Followers

Wednesday, 24 September 2025

राज्य शासनाने दिलेली मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 



·         जिल्ह्यात पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

·         बॅरेज दुरुस्तीच्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनातातडीने कामे करा

लातूर : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टीपुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज औसा शासकीय विश्रामगृह येथील आढावा बैठकीत दिल्या.

आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सप्टेंबर महिन्यातही जिल्ह्यात अतिवृष्टीपुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यामधून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे पालकमंत्री श्री.  भोसले यांनी सांगितले. पुरामध्ये वाहून गेलेल्या जनावरांच्या बाबतीत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून मदत वितरीत करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्यात पुरामुळे बाधित झालेल्या रस्तेपुलांची दुरुस्तीचे काम तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पुरामुळे वाहून गेलेल्या पूलरस्त्यांचा सर्व्हे करून त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या शेतकरीनागरिक यांच्या बचावासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय जलदगतीने कार्यवाही करत नागरिकांची सुटका केली आहे. याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचमाने करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. खरडून गेलेल्या जमिनींचा स्वतंत्र सर्व्हे करून मदत द्यावी, असे आ. पवार यावेळी म्हणाले.

उदगीर, जळकोट तालुक्यातही अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांना जोडणारे पूल, रस्ते वाहून गेले आहेत. त्यांची तत्काळ दुरुस्ती आवश्यक असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नेटके यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिक नुकसानीची माहिती दिली.

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी




एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

"काळजी करू नका, शासन आपल्या सोबत... 

छत्रपती संभाजीनगर, दिनांक 24 :  जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली व सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता.अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे" असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

जालना जिल्ह्यातील सोमठाणा, ता.बदनापूर शिवारात आज सकाळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह महसूल, कृषि, पशुसंवर्धन, कृषि विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री.भरणे संवाद साधताना म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाने कष्टाने पिकविलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे. कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

जालना‍ जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शेतीशिवारात पिके पाण्याखाली आहेत, तर कुठे वाहून गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहचलिच पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

राज्याच्या कृषिमंत्री म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच शासनाची भूमिका शेतकऱ्याला आधार देण्याचीच असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होताच मदत तत्परतेने मदत मिळेल, संकटाच्या काळात आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूयात असेही ते म्हणाले.

यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साडेसांगवी पुरग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा : उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी तातडीने दिले मदतीचे आदेश

 


धाराशिव : “सगळं काही वाहून गेलं आहे,फक्त आत्महत्या करणं बाकी राहिलंय…” अशा शब्दांत साडेसांगवी (ता.भूम) येथील पुरग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज साडेसांगवी गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची पाहणी केली.यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत सुरू करा” अशा स्पष्ट सूचना दिल्या.गावातील १५० कुटुंबांना तातडीने किराणा किट वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे बाणगंगा व रामगंगा नदीवर मोठा पूल बांधण्याची,तसेच घर व शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.श्री.शिंदे यांनी या मागण्यांवर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू,ब्लॅंकेट्स व किराणा किटचे वाटप करण्यात आले.
या दौऱ्यात आमदार तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांच्यासह जलसंपदा, कृषी,पाटबंधारे व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण केले जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस








टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार
• उजनी येथे तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी
• औराद शहाजानी येथे पूर संरक्षक भिंत, बॅरेजेसची कामेही होणार
लातूर, दि. २४ : राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे मोठ्या नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार बसवराज पाटीलजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उजनी येथे उपस्थित होते. तर औराद शहाजानी येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आय.एम. चिश्ती उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा नदीपात्राची, नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उजनी गावालगत असलेल्या तेरणा नदीपात्राची व गावातील घरे, दुकानांचे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांकडून शेतपिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.
टंचाईच्या काळात लागू असलेल्या उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करण्यात येतील. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात, दुकानात शिरल्याने झालेल्या नुकसानीचीही मदत देण्यात येईल. कालच (मंगळवार) राज्य शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा २ हजार २०० कोटींचा पहिला हप्ता मंजूर केला. ज्याप्रमाणे नुकसानीचे अहवाल प्राप्त होतील, त्यानुसार अधिकची मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाची उभारणी, तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी केली. आमदार संजय बनसोडे यांनीही उदगीर, जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
औराद शहाजानी येथे पूर संरक्षक भिंत उभारणार
महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकरी शिवपूत्र आगरे यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या पाण्याची आणि नुकसानीची व इतर ग्रामस्थांनी मूग, उडीद, मका, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांना दिला. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्यामुळे नदीमध्ये येणाऱ्या पाण्यात अचानक वाढ होते, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते, त्यासाठी नदीवर बॅरेजसची उभारणी करून पुरावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. औराद शहाजानी येथील पुराचा प्रश्न सोडविण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधण्यात येईल. जुन्या बॅरेजसच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. या बॅरेजसला आधुनिक पद्धतीचे दरवाजे बसविण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
औराद येथे मांजरा व तेरणा नद्याच्या संगमामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकाच्या नुकसानीसह जमीन खरडून गेली आहे. मांजरा, तेरणा नदीच्या संगमामुळे नदी पात्र वाढते, म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही बॅरेजेसबाबत सुचवले आहेत, त्यानुसारही कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पंचनाम्यासाठी ड्रोन, मोबाईल फोटो ग्राह्य
नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या भागात पाणी शिरले अशी नोंद आहे, पण तिथे पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या पंचनामाही ग्राह्य धरण्यात येईल. तसेच मोबाईलवरील फोटोही स्वीकारण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

 




सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, त्यांना अन्न, पाणी, वीज व औषधांची सुविधा पुरवावी, तसेच ज्यांचे धान्य भिजले आहे त्यांना तत्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिल्या.
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुनी मंगल कार्यालय, संगोबा रोड, करमाळा येथे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असून उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 





अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
सोलापूर :- जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते त्याप्रमाणेच अतिवृष्टी, ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दारफळ गावात पुरामुळे मोठे नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे, शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी शासन मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीलाही स्वतंत्र मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दौऱ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पुरबधित करंजा गावाच्या शिंदे व करळे वस्तीची पाहणी पालकमंत्री श्री.सरनाईक व आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांची उपस्थिती

 





ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली नुकसानीची माहिती
करळे वस्तीला बोटीने जाऊन दिली भेट
मदतीबाबत बाधितांना केले आश्वस्त
धाराशिव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज २४ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील पुरबधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व उपस्थित वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली.यावेळी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे व तहसीलदार नीलेश काकडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांनी यावेळी करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पुरबधित घराची पाहणी केली.या वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी श्री.शिंदे यांचेकडे बाधित वस्तीतील लोकांनी केली असता नक्कीच आपले पुनर्वसन करण्यात येईल याची ग्वाही श्री.शिंदे यांनी यावेळी दिली.
श्री.शिंदे यावेळी म्हणाले की,बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तात्पुरती लवकरच मदत करण्यात येईल.तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल. अटी व निकष यामध्ये शिथिलता आणण्यात येईल.यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. मदतीपासून कोणीही वंचीत राहणार नाही.जमीन पूर्णता खरडून गेली आहे,याबाबत मदतीचे निकष बदलविण्यात येतील.असे त्यांनी सांगितले.
श्री.शिंदे पुढे म्हणाले की,बाधितांना आता मदतीची आवश्यकता असून प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत करावी.नैसर्गिक आपत्ती कोसळली असून अशाप्रकारच्या संकटांना न घाबरता धीर धरावा.सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.केंद्र आणि राज्य सरकारची मदत देऊन जनतेला आधार देण्यात येईल.पंचनाम्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर आल्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. असे श्री.शिंदे यांनी बधितांना आश्वस्त केले.
करंजा गावाचा भाग असलेल्या शिंदे वस्तीतील पोलीस पाटील बाळासाहेब चांगदेव शिंदे यांच्या घराचे पूर्णता नुकसान झाले असून श्री.शिंदे यांच्यासह पालकमंत्री श्री.सरनाईक, आरोग्यमंत्री श्री.आबिटकर व आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी त्यांच्या घरात जाऊन संसारोपयोगी साहित्याच्या नुकसानीची पाहणी केली.
तसेच जवळच्या करळेवस्तीला एनडिआरएफच्या बोटीने जाऊन भेट दिली व बाधित वस्तीतील लोकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.त्यांना धीर देऊन मदतीची ग्वाही दिली.

Tuesday, 9 September 2025

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

 


·                     १६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान

मुंबई, दि. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १२,६५५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून ७ लाख ४०७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेचनागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून २३६ शिबिरांतून एकूण १६,७९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षमहात्मा फुले जन आरोग्य योजनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयेजिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

२८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानात :

एकूण आरोग्य शिबिरे : १२,६५५

एकूण लाभार्थी रुग्ण : ७,०४,०७३

एकूण पुरुष लाभार्थी : ३,१३,५०८

एकूण महिला लाभार्थी : ३,०५,०३४

लहान बालक लाभार्थी : ८५,५०८

संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : १८,८००

एकूण रक्तदान शिबिरे : २३६

एकूण रक्तदाते : १६,७९८

महाराष्ट्रातील ७.०४ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतलातर १६,७९८ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान

सर्वाधिक शिबिरे : पुणे – २५२५

सर्वाधिक रुग्ण तपासणी : पुणे – १,६५,७१८

सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे – ३,६१३

सर्वाधिक रक्तसंकलन : कोल्हापूर – ४,५०४

बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – २०,७८१

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Wednesday, 3 September 2025

गडांचा राजा : राजगड

 विशेष लेख


सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेलाभव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटनाशौर्यगाथाराजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गडकेवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटाखडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहाससाहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. हा किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाहीतर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतताप्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो.

प्राचीन इतिहास

आजचा राजगड किल्ला मुळात "मुरुंबदेव" या नावाने ओळखला जात होता. विविध राजवटींच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता. परंतु इ.स. १६४३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले. तेव्हाच या गडाला "राजगड" म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला.

या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले. १६६४ मध्ये सूरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली. भक्कम तटबंदीमजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.

आजही राजगड हा इतिहाससाहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील सुवेळा माचीसंजीवनी माची आणि बालेकिल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. इतिहासप्रेमीसाहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.

नैसर्गिक रचना आणि संरक्षण व्यवस्था

राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिरपद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हेतर सैन्याच्या हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाची होती.

किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. येथे तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी नेढे नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतो. बालेकिल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.

राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगरांच्या उंचसखल उतारांवर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळसरळ तटबंदीवर अवलंबून न राहता तीन प्रमुख माच्या – पद्मावतीसंजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेल्या आहेत. या प्रत्येक माचीचा आपापला वेगळा उपयोग होता :

•          पद्मावती माची  गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासनिक व निवासी केंद्र होती. येथे राजसदरपद्मावती देवीचे मंदिरमहाराजांचे निवासस्थानराणीवसा तसेच मंत्र्यांचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे.

•          संजीवनी माची  पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदीअर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टींनी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.

•          सुवेळा माची  पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यांवर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकीपहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्तअरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरत असे.

या तिन्ही माच्या एका ठिकाणी येऊन मिळतात – तो म्हणजे बालेकिल्ला. उंच मनोरेभक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षणस्तर. गडाच्या प्रवेशासाठी पालीगुंजवणे व अळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यांमुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती.

गडाचे वैशिष्ट्य

राजगडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हतातर राजकारणप्रशासनसैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गड उभारण्यात आला. वळणावळणाच्या पायवाटाधान्यकोठारेपहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला.

सांस्कृतिक वारसा

आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाहीतर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. येथे होणारे उत्सव गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्येभाषणेशिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो.

जागतिक ओळख

इतिहासवास्तुकलायुद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाहीतर तो एक साहसएक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. येथील प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो. ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाने करतो.

राजगड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. येथे आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो. एकदा का तुम्ही येथे पोहोचलाततर हा प्रवास केवळ एक ट्रेक राहणार नाहीतर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल. राजगड तुमची वाट पाहतो आहेचला निघा गडांच्या राजाला भेट द्यायला!

- संजय डी.ओरके

विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालयमुंबई