Followers

Thursday 30 June 2016

संकल्प 2 कोटी वृक्षलागवडीचा



संकल्प 2 कोटी वृक्षलागवडीचा
जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, निर्सगाचे असंतुलन, अनियमित पर्जन्यमान, दुष्काळ व अतिवृष्टी अशा परिस्थितीला आज सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्यासाठी राज्य शासनाने 1 जुलै ते 7 जुलै 2016 दरम्यान वन महोत्सवाचे सप्ताहाचे आयोजन केले आहे.  या कालावधीत 1 जुलै रोजी एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. त्या विषयी थोडक्यात माहिती.
जे वृक्ष लावती सर्वकाळ l त्यावरी छत्राचे छल्लाळ

जे ईश्वरी अर्पिती काळ l नाना विश्व निर्मळ
            राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावरील मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छांदन (वनीकरण) असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतीशिल आणि विकसनशिल राज्य आहे.  राज्यात सर्वसाधारणपणे वृक्ष आवरणाचे प्रमाण 20 टक्के आहे.  जागतिक तापमाणात होत असलेली वाढ, वातावरणातील बदललेले निर्सगाचे ऋतूचक्र, पर्यावरणाचे असंतुलन, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, वृक्षतोड, कमी पाऊस या सर्व परिस्थितीला मानवाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा एकमेव पर्याय आहे. यासाठी राज्य शासनाने 1 जुलै रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे.
राज्यात सध्या सुरु असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या धर्तीवर वनयुक्त शिवार हे अभियान यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे.  या 2 कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग महत्वाचा असून     यामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसी, स्काऊट, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था अशा अनेक संस्थांचा सहभाग असणार आहे. या निमित्त वृक्षक्रांती अभियान राबविण्यात येणार असून विविध माध्यमातून त्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. वृक्षलागवड कार्यक्रम सातत्याने पुढे चालू ठेवण्यासाठी रोपे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सामाजिक वनीकरण विभागाने आपल्या रोपवाटीकेत मोठ्या प्रमाणावर रोपे तयार केली असून 1 जुलै रोजी होणाऱ्या वृक्षलागवड कार्यक्रमासाठी त्यांच्यामार्फत रोपे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सर्वत्र प्रगतीपथावर आहे.  प्रत्येक जिल्हयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 1 जुलै रोजी वृक्षलागवडीचा कार्यक्रम होणार असून आपआपल्या तालुक्यात, गावात लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.        
वृक्षलागवड कार्यक्रमाचे नियोजन व अमंलबजाणीकरिता किमान एक ते दीड फुट दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता, निधीची उपलब्धता, येणाऱ्या अडचणी दुर करणे, उद्दिष्ट पुर्ण करणे याबाबत नियोजन, समन्वय, अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हयाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्याबाबत विभागात तसेच जिल्हयात आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.  या कार्यक्रमातंर्गत वन व सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ यांच्यामार्फत कमीत कमी 1.50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. उर्वरित 50 लक्ष वृक्षलागवड इतर विभागामार्फत निश्चित करण्यात आले आहे. सर्व धर्मांमध्ये झाडांचे महत्व सांगितले असून आपल्या जीवनात प्राणवायुचे महत्व मोठे आहे. प्राणवायूशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी झाडे लावणे  महत्वाचे असून त्याच बरोबर झाडांचे संगोपन करणे तेवढेच महत्वाचे आहे. या सर्व उपक्रमात व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून आपआपल्या भागात व परिसरात या निमित्त सर्वांनी झाडे लावावीत. लागवड केलेली रोपे जगविण्यासाठी रोपाभोवती संरक्षण जाळी लावणे, काटेरी कुंपण करणे, रोपे दत्तक देणे या सारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच उन्हाळ्यात रोपे जिवंत रहावी म्हणून पाणी देण्याची जबाबदारीसुध्दा जनतेची असून याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. वृक्षलागवड कार्यक्रम सातत्याने पुढे सुरु ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची उपलब्धता होणे आवश्यक आहे.
रोप लागवड केल्यावर ते जगविण्याचे प्रमाण कमीत कमी 80 ते 90 टक्के पर्यंत राहण्यासाठी त्या रोपांचे
संरक्षण व संगोपन करणेसुध्दा आवश्यक आहे. ज्यामुळे वृक्षलागवडीनंतर वनक्षेत्र व वृक्षाचे आवरण वाढण्यास मदत होईल.  सर्वांनी वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन हे ईश्वरीय काम समजून या राष्ट्रीय कार्यक्रमात हातभार लावावा.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निमित्त महावृक्षलागवडीचा संकल्प सोडला आहे. हा सर्वांच्या हिताचा संकल्प आहे. तो पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी यात झोकून दिले तर 2 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट सहज साध्य होईल. यात शंका नाही.
पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येवू या, एकाच वेळी एकाच दिवशी 2 कोटी झाडे लावू या
एकच लक्ष 2 कोटी वृक्ष
डॉ. रविंद्र ठाकूर
सहाय्यक संचालक
माहिती व जनसंपर्क कार्यालय,
                                                                                                औरंगाबाद