Followers

Friday 22 February 2019

दुष्काळग्रस्त भागातील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी केली प्रत्येक जोडप्यास 1 लाख रुपयांची तर शहीद जवानांच्या कुटुंबांना ग्रामविकास विभाग व उमेद तर्फे 1 कोटी रुपयांची मदत

बीड दि. 22 – मराठवाड्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विवाह करणे, हा अनेक कुटुंबांपुढे पडलेला मोठा प्रश्न आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एका चांगल्या कार्याला सुरूवात होत आहे. सगळा बडेजाव टाळून सर्वांना एकत्रित घेऊन संपन्न होत असलेला हा विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज येथे सांगितले.
  परळी येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व्दारा आयेाजित 89 जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सिनेअभिनेता अक्षय कुमार, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार,  खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, श्रीमती संगिता ठोंबरे,राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे , ,जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
  मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आदर्शवत वाटचालीवर चालत पंकजाताईंनी चांगल्या कार्याची सुरूवात केली आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एवढा मोठा समाज आज एकत्रित आला आहे. या जोडप्यांना हजारो लोकांचे आशिर्वाद मिळत असल्याने त्यांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद लाभणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, अक्षय कुमार यांनी दिलेली एक लाख रुपयांची मदत विवाह सोहळ्यातील सर्व नवरदेवांनी आपल्या पत्नीच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून त्यात जमेल तशी भर घालावी, जेणेकरुन त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर होईल.
  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की,  मुलींचे लग्न वेळेत झाले पाहिजे असे सर्व आई-वडिलांना वाटत असते. परंतु दुष्काळाच्या परिस्थितीत हे सर्वांनाच शक्य आहे असे नाही. अशा प्रकारच्या  सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. मी गरीब जनतेसाठी काम करीत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेच्या विकासासाठीच काम करीत राहणार. सिनेअभिनेता अक्षय कुमार यांनी आज मी प्रथमच एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहत आहे असे सांगून आपल्या नववधूची काळजी तर घ्याच पण आपल्या आई-वडिलांचीही तितकीच काळजी घ्या, असा सल्ला या  मंगलप्रसंगी नवदांपत्यांना दिला.
यावेळी अभिनेता अक्षय कुमार यांनी प्रत्येक नवविवाहित जोडप्यास 1 लाख रुपये मदत दिली. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत बौध्द धर्मीय नवविवाहित दाम्पत्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयाची मदतही करण्यात आली. ‘भारत के वीर’ या अभियानांतर्गत ‘उमेद’ तर्फे 58 लाखांचा धनादेश तर ग्रामविकास विभागातर्फे शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी मदत म्हणून 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द करण्यात आला. शासनाने ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू केल्याबद्दल आणि महात्मा ज्येातीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा पत्रकार संघातर्फे सत्कारही यावेळी  करण्यात आला. 

No comments:

Post a Comment