Followers

Wednesday 4 September 2024

संवाद व संबोधन कार्यक्रम आनंद सोहळा होतो तेंव्हा ... उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, रांगोळी आणि नवी उमेद






            उदगीर, (लातूर):  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनात काय ऐकायला मिळणार मुख्यमंत्री अर्थात लाडक्या बहिणींचा भाऊ नवीन काय संदेश देणार... तर देवेंद्र फडणवीस नवीन काय बोलणार अशा सर्व उत्सुकतांना घेऊन जिल्हाभरातील महिलांच्या उदगीर येथील हजारोंचा समुदाय आज सेलीब्रेशन मूडमध्ये होता. त्यामुळे पोस्टर, बॅनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी हस्तांदोलन तर कुठे रक्षा बंधन असा एकूणच आनंददायी माहौल उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर होता. त्यामुळे संवाद संबोधनाचा कार्यक्रम आनंद सोहळा झाला होता. 

            या आजच्या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, विविधांगी घोषवाक्य प्रत्येकाचा वेगळा ड्रेसकोड आणि महाराष्ट्राच्या वैभवाची सुरेल संगीत मैफील यामुळे आनंद मेळावा आणखी मजेदार झाला.   

या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला सरपंच पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून आल्या होत्या. त्यांच्या हाती राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री महोदयांचे छायाचित्र असलेले फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या फलकांवर विशेषत्वाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांच्या फलकांचा समावेश होता.

आकर्षक व्यासपीठ

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गावर आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या. सोबतच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी मुख्य व्यासपीठ विविध रंगीबेरंगी पुष्पगुच्छांनी सजविण्यात आले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणि विशेषत्वाने देशाला महाराष्ट्राची महिला सशक्तीकरणाच्या योगदानातून नवी ओळख देणाऱ्या रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. तसेच व्यासपीठासमोरील जागेत कृषि विभागाच्यावतीने काढण्यात आलेली बाजरा, भगर आदी विविध धान्यापासून रांगोळी काढून मिलेट वर्ष साजरे करताना नागरिकांनी आपल्या आहारात कडधान्याचा वापर करण्याचा 'मिलेट हट'च्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता.

आशयपूर्ण रांगोळ्या

साधारणत: रांगोळी हा कलात्मक प्रकार त्यातील रंग छटा आणि रेखाचित्रांवर असते. मात्र, आज आनंद मेळाव्यात काढण्यात आलेली रांगोळी आशयघन होती. रांगोळीला काही बोलायचे होते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व तृणधान्यांचा वापर याचा संदेश या रांगोळीतून दिला जात होता.   

शहरात मान्यवरांचे आकर्षक कटआऊट्स

आजच्या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक नगरी उदगीर शहरात येणाऱ्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचे लक्षवेधक कटआऊट्स शहरात तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. संदीपान जगदाळे व सहकारी लातूर, जल्लोष ग्रूप नागपूर आणि येडवे व बिदरकर गुरुजी, सोलापूर यांच्या चमूने उपस्थितांसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

लातूरच्या आगळ्यावेगळ्या येळवसचे आकर्षक दालन

लातूर-धाराशिव जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘येळवसअर्थात वेळ अमावस्याचे स्वतंत्र दालन स्टेजसमोर  तयार करण्यात आले होते. या दालनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाच्या स्थळी राज्य शासनाच्या कृषी विभाग, रोजगार उद्योजकता व कौशल्य विकास विभाग, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, जिल्हा आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली होती.  

**** 

आर्थिक पाठबळाने आत्मनिर्भरता आल्याचा महिला लाभार्थ्यांचा सूर

उदगीर(लातूर) , दि. 4 (जिमाका) :- राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध उपयुक्त योजना राबवीत आहे. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारी लखपती दिदी योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, लेक लाडकी योजना यासारख्या योजनांद्वारे महिला सक्षमीकरण करण्याला चालना देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने लाडक्या बहिणींमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भगिनींनी या योजनेमुळे आर्थिक निर्भरता आल्याचा सूर व्यक्त केला . 

