Followers

Tuesday 26 May 2020

सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी परस्परात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे - पालकमंत्री शंकरराव गडाख


* खरीप हंगामात बी बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही याची दक्षता घ्यावी
* टंचाईच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात

उस्मानाबाद,दि.26 (जिमाका) :कोरोना आजारा सोबतची खरी लढाई आता ग्रामीण भागात सुरू झालेली आहे  त्यामुळे संबंधित सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून  व  सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश  मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवार(दि .26 ) रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा, कोरोनासंदर्भात उपाययोजना व टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गोलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजयकर,  जिल्हा उपनिबंधक सहकार देशमुख, कृषी विकास अधिकारी  डॉक्टर तानाजी चिमनशेटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर आदी उपस्थित होते.
      कोरोना विरुद्धच्या लढाईत अधिकारी व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत आहेत मात्र आता ग्रामीण भागात कोरोना आजाराचे बाधित रुग्ण आढळून आल्याने आता खरी कसोटी सुरू झाली असून याचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा त्रागा न करता परस्परात योग्य तो समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.
      यावर्षी वेळेवर व मुबलक पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खताची कमतरता पडू नये त्यासाठी योग्य   
नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री  गडाख यांनी दिले. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र जास्त असल्याने यासाठी महाबीज व इतर नोडल संस्थांनी  सोयाबीन बियाणे नियोजन करावे व शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे कमी पडणार नाही तसेच बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी विशेष भरारी पथके व दक्षता समिती मार्फत लक्ष ठेवण्यात यावे असे त्यांनी सूचित केले.
    रासायनिक खता बरोबरच सेंद्रिय खताचा वापर ही शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.   
ज्या शेतकऱ्याचे नाव कर्जमाफी यादीत आहे, अशा शेतकऱ्यांना ही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे असे सांगून पालकमंत्री गडाख यांनी टंचाईच्या सर्व उपायोजना जिल्ह्यात कार्यक्षमपणे राबवाव्यात असेही सूचित केले.
पावसाळ्यापूर्वी सिंचन विहीरी, राष्ट्रीय पेयजल योजनेचे कामे पूर्ण करून घ्यावेत. सध्या कोरोना आजारामुळे महानगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात दाखल झाल्याने मनरेगा तून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
    यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उपस्थित लोकप्रतिनिधींनी कोरोना, खरीप पूर्व हंगाम व टंचाईच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या व त्याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.
          प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपायांची माहिती दिली. त्याप्रमाणेच खरीप हंगामाच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली तसेच त्यांच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत उपाययोजना राबविण्याचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते ढोकी येथून शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे व खत वाटपाचा शुभारंभ


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दुकानात गर्दी होऊ नये व शारीरिक अंतर राखण्यासाठी कृषिविभाग शेतकऱ्यांच्या बांधावर...

उस्मानाबाद, दि.26(जिमाका):-  तालुका कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमूळे खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ आज ढोकी सर्कल येथून मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील यांच्या हस्ते झाला.
      यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबळकर, आ. कैलास घाडगे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा करण्याचे उस्मानाबाद कृषी विभागाद्वारे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. यानुसार आज ढोकी, वाखरवाडी, कोल्हेगाव, गोरेवाडी, कावळेवाडी, तुगाव, कसबे तडवळे, गोपाळवाडी येथील कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बचतगटाच्या माध्यमातून खते वाटप करण्यात आली.
यावेळी आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बजरंग मंगरुळकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कोळेकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, कृषी विकास अधिकारी श्री.चिमनशेट्टी साहेब, तालुका कृषी अधिकारी डी आर जाधव, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, सरपंच नाना काळे, उपसरपंच अमोल समुद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, माजी सभापती दगडू धावारे, तानाजी माळी, पोलिस पाटील राहुल वाकुरे, भारत काका देशमुख, उद्धव समुद्रे, मोहन शिंदे, उमेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री.मगर साहेब, कृषी परवेक्षक श्री. सुरवसे साहेब, कृषी सहाय्यक श्री माकोडे, श्री. आडसूळ, श्री. शिंदे, श्री. भडंगे, शेतकरी वर्ग तसेच ढोकी येथिल रासायनिक खत विक्रेते उपस्थित होते.

येणाऱ्या पावसाळ्यातील आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत चांगला समन्वय ठेवा रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे




आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक  

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि २६ मे २०२०

मुंबई दि. २६: सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता,  सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे  तसेच मुंबई पालिका आयुक्त व  इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाउस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.

ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून  रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.

आपण आपत्तीत  बचाव कार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या वर्षी प्रमाणे सांगली - कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको

गेल्या वर्षी प्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या

कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत

मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधानिशी काम करू लागलो. नाले सफाई, त्यांचे  खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे  तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तत्काळ बुजविणे महत्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्न धान्य, औषधी पूर्वाधा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसत्यही चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.

मेघदूत आणि उमंग मोबाईल एप

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की राज्यात पाउस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.  १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाउस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाउस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे.  मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाउस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि  नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून  ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाउस झाला होता असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क

मुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाउस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते  . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच  उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क क्रमांक ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४७१९ आणि ईमेल acwc.mumbai@gmail.com असे आहेत.

पावसाळ्यात समस्या येऊ नये म्हणून मुंबई पालिका सज्ज

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात मुंबईत बांधकामे सुरु असणाऱ्या संस्थांकडून विनंती करण्यात आल्या होत्या. १ हजारपेक्षा जास्त परवानग्या प्रलंबित होत्या . त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन मुंबईत  बांधकामांच्या ठिकाणी मान्सून पूर्व सुरक्षिततेसाठी, तसेच डेब्रिज काढणे वगैरेची कामे सुरु झाली आहे. मुंबईतील ४०० किमीचे नाले ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहेत.

प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने  रेकी करून त्यांच्या भागात गटारे व चेंबर्स उघडी नाहीत ना  याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे. हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य केले आहे.  मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वस्त करून पालिका आयुक्त म्हणाले की, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीचे सफाईचे ७७% काम पूर्ण झाले आहे.

३२४ पाणी उपसणारे पंप कार्यान्वित आहेत. पुराचे पाणी उपसा करण्यासाठी ६००० लिटर्स प्रती सेकंद पाणी उपसणारी यंत्रणा देखील सुरु आहे असे ते म्हणाले. कुर्ला, सायन येथे पाणी साचू नये म्हणून मोठ्या शक्तिशाली क्षमतेचे पंप बसवले आहेत. रस्त्यांची ६०९ कामे  १० जूनपर्यंत पूर्ण करणार असून ३२ पूल दुरुस्ती कामे सुरु आहेत.

५६१ मृत झाडे पूर्णपणे तोडायची असून १,१७००० झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये पावसाळ्यातील विविध रोगांमुळे मुंबईत २० मृत्यू झाले होते. यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्ल्यू  या रोगांचा समावेश होता. यंदा मे महिन्यापर्यंत गॅस्ट्रोमुळे १८०२, मलेरिया ५१९, हेपेटायसीस १८८, स्वाईन फ्ल्यू चे  ४२ असे रुग्ण आढळले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.

गेल्या वर्षी कल्याण, सांगली, कोल्हापूर येथे नौदलाने अविरत काम करून अनेकांचा जीव वाचवला आमचे  दल मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी हेलीकॉप्टरने सज्ज आहे असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले..

तटरक्षक  दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी ९ जहाजे तयार असून  ८ एअरक्राफ्ट देखील आहेत.याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यात येईल.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या  अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे १८ टीम्स असून  (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवावा असेही ते म्हणाले.

भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कंपन्या या आम्ही तयार ठेवल्या आहेत सेन्ट्रल कमांडिंग सेंटर मधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळाव्यात म्हणजे प्रत्यक्ष नियोजन करता येणे शक्य होईल अशी सुचना त्यांनी केली. माजी सैनिक यांचा लष्कर आणि प्रशासनात चांगले समन्वयक म्हणून काम करतील अशी सूचनाही त्यांनी केली.

Wednesday 13 May 2020

आपत्तीवर मात करण्यासाठी तालुकास्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे



उस्मानाबाद,दि.13(जिमाका):- पावसाळयामध्ये वादळ,गारपीट,पुरपरिस्थती व साथीचे रोग या सारखी आपत्ती  मोठया प्रमाणात ओढाऊ शकते अशा प्रकारची आपत्तीजनक परिस्थीती उद्भवल्यास जिल्हयाच्या विविध ठिकाणाहून  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मदतीसाठी विचारणा केली जाते. जिल्हयाच्या ठिकाणावरून मदत पोहोचविण्यास कदाचित विलंब लागू शकतो. त्यामुळे तात्काळ मदत मिळण्यासाठी व आपत्तीचे धोके टाळण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावरच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारून ती कार्यान्वित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन सभागृहात मान्सून 2020 पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.13 मे 2020 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आदी उपस्थित होते.
     पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की,पावसाळयामध्ये एखादा तलाव पाण्याने भरल्यानंतर तो फुटू नये किंवा त्यातून पाण्याची गळती होवू नये यासाठी जिल्हयातील पाझर,लघु व मध्यम प्रकल्प आदी सर्व तलावाची 30 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे.तसेच दुरूस्ती झाली आहे किंवा नाही ? याचे सर्वेक्षण करून समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. दुरूस्ती केलेल्या तलावांची जबाबदारी एखाद्या अधिकाऱ्यावर निश्चित करून नोडल अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करावी असे आदेशही त्यानी दिले.
       तसेच आपत्तीच्या अनुषंगाने दि.1 जून  ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नियंत्रण अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.तसेच जिल्हयातील सर्व नगर परिषदांनी पावसाचे पाणी शहरातून शहरा बाहेर व्यवस्थित निचरा करण्यासाठी सर्व गटारे,नाले तात्काळ दुरूस्त करून घ्यावेत तसेच ज्या गटारी किंवा नाल्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे ते काढून टाकावेत असे निर्देश श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी दिलेत. जिल्हयातील जे नादुरूस्त पुल आहेत त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याबरोबरच जिल्हयातील ज्या रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्याची गरज आहे.त्याचे देखील सर्वेक्षण करून ऑडीट करण्याचे संबंधित विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी सूचित केले.
     यावेळी जिल्हयातील पाझर तलावाची दुरूस्ती व देखभाल व्यवस्थित व्हावी यासाठी 250 पाझर तलावांचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्याच्या सूचना करून त्यापैकी 20 पाझर तलावांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जि.प. कडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हयात लोंबकळणाऱ्या तारा किती ठिकाणे आहेत ? याचे सर्व्हे करण्याचे त्यांनी सूचित केले.त्याबरोबरच ग्रामीण भागातील जे नाले अरूंद आहेत त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामध्ये झाडे झुडपे उगवलेली आहेत, ती तोडण्यासह सर्व प्रकारचे नियोजन ग्रामस्तरीय यंत्रणांनी करावे. 
       तसेच प्रमाणित कृती आराखडा याबाबत प्रत्येक पोलीस ठाणे,तहसिल कार्यालय या ठिकाणी आपत्ती बाबतचे सर्व साहित्य दिले असून त्याची अद्यावत माहिती संबंधित तज्ञ व्यक्तींचे नाव,संपर्क नंबर यांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सर्व माहिती अद्यावत ठेवण्याचे सांगितले.तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जिल्हयातील उघडे बोरचा सर्व्हे करून ते तात्काळ बंद करण्याची कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली.जिल्हयातील अंगणवाडी,शाळा यांची दुरूस्ती करण्याबरोबरच समाज मंदीर,शाळा या ठिकाणी आपत्तीच्या काळात तात्पुरता निवारा उभारण्यासह गॅस्ट्रोचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाणी स्वच्छतेवर भर द्यावा असे आवाहन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले.
या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे,पोलीस उपअधीक्षक (गृह) अजुंम शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड याच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

Saturday 9 May 2020

नियमाची अमंलबजावणी करुन जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड





हिंगोली,दि.9: कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतू जिल्हा  प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रमाण सद्यस्थितीत नियंत्रणात आहे. पंरतू आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा असे शालेय शिक्षण मंत्री  तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची तात्काळ चाचणी करावी. सर्वेक्षण करतांना माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांवर गरज पडल्यास योग्य ती कारवाई करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील यासाठी नियोजन करावे. कोरोना बाधितांबरोबरच इतर रोगांने आजारी असणाऱ्या नागरिकांवर योग्य उपचार करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
डॉक्टर रुग्णालयात येतात का? याची माहिती घेवून त्या म्हणाल्या की, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, विविध विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करीत असुन त्यांनी आपली काळजी घ्यायला हवी. सर्वेक्षण करणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट, मास्क आदी साहित्य देण्यात यावे, असे त्यांनी यावेळी  सांगितले.
जिल्ह्यात विद्युत पुरवठ्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती विषयक कामात अडचण येत असुन, अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महावितरणने याकरीता अखंडीत वीज पुरवठा सुरु राहील याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाचा तात्काळ लाभ द्यावा. तसेच महावितरणने त्यांची प्रलंबीत असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
केशरी कार्ड धारकांना धान्य वाटप सुरू करा. त्याचबरोबर  अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल शेतकरी योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदय आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर नियतन्वाये अन्न-धान्यांचे वितरण करा. कोणीही अन्न-धान्यापासून वंचित राहता कामा नये अशा त्यांनी यावेळी सूचना दिल्या. मात्र धान्य वितरण करतांना दुकानांत सामाजिक अंतर राखले जाईल याची ही काळजी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य पोहचविण्याचा प्रयत्न करण्याचे ही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
खरीप हंगामात खत व बियाणांचा पुरवठा करतांना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असुन, अनेक मजूर जिल्ह्यात परतले आहेत.  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मजूरांना कामे उपलब्ध करुन द्यावीत. परंतू कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता वयैक्तीक स्वरुपाची कामे उपलब्ध करुन देण्याच्या त्यांनी यावेळी सूचना दिल्या.
मे महिना सुरु झाला असुन, जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार पाणी टंचाई कृती आराखडा तयार करावा. तसेच ज्या गावातून मागणी येईल त्यांना तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी विंधन विहिरीचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात यावा.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरून जाता कामा नये. राज्यावर अथवा देशावर ज्यावेळेस कुठलेही संकट येते, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना करणे आपणां सर्वांची जबाबदारी आहे. या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता, दक्षता घेवून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी.
या संकटाच्या कालावधीत प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी हे आपल्या कुटूंबापासून दूर राहून आपले कार्य करत आहेत त्यांचे यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी आभार मानले. तसेच प्रशासन अतिशय जागरुकपणे सर्व परिस्थिती हाताळत असुन नागरिकांनी त्यांना सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी केवळ सुरक्षित अंतर व दक्षता यामुळेच हे शक्य होणार आहे. कोरोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत असून, विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याकरीता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे ही पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री श्रीमती प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी कोरोना, पाणी टंचाई, मनरेगा, शासकीय धान्यवाटप योजना, महावितरण याबाबतचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाच्या विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणाचा शुभारंभ




हिंगोली,दि.09: राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या होत्या. खरीप हंगाम जवळ आल्याने याप्रसंगी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या हस्ते हिंगोली तालूक्यातील उमरा येथील अमृतेश्वर शेतकरी गट 1 आणि 2, हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील विजय शेतकरी गट 1 आणि 2 या  एकुण 25 टन खताचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विविध ठिकाणी भेट देवून केली पाहणी





हिंगोली,दि.09: कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या होत्या. कोरानाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज विविध ठिकाणी भेट देवून पाहणी केली.
            हिंगोली तालूक्यातील कोथळज येथे जोगी समाजाचे काही नागरिकांनी स्वत:ला 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन करुन घेतले असून ते गावाबाहेर राहत आहे. याठिकाणी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी भेट देवून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या काही समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हिंगोली येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहाला तात्पूरते नवीन कोवीड रुग्णालय केले आहे. याठिकाणी पालकमंत्री गायकवाड यांनी भेट देवून सदर रुग्णालयाची पाहणी केली.
            तसेच हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल येथे भेट देवून याठिकाणी क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या जवानांची भेट घेवून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधाची माहिती घेतली. त्यानंतर पालकमंत्री गायकवाड यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देवून त्याठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्यावर करण्यात येणारे औषधोपचार तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधाबाबत माहिती घेतली. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत नियमाचे पालन करा, आपल्या कुटूंबाचे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच क्वारंटाईन सेंटर, रुग्णालय येथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक मंचक इप्पर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती.
****

Monday 4 May 2020

नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी खाजगी आस्थापना ठराविक कालावधीतच चालू ठेवण्याचे आदेश - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


        उस्मानाबाद, दि. 4 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार राज्यामध्ये दि. 4 मे, 2020 पासून दिनांक 17 मे, 2020 पर्यंत  लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या लॉकडाऊन कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड 19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
            उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड-19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील  सर्व  दुध केंद्रे, भाजीपाला केंद्रे व भाजीपाला फिरते विक्रेते, कृषी विषयक बि-बियाणे, खते केंद्रे व कृषी अवजारे, स्पेअर पार्टसची दुकाने व इत्यादी सर्व खाजगी आस्थापना या ठराविक कालावधीतच चालू ठेवणे आवश्यक आहे.
              जिल्हादंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड-19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा  एक भाग उस्मानाबाद जिल्हयातील खालीलप्रमाणे आस्थापना नमुद कालावधीत चालू ठेवण्याबाबत आदेशित करीत आहे.
              1. भाजीपाला, किराणा दुकाने व सर्व आस्थापना सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत चालू राहतील.
             2. दुध, बि-बियाणे, खते यांची दुकाने संपूर्ण आठवडाभर चालू राहतील.
             3. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये लोकांना बसता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट संपूर्ण आठवडाभर चालू राहतील. त्यामध्ये किचन, होम डिलिव्हरी व पार्सल सेवा चालू राहतील.
            4. पानटपरी व तंबाखू दुकाने बंद राहतील.
            5. अमृततुल्य/चहाची दुकानामध्ये ग्राहकांना बसता येणार नाही. त्यांना युज ॲन्ड थ्रो चे कप वापरता येतील. तसेच पार्सल सेवा देता येईल.
            6. दुकानदारांनी त्यांच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांसह मास्क, स्वच्छ रुमाल, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, गॉगलचा वापर करणे बंधनकारक राहील.
            7. ग्राहकांनी देखील दुकानामध्ये मास्क, स्वच्छ रुमाल,  सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, गॉगलचा वापर करणे बंधनकारक राहील.
           8. दुकानादारांनी त्यांचे दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होणार नाही. या दृष्टीने बॅराकेडींग करणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांना दुकानाचे काऊन्टरचे बाहेरुनच वस्तूंची डिलिव्हरी देणे बंधनकारक आहे.   
           9. ग्राहकांनी त्यांचे रहिवासाचे क्षेत्रातील दुकानातूनच वस्तुंची खरेदी करावी.
           10. दुकानदारांनी ग्राहकांना आगाऊ मागणी (प्रिबुकींग) करण्यासंदर्भात प्रोत्साहीत करावे व ग्राहकांना होम डिलीव्हरीसाठी प्राधान्य द्यावे.
           11. सर्व आस्थापना सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 8.00 ते 1.00 या कालावधीत सुरु राहतील. त्यांनी ग्राहकांकडून फोन बुकींग करुन घेवून होम डिलीव्हरी देण्यास प्राधान्य द्यावे.
           12. सर्व प्रकारच्या अत्यावश्यक, अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या पार्सल सेवेला परवानगी  राहील.
           13. सर्व दुकानदार, ग्राहकांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.
           14. औषधी दुकाने 24 तास सुरु राहतील.
           15. केश कर्तनालय, सलूनची  दुकाने बंद राहतील परंतु ते घरी जाऊन सेवा देऊ शकतील.
           16. ई-कॉमर्स, कुरिअर व पार्सल सेवा सुरु राहतील.
           17. बँका, पतसंस्था, सर्व आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था चालु राहतील.
           18. अॅटो, चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी असेल. दुचाकी वाहनांवर एकाच व्यक्तीस प्रवासास परवानगी राहील.
           19. बांधकाम, रस्ते, इतर विकास कामे चालु राहतील. बांधकाम करणाऱ्या व्यक्तींनी बांधकाम सुरु करतेवेळी कामावरील मजुरांच्या यादीसह मुख्याधिकारी, नगरपरिषद, ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांना कळविणे आवश्यक आहे. मजुरांची वैध परवानगी, पासशिवाय आंतरजिल्हा वाहतुक करता येणार नाही.
           20. कोणत्याही व्यक्तीला वैध परवानगी, पासशिवाय जिल्ह्यात येता येणार नाही. जिल्हयात बाहेरील व्यक्ती आली तर नागरिकांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास 02472-225618 या क्रमांकावर कळविणे आवश्यक आहे.
            या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करुन त्याबाबतचा दैनंदिन अहवाल पोलिस उपअधिक्षक (गृह) उस्मानाबाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प.उस्मानाबाद, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन जि.का.उस्मानाबाद, सर्व Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, सर्व Incident Commander  तथा तालुका दंडाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपंचायत, सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत, जिल्हा उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
          या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
             या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 17 मे 2020 पर्यंत  लागू राहील.

                                                       *****

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाळण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे आवाहन


          उस्मानाबाद, दि. 4 (जिमाका ) :-  महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषयांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
         जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लॉकडाऊनच्या कालावधीत जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी  लॉकडाऊच्या वाढवलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने खालील उपक्रमांवर घातलेले निर्बंध संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 17 मे, 2020 पर्यंत लागू राहतील, असे आदेश दिले आहेत.
          राज्यांतर्गत  व आंतरराज्य विमान प्रवासी वाहतूक (वैद्यकीय सेवा व संरक्षण सेवा आणि भारत सरकारचे गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता), रेल्वेची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक (संरक्षण सेवा आणि भारत सरकाचे गृह मंत्रालयाने  परवानगी दिलेल्या बाबी वगळता), सार्वजनिक वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय बस सेवा (भारत सरकाचे गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता), मेट्रो रेल्वे सेवा, आंतरराज्य व वैयक्तिक प्रवासी वाहतूक (वैदयकीय व कारणास्तव व भारत सरकारचे गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता), सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस आदी संस्था बंद राहतील.  तथापि ऑनलाईन,दूरस्थ शिक्षण प्रणालीस परवानगी राहील. आतिथ्य सेवा (आरोग्य,पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, प्रवासी व्यक्तीसह अडकलेल्या व्यक्ती यांचे निवासाकरिता व विलगीकरण सुविधेकरिता  घेतलेल्या सेवा वगळून), सर्व सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, चित्रपटगृहे, कला केंद्रे, बार व सभागृहे आणि तत्सम ठिकाणे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर सभा-संमेलने. सर्व धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे जनतेसाठी बंद राहतील. धार्मिक मेळावे, सभा संमेलने सक्त मनाई असेल. पान, तंबाखू व इतर पदार्थांची दुकाने बंद राहतील. सर्व अत्यावश्यक बाबी वगळून संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत व्यक्तींच्या हालचालीला कडक प्रतिबंध राहील. 65 वर्षांवरील व्यक्ती दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय निर्देशानुसार अत्यावश्यक गरजा व आरोग्य विषयक बाबींच्या पूर्ततेसाठी होणारी हालचाल वगळून. तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशासोबतचे जोडपत्र क्रमांक 1 मधील कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.
           या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद, सर्व INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी, सर्व INCIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी , सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन अधिकारी,  नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद,उस्मानाबाद, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल.
          या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
          या आदेशाची अंमलबजावणी  तात्काळ लागू करण्यात येत आहे.
जोडपत्र 1 : कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात सूचना :-
 1. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी तोंडावर मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.
2. सार्वजनिक ठिकाणी आणि परिवहन जे ज्या विभागाच्या किंवा व्यक्तींच्या अधिपत्याखाली असतील त्या विभागाने किंवा व्यक्तीने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर ठेवले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
3. कोणतीही संघटना किंवा सार्वजनिक जागेचा व्यवस्थापक यांनी 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास परवानगी देऊ नये.
4. विवाहासंबंधित मेळाव्यांमध्ये, समारंभामध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक राहील. अशा ठिकाणी जास्तीत जास्त 50 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असणार नाही.
5. अंत्यविधीच्या, अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असेल अशा ठिकाणी जास्तीत जास्त 20 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असणार नाही.
6. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास राज्य सरकारने शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने निश्चित केल्यानुसार दंडासह कारवाई केली जाईल.
7. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू  इ.सेवन करण्यास परवानगी असणार नाही.
8. पान, तंबाखू  इत्यादी पदार्थांची दुकाने बंद राहतील.
9. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचे, आस्थापनांचे एकमेकांमधील अंतर 6 फूट  (2 गज की दूरी) राहील. याबाबत तसेच एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात, आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत. याबाबत दक्षता घेणे आवश्‍यक राहील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत कडक नियंत्रण ठेवणे आवश्‍यक राहील.
10. सर्व कामांच्या ठिकाणी तोंडावर व नाकावर मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे. अशा मास्क, स्वच्छ रुमालांचा  पुरेसा साठा उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
11. आस्थापनांच्या प्रमुखांनी कामाचे ठिकाणी आणि कंपनीच्या वाहतुकीचे ठिकाणी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे.
12. कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा. तसेच कर्मचाऱ्यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी.
13. सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, हात धुणे, स्पर्श न करता सॅनिटायझरच्या वापराची सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. तसेच कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
14. कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व जागा उदा. दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी दोन्ही पाळयांच्या दरम्यानच्या  कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जंतुक होईल याबाबत खात्री करावी.
 15. 65 वर्षांवरील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. (अत्यावश्यक गरजा व आरोग्याविषयक बाबीच्या पूर्ततेकरिता होणारी हालचाल वगळून)
16. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक करणे. सर्व कर्मचारी 100% सदर ॲपचा वापर करीत असल्याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेच्या विभाग प्रमुखावर राहील.
17. मोठ्या बैठका घेणे टाळावे.
 18. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णावरील उपचाराकरिता लगतच्या भागातील रुग्णालये, दवाखाने निश्चित करुन त्यांची यादी कामाचे ठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध करुन द्यावी. कोविड-19 ची लक्षणे निदर्शनास आलेल्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णालय,  दवाखान्यामध्ये तात्काळ पाठविण्यात यावे. अशी लक्षणे निदर्शनास आलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालय, दवाखान्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचेपर्यंत वेगळे ठेवण्यासाठी त्यांना विलगीकरण करावयाची ठिकाणे निश्चित करावीत.
19. ज्या ठिकाणी  वैयक्तिक किंवा सार्वजनिक वाहतूक करणे शक्य नाही अशा ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.
20. कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच त्यांच्यासोबत प्रभावी संवाद साधण्यात यावा.
                                                     ****