Followers

Tuesday 25 December 2018

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक संपन्न



उस्मानाबाद ,दि,25:-   दुष्काळी परिस्थितीत पाणी ,गुरांना चारा व ग्रामीण भागातील मजूरांचे स्थलांतर अशा विविध विषयांबाबत जिल्हा प्रशासन करीत असलेल्या तयारीची आढावा बैठक विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिंगोली येथील विश्रामगृहामध्ये संपन्न झाली.
       या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनूप शेंगुलवार,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी रामचंद्र चोबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख,स्वप्नील मोरे,विठ्ठल उदमले,जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे हे उपस्थित होते.
      यावेळी विभागीय आयुक्त श्री.भापकर यांनी टंचाईसंदर्भात विविध बाबींचा आढावा घेताना मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष त्या-त्या गावात जाऊन पाहणी करावी, अधिग्रहित विहिरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसांपर्यंत पुरेल तसेच जिथे टॅंकरने पाणीपुरवठा होत असेल त्या गावातील पाणीसाठयासाठी उपलब्ध असलेली विहीर,हौद किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुध्द आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी. गाळपेर्‍याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यांपर्यंत हिरवा चारा पुरेल,हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपेर्‍यासाठी  अधिग्रहित केले आहे? या क्षेत्रात बाजरी,ज्वारी,मका या बियाणांची पेरणी करुन जनावरांसाठी  हिरवा चारा निर्माण करावा. 5 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चार्‍यासाठी उपलब्ध झाले पाहिजे म्हणजे चार्‍याची टंचाई भासणार नाही. रोजगार हमी योजनेवर जास्तीत जास्त मजूरांना काम द्यावे म्हणजे मजूरांचे स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबर महिना संपण्याच्या आत गावांमध्ये ग्रामसभा घेऊन  व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदारांमध्ये प्रात्याक्षिकाव्दारे जनजागृती करावी,त्यामुळे गावातील किती ग्रामस्थ व विद्यार्थी स्थलांतरीत झाले आहे,याचा नेमका अंदाज येईल. पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुलांचे वाटप झाले? शेततळयाचे दिलेले उद्दिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी 10 विहिरींचे काम झाले  तर येणार्‍या काळात पाणी टंचाई भासणार नाही,यासाठी शासनाने दिलेली उद्दिष्टये वेळेत पूर्ण करावेत,अशा  आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
        यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेट्टे, जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी श्री. गायकवाड,  जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता श्री.जगताप  पाणीपुरवठा विभागाचे श्री. देवकर, सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. काळे-गोरे, कार्यकारी अभियंता श्री.मरकड,जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री.पांडव, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.पाटील, कृषी उपसंचालक श्री.चोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सर्व तहसिलदार तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते.


विभागीय आयुक्तांनी प्रात्यक्षिकाव्दारे जाणून घेतली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती


     उस्मानाबाद,दि.25 :- आगामी लोकसभा निवडणूक-2019 साठीच्या निवडणुकीत वापरण्यात येणार्‍या नवीन M-3 प्रकारच्या  मतदारयत्रांच्या (ईव्हीएम व व्हीव्हीपॅट) मशीनची माहिती प्रात्यक्षिकाव्दारे आज विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी जाणून घेतली.
           नवीन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनव्दारे प्रत्यक्ष मतदान कसे होणार? त्याविषयी सखोल माहिती जनतेला व्हावी यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या वेळी या मशीनवर मतदान कसे करायचे, हे मतदारांना समजले पाहिजे, त्यासाठी मतदारांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी अधिकार्‍यांनी झटून प्रयत्न करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या. 
        भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण व प्रात्याक्षिकाचे आयोजन शिंगोली येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी,तहसिलदार विजय राऊत तसेच निवडणुकीच्या कामकाजाशी संबधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजणी करुन दाखविली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे, त्यानंतर ही चिठ्ठी या मशीनच्या बॉक्समध्ये संकलित होणार आहे,असे सांगितले.
             ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदारसंघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकांच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदान केंद्रांवर अशा विविध ठिकाणी प्रात्याक्षिकाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वांनाच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे,काही अडचण येणार नाही,असेही श्री.श्रींगी यांनी यावेळी सांगितले. प्रात्यक्षिकादरम्यान मशीनमध्ये मतपत्रिकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह ) यासाठी सांकेतिक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता. या बैठकीस अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार  मोठया संख्येने उपस्थित होते.

Monday 17 December 2018

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’


प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्षम सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉटसॲप क्रमांकावर दि. 28 डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
इच्छूक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडेही दि. 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.

Friday 14 December 2018

पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते 16 मराठा जातीचे प्रमाणपत्र देऊन प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ




*निलंगा तालुक्यातील सावनगीरा येथील प्रगती सोळुंके ह्या विध्यार्थ्यांनीला पहिलं मराठा जात प्रमाणपत्रचा मान

     लातूर, ता. 14  : मराठा समाजाला  आरक्षण देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश शासनाने सर्व यंत्रणेला दिले. त्याचाच एक भाग म्हणून कामगार कल्याण,कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा तालुक्यातील 16 युवकांना  आज मराठा जातीच्या   जात प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करून मराठा जात प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री निलंगेकर यांच्या हस्ते प्रगती सोळुंके (सावनगीरा ता निलंगा) या विद्यार्थ्यांनिस लातुर जिल्ह्यातुन मराठा जातीचे पहिले जात प्रमाणपत्र मिळण्याचा मान मिळाला.

       महाराष्ट्र शासनाने प्रथमच अधिसूचना काढून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठ्या प्रमाणात आधिकारी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली असून त्यात मराठा समाजासाठी आरक्षित जागा दिल्यामुळे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या युवकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. निलंगा मतदार संघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून मराठा जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात प्रगती सोंळूके (सावनगिरा), उमेश सोंळूके (सावनगिरा). जयश्री जाधव( दापका), शुभम माने (अनसरवाडा), नामदेव सूर्यवंशी( माकणी), शिवनंदा आरीकर (निलंगा), माधव सुभेदार( निलंगा), वासूदेव कदम (खडकउमरगा) अशा 16 विध्यार्थांना मराठा जातप्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय आधिकारी विकास माने, तहसीलदार विक्रम देशमुख, नायबतहसीलदार सौदागर तांदळे, दगडू सोंळूके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे  आदी उपस्थित होते. 
  मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णय असून हे आरक्षण सर्व कायदेशीर बाबीचा आभ्यास करून देण्यात आले आहे. या आरक्षणाचा समाजातील विद्यार्थी तसेच तरूण युवकांनी मोठया प्रमाणावर  लाभ घ्यावा, असे अवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

Thursday 6 December 2018

पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरते मुत्रालयाचे लोकार्पण


* महिलासाठी दोन फिरते मूत्रालय लवकरच सुरु होणार
* लातूर शहरातील सर्व शौचालयांचे एका महिन्यात लोकार्पण करणार
       



    लातूर,दि.6:- लातूर शहरातील नागरिकांना  सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची  सुविधा नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. स्वच्छ भारत अभियानांतर्गत  फिरते मुत्रालय (मोबाईल युरिनल व्हॅन )  आज पासून सुरु करण्यात येत असून या फिरते मुत्रालयाचे  लोकार्पण कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांच्या हस्ते आज येथे झाले.
     भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नंदी स्टॉप येथे  फिरते मूत्रालय लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे प्रभागातील सर्व नगर सेवक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
       या फिरते मूत्रलयामुळे लातूर शहरातील व बाहेरुन येथे येणाऱ्या नागरिकांसाठी  चांगली सुविधा निर्माण झाली असून लवकरच फक्त महिलांसाठी ही दोन स्वतंत्र फिरते  शौचालय सुरु केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री  निलंगेकर यांनी दिली. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व बाजारपेठेच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधली जात आहेत. या  सर्व शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात असून ही सर्व शौचालयांचे एका महिन्यात लोकार्पण  केले जाणार असून लातूरकरांसाठी व लातूर शहरात जिल्हयातून व इतर ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना शौचालयाची सुविधा मिळणार आहे. तसेच लातूर शहर हे सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाईल. या स्वच्छता अभियानात सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी यावेळी केले.
       फिरते मूत्रालयाची संकल्पना ही नावीन्यपूर्ण असून कदाचित  राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग असेल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगून या सुविधेचा नागरिकांनी  लाभ घेऊन आपलं शहर स्वच्छ ठेवावे, असे त्यांनी म्हटले. यावेळी खासदार डॉ. गायकवाड यांनी  या उपक्रमाचे कौतूक करुन केंद्रीय स्तरावरुन मदत देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक शैलश कुलकर्णी यांनी केले तर आभार श्री. पत्की यांनी मानले.

