Followers

Thursday 30 June 2016

ग्राहक सेवेबरोबरच डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल - मुख्यमंत्री



ग्राहक सेवेबरोबरच डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल - मुख्यमंत्री

महावितरणच्या मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : 
महावितरणने निर्मिती केलेल्या मोबाईल ॲपमुळे ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता व जबाबदारी वाढणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महावितरणने डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ग्राहकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी चार मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृह येथे झाले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार आदी उपस्थित होते. ग्राहकांसाठी महावितरण मोबाईल ॲप, कर्मचाऱ्यांसाठी महावितरण ॲप, नवीन कनेक्शन ॲप, मीटर रिडींग ॲप व कर्मचारी मित्र या चार ॲपचे अनावरण यावेळी झाले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल महाराष्ट्रसाठी इज ऑफ ड्युइंग बिझनेस संकल्पना सर्वच खात्यांनी अंगिकारली आहे. नागरिकांना कोणत्याही सेवेसाठी शासकीय कार्यालयात यावे लागू नये, यासाठी सर्वच विभागाने आपल्या सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणाव्यात. महावितरणने या ॲपच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम सुरू केले असून याद्वारे ग्राहकांना नवीन जोडणी देणे, त्यांच्या विविध समस्यांचे निवारण करणे आदी कामे होणार आहेत. या ॲपमुळे जमा होणाऱ्या माहितीमुळे ग्राहक सेवेबरोबरच महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी, कार्यक्षमता व कामातील पारदर्शकता वाढणार आहे. त्याचा फायदा ग्राहकांनाबरोबरच महावितरण कंपनीलाही होणार आहे. तसेच वीज गळती व चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करता येईल. 

डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यात तीन वर्षात सर्वच भागात वायर्ड नेटवर्कचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून लोकाभिमुख सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ग्राहक सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणताना नागरिकांचे आधार क्रमांक त्याच्याशी जोडले जावे. तसेच हे आधार क्रमांक पडताळणीची यंत्रणाही यामध्ये असावी, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, वीज क्षेत्रातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपन्यांनी लोकाभिमुख सेवेच्या दिशेने पावले टाकली आहेत. ऊर्जामंत्री श्री.बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीने देखील गेल्या काही काळापासून उल्लेखनीय कार्य केले असून नवनवीन कल्पना राबविले जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे ऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचे लिंकेज केल्यामुळे राज्याला त्याचा फायदा झाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्यांना देशात सर्वात कमी दराने वीजपुरवठा करत आहे. त्यामुळे औद्योगिक विजेचा दरावर त्याचा परिणाम होत आहे. भावी काळात कोळशावरील ऊर्जा निर्मितीच्या खर्चात वाढ होत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात कृषी क्षेत्रासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा लागणार असून त्याद्वारेच औद्योगिक वीज दरावरील भार कमी करता येईल. त्यासाठी राज्य शासन कृषी क्षेत्रासाठी लागणारी ऊर्जा सौर माध्यमातून निर्मिती करण्यावर भर देत आहे. 

ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, नवीन सरकार आल्यानंतर महावितरण व इतर कंपन्यांच्या कामात सुधारणा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल ॲपच्या माध्यमातून महावितरणने या पुढाकार घेतला आहे. ऊर्जामंत्री म्हणून राज्यात दौरे करताना आढळलेल्या माहितीवरून वीज कंपन्यांच्या सुधारणांसाठी 64 सूचना केल्या होत्या. या सूचनानुसार महावितरणने काम सुरू केले आहे. ग्राहकांना शाश्वत वीज पुरविण्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या सूचना लक्षात घेऊन वीज कंपन्या काम करत आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून वीज कंपन्याचे विभागीय संरचना बदलून ग्राहकांना चांगली सेवा देण्यात येणार आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी मोबाईल ॲपची माहिती दिली. प्रधान सचिव श्री. श्रीमाळी यांनी प्रास्ताविक केले तर प्रकल्प संचालक प्रभाकर शिंदे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment