Followers

Tuesday, 27 May 2025

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

 







 नवी दिल्ली :  विविध क्षेत्रांमध्ये  अतुलनीय काम करणा-या  68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील  सहा मान्यवरांचा  समावेश आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या  व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखडप्रधानमंत्री नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहतसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण  व केंद्र शासनातील  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा  मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी  यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर  अशोक सराफअच्युत पालव अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना  पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी  यांना सार्वजनिक क्षेत्रात  अमूल्य योगदानासाठी  पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री. उन्मेश जोशी यांनी स्विकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकमहापौरआमदारमुख्यमंत्रीकेंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षणशिस्तआणि कार्यक्षम नेतृत्वाने  आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

अशोक सराफ :

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राटज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार  प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजताटायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'बाळाचे बाप ब्रम्हचारीआणि 'पंढरीची वारीयासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिलीप कुमार यांनी सराफ यांना त्यांच्या अभिनयाच्या टायमिंगसाठी शाबासकी दिली होती. श्री. सराफ यांचा अभिनय जीवनभर अविस्मरणीय ठरला आहे. अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपार यश मिळवले असूनतो आजही मराठी रसिकांचा आवडता चित्रपट आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येदेखील अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अच्युत पालव :

देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्जनशीलतेतून देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता प्रभावीपणे समोर येते.अच्युत पालव यांची कला शैली ही पारंपरिकतेचा गाभा राखत आधुनिकतेशी सुसंगत अशी असूनते अक्षरांना विशिष्ट आकारसंतुलन आणि कलात्मक स्पर्श देतात. त्यांच्या लेखनातून केवळ पठनीयता जपली जात नाहीतर सौंदर्यदृष्ट्याही ते अक्षरांना एक नवे आयाम मिळवून देतात. ते फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही देवनागरी लिपीचा प्रचार व प्रसार करतात. त्यांनी विविध देशांमध्ये कार्यशाळाप्रदर्शने आणि सेमिनार्सद्वारे देवनागरी लिपीची कला आणि तिची वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली आहेत. यासोबतत्यांच्या प्रकाशित पुस्तकांमुळे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांमुळे नागरी लिपीला एक स्वतंत्र कला म्हणून प्रतिष्ठा लाभली आहे.

अश्विनी भिडे-देशपांडे :

जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालपणापासून संगीताची गोडी असलेल्या अश्विनी यांनी "गांधर्व महाविद्यालयातून "संगीत विशारद" पदवी प्राप्त केली. पं. नारायणराव दातार आणि आई माणिक भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जयपूर घराण्याची सखोल साधना केली.त्यांच्या गायकीत रागांची सौंदर्यपूर्ण मांडणीभावाभिव्यक्ती आणि लयकारी यांचे अद्वितीय समन्वय आढळतो. त्यांनी शास्त्रीय गायनाबरोबर ठुमरीभजनअभंग यातही निपुणता साधली आहे. एचएमवीसह अनेक नामवंत संगीत कंपन्यांमार्फत त्यांचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. "राष्ट्रीय कालिदास सन्मान"(2016), "संगीत नाटक अकादमी पुरस्कार"(2015), "राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान" (2005) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आजही त्या आपल्या गायनअध्यापन व कार्यशाळांद्वारे ख्याल गायकीची परंपरा समृद्ध करत आहेत.

सुभाष शर्मा :

यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींचा अवलंब करून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहेत. सुभाष शर्मा यांचे वडील खेतूलाल यांच्या 16 एकर शेतीची जबाबदारी त्यांच्या निधनानंतर  त्‍यांच्यावर आली. मात्र, 2011 मध्ये त्यांनी वडिलोपार्जित शेती विकून तिवसा शिवारात त्यांनी 16 एकर जमीन खरेदी केली. नव्या जमिनीवर त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू केले. मातीची सुपीकता राखण्याचे तंत्रपिकांचे नियोजन आणि पर्यावरणपूरक पद्धती यामुळे त्यांची शेती देशभरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली. सततच्या प्रयोगशीलतेने आणि जिद्दीने त्यांनी शेतीत नवदृष्टी निर्माण केली. त्यांचा संघर्षनवनिर्मितीचा दृष्टिकोन आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

डॉ. विलास डांगरे :

70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. खास करून 2014 मध्ये नागपूरच्या कस्तूरचंद पार्कमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घश्याला त्रास झाला होतातेव्हा डॉ. डांगरे यांनी केलेल्या उपचारामुळे त्यांना आराम पडला होता. नागपूरमधील त्यांचे क्लिनिक गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरले असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना उपचार दिले आहेत. 10 वर्षा पासून ते दिव्यांग-दृष्टीहीन झाले आहेत. तथापित्यावरही मात करत ते आपली  अमूल्य  सेवा रुग्णांना देत आहेत. 

यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात  71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3  पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे  यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची  निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

Monday, 5 May 2025

वेव्हज्‌ २०२५ – प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ


माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार

जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज्‌ जाहीरनामा

क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार

वेव्हज्‌मध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित

मुंबई, दि. ०५ : वेव्हज्‌ अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत उत्साहात समारोप झाला. या शिखर परिषदेला प्रदर्शक, उद्योग धुरीण, स्टार्टअप्स, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोत, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली.  प्रदर्शने, पॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासह, या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने विविध तारेतारका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या या महोत्सवाचा गुरुवारी  प्रारंभ झाला. वेव्हज्‌ हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधाची ही एक लाट आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात केले. भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जगातील सर्जकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांच्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना केवळ प्लॅटफॉर्ममध्येच नव्हे, तर लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतीय तरुणांना त्यांच्या एक अब्ज न सांगितलेल्या कथा जगाला सांगण्याचे आवाहन केले. वेव्हज म्हणजे भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेची पहाट असल्याचे जाहीर करत त्यांनी युवा वर्गाला या सृजनशील लाटेवर स्वार होण्याचे आणि भारताला जागतिक सर्जनशील निर्मिती केंद्र बनवण्याचे आवाहन केले.


उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे

पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या उद्देश पुढे नेत, चार दिवसांत वेव्हज 2025 ने विचार, कौशल्य आणि महत्त्वपूर्ण अभिप्राय यांच्या उच्चस्तरीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. वेव्हज 2025 चा विचारविनिमय मागोवा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करत होता, ज्यामुळे जगभरातील विचारवंत, उद्योगधुरीन, धोरणकर्ते आणि व्यावसायिक एकत्र आले. पूर्ण सत्रे, विभागीय चर्चासत्रे आणि महत्वपूर्ण शिक्षणसत्रांच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या मालिकेद्वारे, शिखर परिषदेने माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नवीनतम नवकल्पना आणि उदयोन्मुख धोरणांचा शोध घेतला. या सत्रांनी विशेषज्ञता क्षेत्रात वैचारिक देवाणघेवाण करण्यास सक्षम केले.


वेव्हज्‌ची प्रारंभिक आवृत्ती उच्च-परिणाम साधणारी ज्ञानवर्धक सत्रे आणि प्रसारण तसेच माहिती आणि मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र, डिजिटल मीडिया आणि चित्रपट यासारख्या विषयांच्या विस्तृत व्याप्तीचा समावेश असलेल्या चर्चासत्रांच्या माध्यमातून स्मरणात राहील. तीन मुख्य सभागृहांमध्ये (प्रत्येक सभागृहात एक हजारहून अधिक सहभागी सामावले जातील) तसेच 75 ते 150 पर्यंत क्षमता असलेल्या पाच अतिरिक्त सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 140 हून अधिक सत्रांसह, शिखर परिषदेत उपस्थिती मोठ्या संख्येने राहिली – अनेक सत्रांमध्ये पूर्ण उपस्थिती नोंदवली गेली.


पूर्ण सत्रांमध्ये मुकेश अंबानी, टेड सॅरंडोस, किरण मजुमदार-शॉ, नील मोहन, शंतनू नारायण, मार्क रीड, ॲडम मोसेरी आणि नीता अंबानी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची 50 हून अधिक प्रमुख भाषणे होती. विकसित होत असलेल्या मनोरंजन उद्योग, जाहिरातीचे विशाल क्षेत्र आणि डिजिटल परिवर्तनाबाबत त्यांनी महत्वपूर्ण अभिप्राय मांडत यथार्थ चित्र सादर केले. चिरंजीवी, मोहनलाल, हेमा मालिनी, अक्षय कुमार, नागार्जुन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अल्लू अर्जुन आणि शेखर कपूर यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्यांपैकी बहुतांश जण वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य होते, आभासी निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सिनेमा आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यावर विचारपूरक चर्चा केली.

वेव्हज्‌ 2025 मधील 40 महत्वाची शिक्षण सत्रे व्यावहारिक शिक्षण आणि सर्जनशील अन्वेषण देण्यासाठी विशेषत्वाने निर्मित केली होती. आमिर खानचे द आर्ट ऑफ ॲक्टिंग, फरहान अख्तरचे क्राफ्ट ऑफ डायरेक्शन आणि मायकेल लेहमनचे इनसाइट्स इन फिल्ममेकिंग यासारख्या सत्रांद्वारे सहभागींना उद्योग तंत्रांचा थेट अनुभव घेता आला. ॲमेझॉन प्राईमद्वारे पंचायत बनवणे, ए आर लेन्स डिझाइन करणे, ए आय अवतार तयार करणे आणि उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गेम विकसित करणे यासारख्या पडद्यामागील अदाकारी पेश करण्यात आली. या सत्रांमध्ये व्यावसायिक आणि इच्छुक निर्मात्यांना वेगाने विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहण्यासाठी कृतीशील ज्ञान आणि साधनसामग्रीविषयी माहिती प्रदान करण्यात आली.


वेव्हज्‌मध्ये 55 विभागीय चर्चासत्रे देखील होती ज्यांनी प्रसारण, डिजिटल मीडिया, ओटीटी, ए आय, संगीत, बातम्या, लाइव्ह कार्यक्रम, ॲनिमेशन, गेमिंग, आभासी निर्मिती, चित्रकथा आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विशेष संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या परस्परसंवादी सत्रांमध्ये मेटा, गुगल, ॲमेझॉन, एक्स, स्नॅप, स्पॉटीफाय, डी एन ई जी, नेटफ्लिक्सआणि एन व्ही आय डी ए आय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यावसायिकांसह फिक्की, सी आय आय आणि आय एम आय सारख्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले. क्षेत्र-विशिष्ट महत्वपूर्ण अभिप्राय आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या या चर्चेत गंभीर आव्हानांबाबत उपाय शोधण्यात आले आणि वाढ आणि नवोन्मेषासाठी नवीन दिशानिर्देश देण्यात आले.

वेव्हज्‌ बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावले; महाराष्ट्र शासनाने ‘माध्यम आणि मनोरंजन’ क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले वेव्हजच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्हज बाजारचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला कारण त्याने सर्जनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होते, ज्यामध्ये 3,000 हून अधिक बीटूबी बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणून, न्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीत विषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझार चे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे ‘देवी चौधराणी’ चित्रपटाची घोषणा, जो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि ‘व्हायलेटेड’ चित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.

महाराष्ट्र शासनाने वेव्हज्‌मध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, तर राज्याच्या उद्योग विभागाने प्राइम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3,000 कोटी रुपयांचे आणि 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले.


जागतिक माध्यम संवाद 2025 मध्ये सदस्य राष्ट्रांनी ‘वेव्हज जाहीरनामा‘ स्वीकारला

मुंबईतील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज 2025) आयोजित करण्यात आलेला जागतिक माध्यम संवाद 2025 हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होता ज्यामध्ये 77 राष्ट्रांचा सहभाग होता, जो जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो. वेव्हज 2025 मधील जागतिक माध्यम संवादाने सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे ‘वेव्हज घोषणापत्र’ स्वीकारले, त्यामध्ये डिजिटल अंतर कमी करण्याची तातडी आणि जागतिक शांतता व सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमांचा वापर यावर भर देण्यात आला. चर्चेमध्ये विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढणाऱ्या सर्जक अर्थव्यवस्थेत वैयक्तिक कथांचे महत्त्व अधोरेखित झाले.


केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तंत्रज्ञान आणि परंपरेच्या समन्वयावर जोर देत, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाद्वारे तरुणांना सक्षम करण्याची गरज मांडली. माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आशय-सामग्री निर्मितीवर असलेल्या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला आणि स्थानिक आशय-सामग्री, सह-निर्मिती करार आणि संयुक्त निधी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या “क्रिएट इन इंडिया” स्पर्धेतून 700 हून अधिक जागतिक सर्जकांना यशस्वीपणे निवडण्यात आले, आणि पुढील आवृत्तीत ही स्पर्धा 25 जागतिक भाषांमध्ये विस्तारित करण्याची योजना जाहीर करण्यात आली. या परिषदेने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भविष्यातील जागतिक सहकार्यासाठी मजबूत पायाभरणी केली, तसेच त्यामध्ये सर्जनशील उत्कृष्टता आणि नैतिक सामग्री निर्मितीवर भर देण्यात आला.


वेव्हज: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आकांक्षी स्टार्ट-अप्ससाठी एक प्रवेगक

वेव्हज्‌ स्टार्ट-अप प्रवेगकांनी 45 प्रमुख एंजेल गुंतवणूकदारांपैकी लुमिकाई, जिओ, कॅबिल, वॉर्मअप व्हेंचर्स सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अद्वितीय कल्पना थेट मांडण्यासाठी  30 माध्यम आणि मनोरंजन स्टार्ट-अप्सची निवड केली. 1000 हून अधिक नोंदणींसह, या उपक्रमामुळे सध्या सुरू असलेल्या 50 कोटी रुपयांच्या गुंतवणूक अपेक्षित आहेत. याशिवाय, 100 हून अधिक स्टार्ट-अप्सनी समर्पित स्टार्ट-अप पॅव्हेलियनमध्ये संभाव्य गुंतवणूकदारांना त्यांच्या संकल्पना आणि उत्पादने प्रदर्शित केली. वेव्हज एक उपक्रम म्हणून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे एंजल गुंतवणूकदार नेटवर्क तयार करून स्टार्ट-अप्सना भरभराटीसाठी आणि वाढीसाठी एक स्पष्ट गुंतवणूक परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. टियर 1 आणि टियर 2 मधील स्टार्ट-अप्स वेव्हज मध्ये चमकले आणि त्यांच्या संस्थापकांनी केंद्रस्थानी स्थान मिळवले. अशा निर्मात्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी वेव्हज्‌ इनक्यूबेटरचे नेटवर्क स्थापित करेल ज्यामध्ये समर्पित मार्गदर्शक आणि बीज भांडवल गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार असतील. वेव्हएक्स (WAVEX) अनोखे आहे कारण ते अशा कल्पनांना सुविधा देते ज्यांचे अद्याप मूर्त उत्पादन नाही, परंतु त्यांच्याकडे ठोस क्षमता आहे.


वेव्हज्‌ 2025 मध्ये प्रकाशित प्रमुख ज्ञान अहवाल

माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मुंबईतील वेव्हज परिषद 2025 मध्ये पाच महत्त्वपूर्ण अहवालांचे अनावरण केले. हे अहवाल भारताच्या समृद्ध माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेचे सर्वसमावेशक विहंगावलोकन करतात, त्यात आशय सामग्री निर्मिती, धोरणात्मक चौकट आणि थेट कार्यक्रम यांसारख्या प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.


माध्यम आणि मनोरंजनावरील सांख्यिकीय पुस्तिका 2024 – 25:

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेली ही सांख्यिकीय पुस्तिका भारताच्या माध्यम परिदृश्यातील वाढीचे कल, प्रसारण, डिजिटल माध्यम, चित्रपट प्रमाणन आणि सार्वजनिक माध्यम सेवांबाबत महत्त्वपूर्ण डेटा-आधारित अंतर्दृष्टी प्रदान करते. भविष्यातील धोरणनिर्मिती आणि उद्योग धोरणांसाठी अनुभवजन्य पुराव्यांवर आधारित आवश्यक माहिती उपलब्ध करून देते.


‘फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स’ – बीसीजी

बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा हा अहवाल भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेच्या विलक्षण वाढीवर प्रकाश टाकतो, त्यात 20 ते 25 लाख सक्रिय डिजिटल सर्जकांचा सहभाग आहे. या सर्जकांचा वार्षिक 350 अब्ज डॉलरहून अधिक खर्चावर प्रभाव पडतो, आणि 2030 पर्यंत हा आकडा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. हा अहवाल सर्जकांसोबत लघुकालीन व्यवहारांऐवजी दीर्घकालीन, प्रामाणिक भागीदारी निर्माण करण्यावर जोर देतो.


‘अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ – अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young)

अर्न्स्ट अँड यंगचा हा अहवाल भारताला त्याच्या भाषिक विविधता, समृद्ध संस्कृती आणि तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर जागतिक सामग्री केंद्र म्हणून चित्रित करतो. यामध्ये अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांमध्ये भारताला 40 – 60 टक्के खर्चाचा फायदा आणि भारतीय ओटीटी सामग्रीसाठी वाढती आंतरराष्ट्रीय मागणी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे भारताची जागतिक सांस्कृतिक राजकीय भूमिका बळकट होत आहे.


कायदे आणि थेट कार्यक्रम क्षेत्रातील घडामोडी:

‘खैतान अँड कंपनी’च्या नव्या कायदेशीर मार्गदर्शक पुस्तिकेत इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि त्यासंदर्भातील नियमावली यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, मिडिया क्षेत्रातील व्यावसायिकांना भारतातील नियामक चौकटीतून वाट काढण्यासाठी मदत मिळणार आहे. याशिवाय, भारतातील थेट कार्यक्रम क्षेत्रावर प्रकाशित करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेनुसार सध्या या क्षेत्राची 15 टक्के दराने वाढ होत असून, त्या पार्श्वभूमीवर, या वाढत्या उद्योगासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि परवाना प्रक्रियेतील सुलभता अत्यावश्यक आहे असेही  या श्वेतपत्रिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी: राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) – मुंबईत स्थापन होणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी क्षमता बांधणीत एक मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव्हज 2025 च्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली. प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रुपात स्थापित करण्यासाठी वेव्हजने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहयोगाला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. वैष्णव यांनी प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला. ज्याप्रमाणे आयआयटी आणि आयआयएम या संस्था तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आदर्श बनल्या आहेत त्याप्रमाणेच आयआयसीटी आपल्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले. दीर्घकालीन सहकार्यासाठी हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओस्टार, अ‍ॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे.


क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील  प्रतिभेचा जागतिक उत्सव

वेव्हज् 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व  1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशन, एक्सआर, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रपट निर्मिती, डिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगट, भौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला  स्टार बनवले आहे.

32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हज्‌मधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते संपर्क करू शकले.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहता, विविधता, युवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती.  होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेष, ड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी  जगासमोर येण्याची एक संधी  देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. “प्रवास आता सुरू झाला आहे,” हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.


8 वे राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार

वेव्हज्‌चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी देशभरातील 12 उत्कृष्ट सामुदायिक नभोवाणी केंद्रांना ‘राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार’ देऊन गौरवले. डॉ. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे राष्ट्रीय संमेलन भारतातील सामुदायिक माध्यमाच्या क्षेत्राला नवप्रवर्तन, समावेश आणि प्रभावाच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विचारमंथन आणि  सहकार्याची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने देशभरातील 400 पेक्षा अधिक सामुदायिक नभोवाणी (सीआर) केंद्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर आले होते. सध्या देशात एकूण 531 सामुदायिक नभोवाणी केंद्र कार्यरत आहेत.


भारत मंडप– ‘कला ते कोड’ प्रवास

वेव्हज्‌ 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा ‘कला ते कोड’ या संकल्पनेतून उलगडणाऱ्या ‘भारत मंडप’ या अनुभवात्मक विभागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडपामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तोंडी आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवप्रवर्तनापर्यंतच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवले गेले.

‘भारत मंडप’ने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि नव्या तंत्रज्ञान लाटेचा समतोल साधत भारताचा आत्मा उलगडला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंडपाला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री  एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच अनेक मान्यवरांनीही भेट देऊन या मंडपाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोक भारताच्या सांस्कृतिक खजिन्यांच्या शोधामुळे आ‍श्‍चर्यचकित  झाले.

भारताच्या सर्जनशील प्रवासाचा गौरव करणारे हा मंडप केवळ एक प्रदर्शन नव्हते, तर भारताला एका सर्जक राष्ट्राच्या रूपात मांडणारे प्रभावी माध्यम होते. या मंडपाने भारताची सांस्कृतिक खोली, कलात्मक उत्कर्ष आणि जागतिक कथाकथनात उद्योन्मुख नेतृत्व दाखवून दिले.

वेव्हज्‌चा समारोप – सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

वेव्हज्‌ 2025 ने सर्जनशीलता, व्यापार आणि सहयोग यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून एक उच्च दर्जा प्रस्थापित केला. दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक घोषणा, आंतरराष्ट्रीय करार, मजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवोपक्रम गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्हजने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. 77 देशांनी वेव्हज जाहीरनाम्याला पाठिंबा दिला. वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स अॅक्सलरेटरचे यश यामुळे स्पष्ट झाले की, भारत नावीन्य, समावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत आहे. या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतर, वेव्हजने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नाही, तर एक जागतिक चळवळ सुरू केली आहे — जी जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणा, गुंतवणूक आणि संधी देत राहील


Sunday, 4 May 2025

डिजिटल माध्यमातील प्रचार प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा आवश्यक - एम. ए. पार्थसारथी

 


'डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' परिसंवाद

मुंबई : डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.

श्री. पार्थसारथी म्हणाले, सामजिक संशोधनातून  माहिती संग्रहित करताना नमुना निवड पद्धती, जनगणना, सर्वेक्षण, संभाव्यतेवर आधारित, निश्चित माहिती, निवडक ग्राहकांवर आधारित माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विविध डिजिटल माध्यमातून योग्य घटकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होते.

डेटाचा उपयोग आज केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर संपूर्ण जाहिरात प्रक्रियेचा शोध, नियोजन, अंमलबजावणी, आणि मोजमाप या सर्व टप्प्यांमध्ये केला जातो. सध्या शासकीय, खासगी क्षेत्रात जाहिरातीचे महत्व वाढले आहे. वयोगट, लिंग, आवडीनिवडी, ऑनलाइन वर्तन यावर आधारित जाहिरातीसाठी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकासाठी डेटा गोळा करताना त्यांची स्पष्ट संमती आणि खात्री अत्यंत आवश्यक आहे, असेही श्री. पार्थसारथी यांनी सांगितले.

अचूक माहिती संकलित करणे गरजेचे

ग्राहक स्वतःहून वेगवेगळ्या ब्रँडला डेटा देतो. पण त्यांची संमती आवश्यक आहे. यात खरेदीची योजना, वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी आणि संवादाचे माध्यम निवडण्यासारख्या बाबींचा समावेश होतो. ग्राहकांच्या थेट संवादातून माहिती संकलित केली जाते, दुसऱ्या कंपनीकडून डेटा विकत घेतला जातो. याची अचूक माहिती संकलित केली जाते.


अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल – अभिनेता आमिर खान


मुंबई :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली.

 आमिर खान पुढे म्हणाले की, मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत या लहान-लहान गोष्टी शिकलो, ज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.

चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलताना, आमिर खान म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे! एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते.

एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे,  असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले,  ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहे. आणि  त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातात? त्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतो. मी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतो. जर पटकथा चांगली असेल, तर तुम्हाला त्या पात्राची समज येईल, त्याचे भौतिक स्वरुप, वृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल”. याव्यतिरिक्त, दिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते.

अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहे. त्यामुळे मी हाताने संवाद लिहितो. सर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतो. संवादांचे पाठांतर झालेच पाहिजे. पहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतो, तीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतो. संवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेत. ते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेत. ज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होते. पण नंतर ते तुमचे झाले आहेत. ज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असते? त्यावर आमिर खान म्हणाले, की कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे.

नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे - "तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल".

तर, मग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात?

याचे उत्तर असे, की "मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही."

आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणता? अनेकांनी अंदाज लावलाच असेल, की तो चित्रपट 'तारे जमीन पर' असावा. तर होय, कारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायला, त्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले!

अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत?

"भावना या पटकथेतूनच समोर येतात. तुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतो. कधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतात, जी अविश्वसनीय वाटतात. पण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते".

चांगली पटकथा म्हणजे काय असते? आमिर खान यांनी उत्तरात सांगितले, की "चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतो. कथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजे. नाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल".

मात्र, चित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे - "जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहे, ते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका".

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला 


जनरेटिव्ह ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल

 


जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्र

"जनरेटिव्ह ‘एआय’ स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग" चर्चासत्र

मुंबई  :- मीडिया व्यवसाय आता केवळ माहिती किंवा करमणुकीपुरता मर्यादित न राहता अत्याधुनिक डिजिटल अनुभव देणाऱ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. जनरेटिव ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन झाले असून ‘एआय’ ही केवळ कल्पना नसून व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी वस्तुस्थिती असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-2025  समिटमध्ये वेव्हजएक्स मध्ये "जनरेटिव्ह ‘एआय’ स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग" या विषयावरील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.  या चर्चा सत्रात उद्योग विषय तज्ञ महेश्वरन जी. आणि AWS चे पुण्यब्रथा दासगुप्ता यांनी सहभाग घेतला.

‘एआय’चा वापर आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नवे क्षितिज खुले करत आहे.  या क्षेत्रातील कंपन्या व उद्योग एआयच्या मदतीने डिजिटल मूल्य निर्माण करत आहेत. ग्राहक अनुभव सुधारणे, उत्पादकता वाढवणे, जुन्या कंटेंटचा वापर करून नवे उत्पन्न मिळवणे आणि सर्जनशीलतेत वाढ  या चार स्तंभांवर एआय आधारित यशस्वी मॉडेल तयार होत आहेत, असे या चर्चा सत्रात सांगण्यात आले.

मीडिया आणि मनोरंजन उद्योगात जनरेटिव्ह ‘एआय’ (Generative AI) मुळे मोठे बदल घडत आहेत. पूर्वी एकसंध असलेला प्रेक्षक वर्ग आता विविध प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या वेळांना आणि  विविध पद्धतींनी कंटेंट पाहू लागला आहे. त्यामुळे उद्योगात वैयक्तिकरण, शिफारसी, आणि स्केलेबिलिटी यासारख्या बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

जनरेटिव्ह एआय केवळ स्क्रिप्ट लेखन किंवा व्हिडिओ निर्मितीपुरता मर्यादित न राहता, स्टोरीबोर्डिंग, टीआरपी विश्लेषण, जुना कंटेंट नव्याने सादर करणे अशा अनेक टप्प्यांवर उपयोगी ठरतो. जुनी पात्रं आणि प्रसंगही ‘एआय’च्या मदतीने नव्या रूपात पुन्हा सादर करता येतात. तसेच मीडिया उद्योगासाठी ‘एआय’ केवळ कल्पनाशक्ती वाढवण्याचे नव्हे, तर नफा वाढवण्याचेही साधन ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल - कलादिग्दर्शक पी.एम. विचारे

 


‘डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा' परिसंवाद

मुंबई : शिल्पकला ही इतिहासाची साक्षीदार असते. एखादी शिल्पकृती पाहिली की त्यामधून प्राचीन काळातील घटना, प्रसंग आणि संस्कृती समजते. शिल्पकलेद्वारे आपल्याला इतिहास समजून घेऊन तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो.  शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होते, असे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी यावेळी सांगितले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा'  या विषयावर श्री विचारे यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. विचारे यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून श्रोत्यांना शिल्प तयार करण्याचे तंत्रपद्धत विषद केली. त्यांनी भारतीय दंतकथेवर आधारित शिल्पकलेबद्दल त्यांनी माहिती दिली. सामाजिक जीवनातील प्रसंग, दिनचर्या आणि सामजिक संदेश शिल्पकलेतून त्यांनी मांडला आहे. वनातील सीता, अहंम ब्रह्मा यांची शिल्पे तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विविध भावमुद्रा, हालचाली जीवंत होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले.

ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश

शिल्पातून कथा सांगणे किती प्रभावी होऊ शकते, याचे उदाहरण देताना त्यांनी ‘ब्युटी अँड द बीस्ट’हे शिल्प सादर केले. "सामान्यतः ब्युटी म्हणजे स्त्री आणि बीस्ट म्हणजे प्राणी, अशी समजूत असते. पण त्यांनी हे उलटे मांडले आहे. माणसंच खरे बीस्ट आहेत, जी प्राण्यांची कातडी वापरतात, त्यांना ठार करतात. प्राणी हेच खरे सौंदर्य आहेत," असा सामाजिक जाणिवेचा संदेश त्यांनी दिला.

याबरोबरच त्यांनी ‘सायलंट म्युझिक’ या शिल्पाची ओळख करून दिली. "ही कलाकृती म्हणजे नाद नसलेली पण जाणवणारी संगीतातील एक अवस्था आहे. डोळ्यांनी बघताना शांततेत सुद्धा संगीताची अनुभूती येते," असं ते म्हणाले. या संकल्पनेत त्यांनी पंचमहाभूतांचा समावेश करून सर्जनशीलतेचा वापर केला आहे.

शिल्पकलेमध्ये  रचना महत्वाची असते. यामध्ये नैसर्गिक कृतीचा केंद्रबिंदू ठरतो, बॅलन्सिंग कला, त्रिमितीय पेंटिंग, आर्मीचर या शिल्पकलेमध्ये विविधता केली तरच प्रेक्षकांच्या मनाला भावते. शिल्प कलेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे

 


‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ परिसंवाद

मुंबई : समाजमाध्यमांतील इनफ्लुएसंर्सने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

             बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५  दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

 यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती  एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख  विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून  सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करता, योग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेत, त्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहे, असे सांगितले.

Saturday, 3 May 2025

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ : किरण मझुमदार शॉ

 


किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हजमध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख

स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन

मुंबई :- सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्स, परिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी  केले आहे. त्या  मुंबईत जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित पहिल्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) दुसऱ्या दिवशीच्या संवाद सत्रात बोलत होत्या.

"भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान: जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक" या विषयावर फोर्ब्स एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करताना मझुमदार शॉ यांनी भारतीय कथांमधील जागतिक क्षमतेविषयी सांगितले. रामायणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची ही  वेळ आहे. ज्याप्रकारे जॉर्ज लुकास यांनी ‘स्टार वॉर्स’साठी भारतीय अजरामर महाकाव्यांपासून प्रेरणा घेतली, त्याप्रकारे आपणही आपल्या सांस्कृतिक वारशाचे रुपांतर जागतिक फ्रँचायझीमध्ये करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.”

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि डिजिटल सामर्थ्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "अब्जावधी स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान-सजग जनरेशन झेड सह, भारत जागतिक नवोन्मेषासाठी सज्ज आहे. पण कोणत्याही ब्लॉकबस्टर म्हणजेच अतिशय गाजलेल्या सिनेमा किंवा विषयाप्रमाणे यशाची सुरुवात  एका कल्पनेने आणि अथक  लक्ष्यकेंद्री पद्धतीने एका लहान स्तरावर होते." हे  सांगताना त्यांनी गॅरेजमध्ये बायोकॉन सुरू करून जागतिक बायोटेक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करण्याच्या स्वतःच्या प्रवासाची तुलना केली.

भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील लोकांनी प्रचंड क्षमता असलेल्या ऑरेंज  अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र जीडीपीमध्ये 20 अब्ज डॉलर्सचे योगदान देते. आपण 2047 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स आणि सरतेशेवटी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या केशरी अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजे, जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नाशी सुसंगत असेल," असे शॉ म्हणाल्या.


सृजनशील निर्माते आणि स्टार्ट अप्सचे सक्षमीकरण

भारताच्या सृजनशील क्षमतेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शॉ यांनी एआर (AR), व्हीआर (VR) आणि  इमर्सिव्ह अनुभवांचे  एकत्रीकरण हे महत्त्वाचे आघाडीचे क्षेत्र असल्याचे सांगितले. "पुढचे युनिकॉर्न केवळ ॲप्स नसतील  तर ज्यांना बौद्धिक संपदा , तंत्रज्ञान आणि इमर्सिव्ह  कथाकथनाचे आकलन होते, असे सृजनशील  निर्माते असतील " असे त्यांनी नमूद केले. 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की भारतीय सृजनशीलतेला केवळ समुदायाला भावनिक साद घालण्याच्या पलीकडे जावे लागेल. ते जागतिक स्तरावर प्रासंगिक असले पाहिजे .प्रत्येक महान कल्पना लहान स्तरावर सुरू होते. तुम्ही तिला किती दूर घेऊन जाता हे महत्त्वाचे आहे. अपयश हा या वाटचालीचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

“जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” विशेष चर्चासत्र


वेव्हज - 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत  जागतिक संवादाला मिळाली चालना  प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ

मुंबई :- पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या  वेव्हज २०२५ शिखर परिषदेत  “जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” या विषयावर आधारित सत्रात विविध क्षेत्रातील मते ऐकण्याची संधी  मिळाली. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नाल; वॉल्ट डिस्ने कंपनीचे ईव्हीपी तसेच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टीन वॉरब्रूक; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डे; बीबीसी स्टुडीओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हार्डमन; प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी,  गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि राजनीती तज्ज्ञ अनिश त्रिपाठी यांनी चर्चा संचालक म्हणून या चर्चेत  भाग घेतला.

कथाकथनातील परिवर्तनशील घटकांचा शोध घेण्यासाठी या सत्राने जागतिक माध्यमे, मनोरंजन आणि साहित्य विश्वातील अनेक दूरदर्शी नेते आणि कथाकथनात प्रभुत्व मिळवलेले वक्ते यांना एकत्र आणले. विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील  कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगत यांच्यात गाजलेल्या वक्त्यांनी गुंगवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीने सीमापार प्रवास करुन संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबद्दलचे विचारधन सामायिक केले.

या कार्यक्रमातील चर्चेने जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मक, सर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टीकोन, संस्कृती तसेच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला.

जगभरातील प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी विज्ञान, शोध तसेच दृश्य कथाकथन यांची वीण असलेल्या सशक्त कथा निर्माण करण्यासाठीची धोरणात्मक दृष्टी केटलिन यार्नाल (नॅशनल जिओग्राफिक) यांच्याकडे आहे. उपरोल्लेखित चर्चेदरम्यान त्यांनी कथाकथन क्षेत्राची सत्यता तसेच उत्कृष्टता यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला. तसेच त्यांनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलासा वाटेल अशा आशयाच्या निर्मितीत असलेली आव्हाने आणि संधी अशा दोन्हींवर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.

जस्टिन वारब्रुक (वॉल्ट डिस्ने) यांनी भारतीय बाजारपेठेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि वेगाने वाढणारी माध्यम आणि मनोरंजन बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी डिस्नेच्या भारतीय कंपन्यांबरोबरच्या सहकार्याबद्दलही सांगितले, आणि ही भागीदारी परस्परांच्या संस्कृतीला जोडण्यासाठी आणि कथाकथनाच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी कशी सहाय्य करत आहे, यावर भर दिला.

केली डे (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) यांनी जागतिक विस्तार आणि आशय सामग्री विषयक धोरण, विविध खंडांमधील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर गुंफलेल्या कथा आणण्याचे काम कसे करते, यावर आपले विचार मांडले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या कथा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतील, हे व्यासपीठ ठरवते.  सशक्त कथाकथन, स्थानिक प्रेक्षकांचा कल ओळखणे आणि योग्य स्वरूप आणि शैली निवडणे यात यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

फिल हार्डमन (बीबीसी स्टुडिओ, आशिया) आशियाई प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या निवडक ब्रिटिश सामग्रीच्या वितरणाचे प्रमुख आहेत. त्यांनी दर्जेदार सामग्रीच्या शाश्वत सामर्थ्याबद्दल बोलताना, त्यांनी बीबीसीच्या शिक्षण आणि माहिती देण्याच्या मुख्य मिशनवर भर दिला. त्या ध्येयाला अनुसरून अर्थपूर्ण कथांचा शोध घेऊन त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक्‍ राजकुमार हिरानी म्हणाले की, कथाकथन हे स्वाभाविकपणे व्यक्तीनिष्ठ असते, त्याचा प्रतिध्वनी व्यक्तीनुरूप वेगळा असतो.  कृत्रिम बुद्धीमत्तेबद्दल आपण आशावादी असून, सर्जनशीलता आणि कथाकथन शैलीत भर घालणारे हे एक मौल्यवान  साधन असल्याचे ते म्हणाले.

‘एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य भारतीय उद्योजकतेचे भवितव्य चर्चासत्रातील सूर


मुंबई : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून विविध योजनांमुळे तरुण उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याने नवउद्योजकांना उद्योगात उज्ज्वल भवितव्य आहे. आधुनिकतेचा स्वीकार करून ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर स्वीकारावा लागणार असल्याचा सूर 'भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप' चर्चासत्रातून उमटला.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमध्ये 'भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप' चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रात 'बोट' लाइफस्टाइलचे सहसंस्थापक अमन गुप्ता, शादी डॉट.कॉमचे अनुपम मित्तल यांनी भाग घेतला, उद्योजक श्री. खुराणा यांनी मुलाखत घेतली.

श्री. गुप्ता म्हणाले की, सध्या कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा, त्यामध्ये ‘एआय’चा वापर हा राहणार आहे, यामुळे गुंतवणूकदारांनी अशा उद्योगात पैसे गुंतवायला हवेत. आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूकदारांसाठी काही समस्या असतात, मात्र व्यवसाय आणि पैसा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार हवेतच. पूर्वी शासकीय नोकरीला प्राधान्य होते, मात्र सध्या स्टार्टअपला प्राधान्य आहे. सुरुवातीला स्टार्टअपमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र कधीतरी आपल्याला नफा मिळणार असल्याने कष्ट करण्याच्या मानसिकतेवर भर द्यायला हवा.


उद्योजक बनू लागले सेलिब्रिटी - गुप्ता

हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री यांना आपण पूर्वी सेलिब्रिटी समजत होतो. सध्या स्टार्टअप आणि उद्योजकांचे युग आहे. उद्योजक हे नव्या पिढीचे सेलिब्रेटी बनत असल्याचे श्री. गुप्ता यांनी सांगितले. सध्या व्यवसायामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या उद्योजकतेच्या विकासात सकारात्मक पाऊल आहे. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असून त्यांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकांसाठी विविध प्रशिक्षण व निधी शासकीय योजनातून मिळत आहे. मन, बुद्धी आणि वेळ दिला तर आपल्याला  कोणत्याही क्षेत्रांमध्ये यश नक्की मिळते, असेही श्री. गुप्ता यांनी सांगितले.


‘एआय’मुळे रोजगार जाण्याची भीती नाही - मित्तल

मोबाईल आणि सोशल मीडिया वापरासह सर्व क्षेत्रामध्ये ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’ वापराने रोजगार जाण्याची भीती नाही, मात्र त्याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आपल्या व्यवसायात वापर करायला हवा. विकसित भारताच्या जीडीपीमध्ये नवउद्योजकांचा खूप मोठा वाटा असेल, असे शादी डॉट कॉमचे श्री. मित्तल यांनी सांगितले.

चॅट जीपीटी, गो टू चाही वापर वाढत आहे. कोणतेही टेक्स्ट बाबत सर्व उपलब्ध माहिती मिळते. ॲप बनवायला सोपे असल्याने यामध्येही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. चांगली जागा/क्षेत्र (Area) निवडा. चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करण्याची क्षमता असेल तर चांगले उद्योजक बनाल. काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने उद्योगाची सुरुवात करा, महिलांनी उद्योग करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यायला हवे, असेही श्री.मित्तल यांनी यावेळी सांगितले

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित

 


जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा

मुंबई : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी पॅनल चर्चासत्रात व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये इवोल्युशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालनाखाली या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहता, द इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानी, आरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.

श्री.झराबी यांनी सांगितले की, डिजिटल युगात वितरणाची साखळी आता केवळ काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातात आहे, त्यामुळे कधी कधी त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचतात, त्यांचे डेटा आणि अल्गोरिदम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पारंपरिक माध्यम संस्थांची भूमिका आणि त्यांचे अस्तित्व याबाबत बदलणाऱ्या संदर्भात विचार करण्याची गरज भासू शकते. डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांती केली असली, तरी या बदलासोबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

श्री. सिंधवानी यांनी सांगितले की, डिजिटल युगात बातमी पोहोचवणाऱ्या पारंपरिक यंत्रणा मागे पडल्या आहेत. पूर्वी माध्यम संस्थांकडे कंटेंटपासून वितरणापर्यंत सर्व नियंत्रण होते. पण आता सर्च इंजिन्स, सोशल मीडिया आणि ‘एआय’ या तंत्रज्ञान कंपन्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहे, त्यांच्याकडे डेटा आहे, आणि त्यांचे अल्गोरिदम्स निर्णायक ठरत आहेत.

श्री. मेहता यांनी सांगितले की, आजचे युग हे ‘न्यूज’ची व्याख्या पुन्हा लिहित आहे. पूर्वी संपादक ठरवत असत की जनतेने काय वाचावे. पण आजचा डिजिटल वापरकर्ता आपल्या गरजांनुसार कंटेंट शोधतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेली बातमी आता अप्रासंगिक ठरू शकते. आता पत्रकारांना ग्राहक शोधावा लागतो. 'जर्नालिझम बाय डिफॉल्ट' चं युग संपलंय," असे त्यांनी स्पष्ट केले.बातमी ही आता एकटी उभी राहत नाही. तिच्याभोवती सखोल माहिती आणि विश्लेषण हवे असते, असे श्री. बजरिया यांनी सांगितले.

वापरकर्त्यांकडे आज इतकी माहिती आहे की कोणती बातमी खरी, अचूक आणि विश्वासार्ह याबाबत आव्हानात्मक परिस्थिती येवू शकते. सर्वच गोष्टी ‘फॉरवर्ड’ स्वरूपात फिरत आहेत. माहितीचा अतिप्रवाह आहे. डिजिटल माध्यमांवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ‘एआय’मुळे बातमी संकलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. अनेक पूर्वनियोजित, डेटा-आधारित गोष्टी ‘एआय’ करू शकतो. पण दृष्टीकोन, मुलाखती, विश्लेषण हे मानवी मन आणि बुद्धीचेच काम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता अधिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, असे सूर चर्चेत उमटला.

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक- डॉली सिंग

 


मुंबई : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच  नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असते, असे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओ, मजकूर,विषय मांडण्याची पद्धत, संपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ, टीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला 

Friday, 2 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार

 




परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय  चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३००० कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी व कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेज कडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


एनएसई इंडायसेसकडून 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स' चा शुभारंभ

‘एनएसई इंडायसेस लिमिटेड’ने आज मुंबईत आयोजित व्हेव्ज 2025 या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स' चा शुभारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल.  निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत. 

भारताच्या सर्वात गतिशील क्षेत्रांपैकी एक असलेल्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘निफ्टी वेव्हव्ज’च्या माध्यमातून झाल्याचा अभिमान वाटत आहे, असा विश्वास एनएससीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी ‘सिडको’चा करार

सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York) यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. 

सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’च्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’च्या वतीने कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी करारावर स्वाक्षरी केली.

उद्योग विभागामार्फत ‘प्राईम फोकस’ आणि ‘गोदरेज’ यांच्यासोबत करार

उद्योग विभाग आणि ‘प्राईम फोकस’ तसेच ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले. 

‘प्राईम फोकस’ सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३००० कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल. 

तर ‘गोदरेज’ सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) 600 रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प 2027 मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये 1900 रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा 2030 पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 2500 रोजगार निर्मिती होईल.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन यांनी, प्राईम फोकसच्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी तर गोदरेज च्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी करारावर स्वाक्षरी केली

गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत  चर्चा

मुंबई -  महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस गोलमेज बैठकीत बोलत होते.

महाराष्ट्रात निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक रूपांतर करून त्यांचे आयपी (बौद्धिक संपदा) तयार करणे, आणि त्या आयपीचं संपूर्ण भारतात व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करणे ही कल्पना उत्कृष्ट आहे. 


मराठीचा कंटेंट जागतिक स्तरावर नेणार

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक मराठी कंटेंट जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मराठी कंटेंट क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहभाग द्यावा,  असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.


अपस्किलिंग, आयपी हक्क आणि शैक्षणिक गुंतवणूक

अपस्किलिंगसाठी विविध इंडस्ट्रीने पाठबळ देणे अपेक्षित आहे. राज्य शासन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करत आहे. आयपी (बौद्धिक संपदा) विषयावर जनजागृती करणे देखील  गरजेचे आहे. माध्यम व मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.शूटिंगसाठी 'एक खिडकी प्रणाली' महाराष्ट्रात सुरु केली आहे यामुळे सर्व परवानग्या एका पोर्टलवरून मिळतात. शासकीय ठिकाणी शूटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बळगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह विविध क्रिएटर कंपनीचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील मराठी कंटेंट, परवाना आणि कलाकाराबाबत समस्या मांडल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'लोकराज्य'चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित



मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' अर्थात 'वेव्हज् २०२५' या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. 

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्ह्ज' परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन , एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्य' चे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल,  संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात  'वेव्हज् 'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.

यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

-----०००----

Thursday, 1 May 2025

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 


वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट - 2025 (व्हेव्ज) चे पंतप्रधानांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी  काही वर्षांत जीडीपीमध्ये (सकल घरेलु उत्पन्न) याचा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी  व्हेव्ज परिषदेमुळे  यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपटांना केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.


मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे- नरेंद्र मोदी

आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी  संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास  व्यक्त करून  जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज जग नवीन पद्धतीने कथा,संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज*-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. व्हेव्ज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हे महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले. 

आज डिजिटल आशय, संगीत, अ‍ॅनिमेशन, गेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सुमारे ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


मुंबईत साकारणार आयआयसीटी -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. व्हेव्ज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले.

अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार व्हेव्ज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, व्हेव्ज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.