी होते. त्यांनी सर्वधर्मसमभावसमता आणि आत्मसन्मान या मूल्यांचा पुरस्कार केला.

त्यांच्या धर्मांतरास उघड विरोधा नंतर इ.स. १६७५ साली दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेगबहादूर जी यांना अमानुष यातना देऊन त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हे बलिदान कोणत्याही राजकीय सत्तेविरुद्ध नव्हतेतर विचारस्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले महान बलिदान होते. गुरुजींचे बलिदान झाल्या नंतर औरंगजेबाची सत्ता जरी तात्पुरती टिकलीतरी इतिहासाच्या न्यायालयात तो दडपशाहीचा प्रतीक ठरलातर गुरु तेगबहादूर जी मानवतेचे अमर नायक बनले. म्हणूनच त्यांना हिंद की चादर असे गौरवाने संबोधले जाते.

गुरुजींनी केवळ शीख धर्मियांसाठी नव्हेतर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला. जर गुरु तेगबहादूर धर्म स्वीकारतीलतर सगळे काश्मिरी पंडित इस्लाम स्वीकारतील असे औरंगजेबाला सांगण्याचा धैर्यपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय म्हणजे धार्मिक सहिष्णुतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान होते. त्यांच्या या धाडसी व समाज वाचवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाने समाज एकत्र होण्यास बळ मिळाले. धर्मस्वातंत्र्यमानवी सन्मान आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले हे ऐतिहासिक बलिदान होते. त्यांच्या या बलिदानामुळे भारताच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाला नवी दिशा मिळाली. त्यांचे पुत्र श्री  गुरु गोबिंदसिंग जी यांनी पुढे खालसा पंथाची स्थापना करून अन्यायाविरुद्ध संघटित लढ्याचा मार्ग दाखवला.

 

मानवाधिकारांचे आद्य पुरस्कर्ते

आज आपण मानवाधिकारांची चर्चा करतोपण गुरु तेगबहादूर जी यांनी १७व्या शतकातच मानवी हक्कांचा पुरस्कार केला. धर्म मानण्याचा अधिकारविचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार हे मूलभूत मानवी हक्क आहेतहे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांचे बलिदान हे कोणत्याही एका धर्मासाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी होते.

जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष

त्या काळातील भारतीय समाज जातिभेदाच्या खोल दरीत अडकलेला होता. जन्मावर आधारित उच्च-नीचतेच्या कठोर रेषांनी माणसामाणसांत भिंती उभ्या केल्या होत्या. सामाजिक प्रतिष्ठाधार्मिक अधिकार आणि मानवी सन्मान हे काही मोजक्या वर्गांपुरते सीमित झाले होते. अस्पृश्यताभेदभाव आणि अन्याय हे समाजजीवनाचे अंग बनले होते. अशा विषम आणि अन्यायी सामाजिक रचनेत मानवी समानतेचा विचार मांडणे हे क्रांतिकारक धैर्याचे लक्षण होते.

याच अंधाऱ्या काळात गुरु तेगबहादूर जी यांनी शीख परंपरेतील एक ओंकार या तत्त्वाचा आशय समाजजीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने ईश्वर एकच असूनत्याची निर्मिती असलेला प्रत्येक मानव समान आहे. जातधर्मवर्ण किंवा पंथ यांवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या बाणीतून माणसाच्या अंतःकरणातील शुद्धताआचरणातील नैतिकता आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित होते. सामाजिक समतेचा हा संदेश केवळ उपदेशापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष आचरणातून व्यक्त झाला  गुरु तेगबहादूर जी यांनी जातिभेदाच्या जखमांवर करुणेचा लेप लावला आणि समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हतेतर मूलगामी सामाजिक सुधारणा घडवणारे होते. त्यांच्या विचारांनी पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली.

अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला विरोध

गुरु तेगबहादूर जी यांच्या बाणीत आत्मचिंतनाला विशेष महत्त्व आहे. मनुष्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणाचा शोध घ्यावाइच्छांचे बंधन ओळखावे आणि विवेकाच्या प्रकाशात जीवन जगावेअसा त्यांचा आग्रह होता. वैराग्य म्हणजे संसारापासून पलायन नव्हेतर संसारात राहूनही आसक्तीवर विजय मिळवणेहे त्यांनी स्पष्ट केले. संयमसहनशीलता आणि धैर्य ही खरी साधना असूनसंकटांच्या काळातही मन स्थिर ठेवणारा मनुष्यच खरा भक्त आहेअसा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या मते ईश्वरभक्ती ही केवळ शब्दांतवेशात किंवा विधींमध्ये व्यक्त होत नाहीती माणसाच्या आचरणातव्यवहारात आणि सेवाभावात प्रतिबिंबित झाली पाहिजे. म्हणूनच गुरु तेगबहादूर जी यांची बाणी ही आत्मशुद्धीची आणि मानवी मूल्यांची अमूल्य देणगी ठरते. त्यांनी अंधश्रद्धाढोंगीपणा आणि निरर्थक कर्मकांडांवर कठोर टीका केली. त्यांच्या बाणीत आत्मचिंतनवैराग्यसंयम आणि ईश्वरभक्तीवर भर दिला आहे.

ते म्हणतात  

तीर्थ फिरौअरु दान करौअवरु न पूजा जाई।
अंतर की मलु न उतरैज्यों धोवै घरु बाहि॥

 त्यांचे म्हणणे होते कीखरी भक्ती ही माणसाच्या आचरणात दिसली पाहिजेकेवळ बाह्य आडंबरात नव्हे.

काहे रे बन खोजन जाई।
सरब निवासि सदा अलिपतोतोही संगि समाई॥

गुरु तेगबहादूर जी यांनी सत्यकरुणादयासंयम आणि निर्भयता या नैतिक मूल्यांचा समाजात प्रसार केला. त्यांनी सांगितले कीसंकटाच्या काळातही जो मनुष्य विचलित होत नाहीतोच खरा ज्ञानी आहे. त्यांच्या बाणीतून मानसिक स्थैर्य आणि आत्मबळ यांचा संदेश मिळतो. आजचा समाजही विविध प्रकारच्या सामाजिकधार्मिक आणि वैचारिक संघर्षातून जात आहे. अशा वेळी गुरु तेगबहादूर जी यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. धार्मिक सहिष्णुताअभिव्यक्ती स्वातंत्र्यसामाजिक समता आणि मानवतेचा सन्मान हे मूल्य आजही तितकेच आवश्यक आहेत. गुरु तेगबहादूर जी हे केवळ शीख धर्माचे गुरु नव्हतेतर ते संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या ३50 व्या बलिदान दिनानिमित्त आपण त्यांच्या सामाजिक सुधारणामानवतावादी विचार आणि निर्भय बलिदानाचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण समाजात न्यायसमता आणि सहिष्णुता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले पाहिजे.गुरु तेगबहादूर जी यांचे बलिदान हे इतिहासातील एक तेजस्वी दीपस्तंभ आहेजो आजही मानवतेचा मार्ग उजळवत आहे.  

"हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे-प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी

 




वाहतूक,आपत्ती व्यवस्थापनच्या सूक्ष्म नियोजनासह प्रशासन सज्ज
नवी मुंबई : ‘हिंद-दी-चादर’या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनीआज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांसाठी फूड स्टॉल, लंगर, आदीबाबत शुद्धता राखत गुणवत्ता ठेवण्याची सूचना केली. तसेच भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तरअहवाल सादर केला.
या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप उपस्थित होते. यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा,स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली, तसेच सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनकाळावर आधारित जे गीत गायले ते गीत कोकण विभागातील 20 हजार शैक्षणिक संस्थामध्ये 51 लाख विद्यार्थी आणि1 लाख 50 हजार शिक्षण कर्मचाऱ्यांनी सहभागातून समूह गान केले, याची 'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रमाची नोंद झाल्याची माहिती दिली. समूह गाण्याच्या माध्यमातून विश्व विक्रमाची नोंद झाल्याबद्दल डॉ. परदेशी यांनी कोंकण विभागीयआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे व सर्व सहकारी, अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर सिंघ साहिबजी यांच्या शिकवणीवर आधारित एकूण 13 लेख 13 भाषांमध्ये ई-बुक स्वरुपात प्रकाशित केले जाणार आहे, याचीही डॉ. सूर्यवंशी यांनी डॉ.परदेशी यांना माहिती दिली.
कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्ग योजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी 5 तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये 350 खाटा आणि 75 आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीयपथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर,नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे 5 लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात 80 हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाश योजना यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे सर्व कामे सुरु आहेत.
कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने कोणत्याही अनुचित प्रकार होवू नये यासाठी सायबर पोलीस, एटीएसची मदत घेण्याच्या सूचना देत डॉ.परदेशी म्हणाले की, मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने भाविकांना रस्त्यांची माहिती होण्यासाठी रस्ते दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर भाविकांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असेही प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर "हिंद दी चादर" कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत. देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी 30 पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. जेएनपीए परिसरात दररोज सुमारे 25 हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी 01 हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित याबैठकीस “हिंद दी चादर” शहिदी समागम राज्य समितीचे मुख्य समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, कोकण विभागातील इतर जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका,पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Monday, 23 February 2026

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष

 





'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद

 नवी मुंबई :-  हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.

नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांच्यासह उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मनोज सानप, सहायक आयुक्त डॉ.सागर घोलप, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त दिपाली दिवेकर, नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोडे, तसेच गुरुबचन सिंग सिंघल, जसपाल सिंग नागरा, नगरसेवक कुलदीप सिंग सुरी, जसविंदर सिंग, मुख्याध्यापिका अमरजित कौर सेनी आणि ज्येष्ठ पत्रकार बी.पी. नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहादूर सिंग जी यांचे बलिदान केवळ शीख समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खारघर, सेक्टर 29 येथे आयोजित होणाऱ्या या भव्य समागमात जगभरातून 15 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा विश्वविक्रमी उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे मनस्वी समाधान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या या विक्रमी सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, श्री गुरु तेग बहादूर जी यांचे जीवन धैर्य, करुणा, समता आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा एक तेजस्वी आदर्श आहे. 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गायलेले हे गीत सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करणारे असून, जागतिक स्तरावर याची नोंद होणे ही गौरवास्पद बाब आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी खारघर येथील सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. उद्याचे भविष्य या मुलांच्या हातात असून त्यांना असे संस्कारक्षम कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरतील त्यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठिक 09.00 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक गायन केले. प्रास्ताविक करताना उपसंचालक मनोज सानप यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही मोहीम आता केवळ 'व्हिडिओ कंटेंट' न राहता एक संस्कारांची डिजिटल चळवळ बनली आहे. गुरुबचन सिंह यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत मुलांचे प्रबोधन केले. कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक संजीवनी जाधव-पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर 

#खारघर

हिंद दि चादर”चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड




पालघर : वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत “हिंद दी चादर” या संकल्पनेचा मूलभूत संदेश त्यांच्या मनात रुजवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध सूफी गायक सतिंदर सरताज यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमास प्रांत अधिकारी प्रदीप चव्हाण, शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.


संवादातून विद्यार्थ्यांना विचारांची दिशा

भक्तिगीतानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी, “गाण्याचा अर्थ कोणाला समजला का?” असा थेट प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाची संधी दिली. “प्रत्येक कृतीमागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. केवळ ऐकणे नव्हे, तर त्यातून मूल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शीख धर्माचे नववे गुरु गुरू तेगबहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. “हिंद दी चादर” म्हणजे हिंदू धर्माचे नव्हे, तर संपूर्ण हिंद — म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे. हा संदेश धार्मिक सहिष्णुता, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या मूल्यांना बळकटी देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले.


धर्मनिरपेक्षतेचा संविधानिक संदेश

“आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म पाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. कोणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. गुरु तेग बहादूर यांनी याच मूल्यांसाठी बलिदान दिले,” असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली.

गुरुद्वारातील सेवाभावाचा उल्लेख करत त्यांनी सेवा, नम्रता आणि स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. “समाजासाठी निस्वार्थ सेवा आणि स्वतःचे कार्य स्वतः करण्याची वृत्ती अंगीकारली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

   अंबिस्ते येथील आश्रमशाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिक्षकांचे प्रयत्न यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून आपण जीवनात यशस्वी व्हावे,” अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिल्या.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर

“हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम





ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) – “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी, ठाणे येथे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विशेष समूहगान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले प्रेरणादायी गीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागातून सामूहिकरित्या गायन करण्यात आले. समूहगानातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, प्रकल्प संचालक (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, उपशिक्षणाधिकारी (योजना) शुभांगी बढे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंझारराव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच मुख्याध्यापिका मानसी मिलिंद ढवळीकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.

तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त समूहगान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी वर्गाने विविध शाळांना भेट देऊन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्ती, त्याग व मानवतेचा संदेश देणाऱ्या या समूहगान उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आगामी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या मुख्य शहीदी समागम कार्यक्रमासाठी या उपक्रमातून सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

#हिंददीचादर 

#श्रीगुरुतेगबहादुर