या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच इतर महिलाही त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती घेत स्वतः सक्षम होण्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वत:च्या खात्यामध्ये आलेले पैसे आणि त्याचे स्वामित्व स्वत:कडे असणे याबद्दलचा आनंद महिलांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत होता.  

आज उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य लाभांच्या योजनांच्या लाभार्थी महिला आनंद मेळाव्यात भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शासनाच्या योजनेतून लाभ मिळाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहेच, पण त्याचबरोबर आनंद सोहळ्यास स्वतः राष्ट्रपतींनी महिलांना प्रोत्साहित केल्याच्या भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.

त्यातील काही निवडक बोलक्या प्रतिक्रिया

घरातल्या अर्थकारणाला कलाटणी....

श्रीमती रेश्मा युनुस अतार  (रा. कुमटा खु. ता. उदगीर) सध्या बन शेळकी रोड उदगीर येथे तीन मुले व पतीसह किरायाने राहते. रेशमाचे पती रंगकाम करतात. कधी काम मिळते तर कधी नाही. त्यामुळे घर भाडे मुलांच्या शाळेची फी आणि घर खर्च भागवणे अवघड होत होते. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि 15 ऑगस्ट रोजी माझ्या खात्यात तीन हजार रुपये आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्याने या पैशाने प्रथम मुलांची थकलेली शाळेची फी भरली. आता दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम माझ्या सारख्या गरिबांसाठी मोठी नसली तरी कमीही नाही. या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून माझ्या घरखर्चाला खूप मोठा आधार मिळाला आहे. माझ्यासारख्या इतर महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी योजना कायम सुरू राहिली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याबाबत शासनाचे आभार.

कुटूंबांला आर्थिक हातभार

उदगीर तालुक्यातील वायगाव येथील मनीषा वाघमारे या ३५ वर्षीय अविवाहित असून त्या आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु आर्थिक अडचण ही कायमचीच. त्या म्हणतात की, ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यावर आले आणि मला खूप आनंद झाला. या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक हातभार लागला आहे. या रकमेतून आई-वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च करणे सहाय्यक ठरणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून धन्यवाद.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या रकमेतून मुलाची मागील दोन महिन्यांची फी भरली. त्यामुळे मुलगा रोज मोकळ्या मनाने शाळेत जाऊ लागला. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाने मुलांसाठी अधिकच्या शाळा सुरू करण्याची भावना श्रीमती नीता बालाजी डाके, धामणगाव (ता. शिरूर अनंतपाळ) यांनी व्यक्त केली. 

बचत गटाला बळकटी

जळकोट तालुक्यातील सुल्लाळी गावच्या आम्रपाली सोनकांबळे या समता ग्रामसंघ बचत गटात काम करतात. या कामी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून म्हैस व इतर जोडधंद्यांसाठी तीन लाख रुपये तसेच वंचित घटक निधी प्राप्त झाला आहे. त्याचा आरोग्य आणि स्वच्छतेसाठी उपयोग होतो. त्यातच लाडकी बहीण योजनेचा मला लाभ मिळाला आहे. या आर्थिक सहायतेमुळे मी आत्मनिर्भर झाले आहे. याचे श्रेय शासनास असून शासनाचे मनःपूर्वक आभार.  

आत्मनिर्भरतेत आनंद 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 15 ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये खात्यात आले. त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. या रकमेचा उपयोग आम्ही मुलांचे शिक्षण, घर खर्चासाठी करणार आहोत. आता पैशांसाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो असून  आम्ही सर्व सहाजणी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलो असल्याचे उदगीर येथील लोणी एमआयडीसीतील श्रीमती शेख मौलन काझी, श्रीमती सोफिया बी मगदूम शेख, श्रीमती शबाना शेख मुस्तफा, श्रीमती इरफानाबी शेख, श्रीमती रबाना शेख हिदायत व श्रीमती संगीता बारसोळे यांनी सांगितले. तसेच ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment