Followers

Monday 13 January 2020

महिला सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता समाजात जागृती करणाऱ्या मोहिमा






 शासन या महिलाविषयक महत्वपूर्ण जाणीव जागृती करणाऱ्या मोहीमा म्हणून "महिला सुरक्षा" आणि "डिजिटल साक्षरता"  ह्या दोन मोहिमा डिसेंबर महिन्यात लक्षवेधक ठरल्या. विविध प्रसारमाध्यमातून याचे प्रतिबिंबित उमटलेले दिसून येते. समाज माध्यमात देखील # ‘महिला सुरक्षा’ आणि # ‘ डिजिटल साक्षरता’ या टॅगलाईनने प्रसिध्द झाल्या.  राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने राज्यभरात जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून "महिला सुरक्षा" हा उपक्रम सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवला. तसेच राज्य महिला आयोग आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल साक्षरता ही कार्यशाळा घेण्यात आल्या.
या दोन्ही कार्यशाळेत प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामुख्याने पत्रकारांची उपस्थिती होती या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी, प्रसारमाध्यमांची भूमिका ,पत्रकारांनी वार्तांकन करताना घ्यावयाची काळजी , सायबर सेल ची कार्यपद्धती, पोलीस यंत्रणेचे समन्वय, सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी महिलांविषयक अन्याय आणि अत्याचार दूर करण्याविषयी विविध विषयावर चर्चा घडवून आणली. महिलावर अन्याय होऊ नये याविषयी काळजी काय घ्यावी, झालेल्या अन्याया विरुध्द कोणती भूमिका घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  
महिला सुरक्षा कार्यशाळेत त्रिसूत्री फार्म्यूला महत्वपूर्ण ठरला. Fly, Cry  आणि Try म्हणजेच एखाद्या मुलींनी असे लक्षात आले की आपणास या ठिकाणी धोका आहे त्यावेळी प्रथम त्या ठिकाणाहून दूर जाणे. या क्रियेला Fly असा अर्थ अभिप्रेत घेतला आहे. तसेच छेडछाड झालेल्या ठिकाणावरुन सुटका करुन पळ काढला की, मोठ्या आवाजात मदतीसाठी ओरडणे याला Cry . यानंतर झालेल्या प्रसंगाविरुध्द तक्रार देण्यासाठी प्रथम मुलींनी आई, वडील, पालक, शिक्षक यांच्यामार्फत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवणे. या गोष्टीला Try या संकल्पनेत ग्राह्य धरले आहे. ही त्रिसूत्री विशेषत: शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणी यांच्यासाठी सांगण्यात आली .
एक नागरिक म्हणून महिला अत्याचारग्रस्त कुटुंब, नातेवाईक यांच्या विषयी प्रसारमाध्यमे यांनी आणि वार्ताहर याची नेमकी कोणती भूमिका असावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  राज्याच्या 36 जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ‘महिला सुरक्षा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास हजारोंच्या संख्येत नागरिकांचा सहभाग यामध्ये नोंदवला गेला. पत्रकार विद्यार्थी , सामाजिक कार्यकर्ते,महिला आणि बाल कल्याण समिती चे पदाधिकारी,  विविध शासकीय कार्यालयातील महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता. दुहेरी संवादातून विविध विषयावर विचारमंथन झाले. सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील काही सूचना पोलीस यंत्रणा, माध्यम प्रतिनिधींना केल्या. हा दुहेरी संवाद घडुन आणण्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाने समन्वयाची भूमिका बजावली.
"डिजिटल साक्षरता" ही कार्यशाळा  राज्य महिला आयोग आणि जिल्ह्यातील विविध  सामाजिक संस्था, महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या. याची संख्या जवळपास 435 आहे. यामध्ये विद्यापीठाच्या विविध विभागाचा  समावेश होता .  या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे महिलांसाठी आपले दैनंदिन बँक व्यवहार, मार्केटिंग, ऑनलाईन खरेदी-विक्री, बचत गटाच्या माध्यमातून स्वयंविकास त्याचप्रमाणे सायबर गुन्हे होऊ नयेत या संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असून महिलांनी आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य महिला आयोगाने ही एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली होती. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाकडून साधन व्यक्ती द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. राज्यभरात या कार्यशाळेने मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गट सामाजिक संस्थांच्या महिला, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, शेतकरी, गृहिणी सहभागी झाल्या होत्या. विविध महाविद्यालयाच्या आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्था मार्फत महिलांविषयक कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेचा हेतू मुळात महिलांना तंत्रस्नेही बनवून विकास प्रक्रियेतील सक्षम  घटक बनवणे होता. स्वसंरक्षण, आपला हक्क आणि कर्तव्यांची समान पातळीवर अंमलबजावणी होण्यासाठी या दोन्ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्या आहेत. महिलांशी संबंधित या कार्यशाळेत जवळपास 4 ते 5 हजाराच्या वर महिला उपस्थित होत्या.  अजूनही काही कार्यशाळेचे आयोजन  राज्यभरात करण्यात आले आहे .
जिल्हा माहिती कार्यालय, पोलिस यंत्रणा, सायबर सेल, महिला व बालकल्याण कार्यालय , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दामिनी पथक यांचे सदस्य यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. पोक्सो कायदा , सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा विषयक विविध कायदे,  डिजिटल साक्षरतेचे महत्व आणि  ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी , बालकावर होणारा अन्यायाविरुद्ध दाद मागणाऱ्या कायद्याची माहिती विषयी जाणीव जागृती करण्यात आली. या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालय पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला. समाजातील महत्त्वाचे घटक म्हणून माध्यम प्रतिनिधी, काही ठिकाणी लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.  यामध्ये बालकांच्या मदतीसाठी 1098 ही हेल्प लाईन तसेच महिलांसाठी 1091 या हेल्पलाईनद्वारे देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती सांगण्यात आली. या कार्यशाळेची फलश्रुती म्हणजे महिलांना नवीन वर्षात तंत्रस्नेही तसेच स्वसंरक्षण प्रदान करणारे विविध घटक, कायदे याविषयी जाणीव जागृती करणारे  ठरले . नवीन वर्षात महिलांचे जीवन सुकर , सन्मानित आणि संरक्षित करणारी मोहीम म्हणून "महिला सुरक्षा "अणि "डिजिटल साक्षरता"  यामध्ये शासनाची महत्वपूर्ण भूमिका ठरली .

     -- मीरा ढास
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,
लातूर

No comments:

Post a Comment