Wednesday 5 December 2018

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ सात हजार नऊशे बासष्ट कोटींची आवश्यकता - कृषी सचिव एकनाथ डवले



औरंगाबाद दि. 5 (जिमाका)- गेल्या काही वर्षापासून सातत्याने अनियमित पावसामूळे राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ  7 हजार नऊशे बासष्ट  कोटी 63 लाख रु.निधीची आवश्यकता  असल्याचे राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकासोबत दुष्काळ परिस्थितीबाबतची आढावा बैठक पथकाच्या प्रमुख श्रीमती छावी झा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली ,त्यावेळी श्री.डवले यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर आकडेवारी निहाय माहिती देऊन दुष्काळी परिस्थितीला यशस्वीरित्या हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना व निधीबाबतची माहिती दिली.बैठकीस इंटर मिनिस्टरीयल सेंट्रल टिम (आयएमसीटी)अतंर्गत येणा-या पथकाच्या प्रमुख केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव श्रीमती छावी झा,कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए.के.तिवारी, केंद्रिय जलसमितीचे  संचालक आर.डी.देशपांडे, केंद्रीय कृषी विभागाच्या डॉ.शालिनी सक्सेना, सुभाष चंद्र मीना ,एफसीआयचे ए.जी.टेबुंर्णे,विजय ठाकरे,नीती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी,वरिष्ठ सल्लागार एस.सी.शर्मा,एस.एन.मिश्रा, ,राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंघ,प्रशांत राजणकर, , औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, नाशिक विभागाचे आयुक्त राजाराम माने, पुणे विभागाचे आयुक्त दिपक म्हैसकर, यांच्यासह उपसचिव एस.एच.उमराणीकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर    यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.डवले यांनी राज्यात बहुतांश भागात गेल्या काही वर्षापासून सातत्याने कमी पर्जन्यमानामूळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षातील पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये अपु-या पावसामुळे कोकण,नाशिक,पुणे,औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या विभागातील एकूण 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यातील 13984 गावांत पाण्याची पातळी खालावलेली आहे. अनियमित आणि कमी पावसामूळे रब्बीचा पेरा ही  कमी  झाला आहे.त्यामुळे चा-याच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे.अवेळीच्या आणि तुरळक पावसामुळे खरीप उत्पन्न 73 टक्के कमी झाले असून फळबागाही सुकुन गेल्या आहेत.पिकांची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने शेतक-यांच्या उत्पन्नात त्यामुळे मोठ्याप्रमाणात घट आलेली आहे.या परिस्थितीला बदलण्यासाठी ,पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी राज्य शासनास कृषी अंर्तगत शेतक-यांच्या सहाय्या करिता 7103.79 कोटी रु. तसेच  पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी 105.69 कोटी रु.निधीची मागणी असून राज्य शासनाने जूलै ते सप्टेंबर 2018  या कालावधीत 15.12  कोटी रु टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्यावर खर्च केले आहे तर जून 2019 पर्यंत टॅंकरसाठी  अंदाजे 202 .53 कोटी निधीची आवश्यकता भासणार आहे तसेच चारा  उपलब्धतेच्या दृष्टीने जून 2019 पर्यंत चारा छावण्यांसाठी 535 कोटी 50 लाख  खर्च अपेक्षित असून  या सगळ्यांसाठी एकुण 7962.63 कोटी रु.निधीची आवश्यकता असल्याचे श्री.डवले यांनी बाबनिहाय स्पष्ट केले.
राज्य शासनाने बळीराजा संजीवनी योजनेतंर्गत आठ मोठे ,मध्यम आणि 83 लघु सिंचन प्रकल्प राज्यात सुरु असून या प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर अतिरिक्त सिचंन क्षमतेत 3.77 लाख हेक्टरची भर पडेल तसेच पंतप्रधान शेती सिंचन योजनेतंर्गत राज्यात 26 मोठे,मध्यम प्रकल्प कार्यरत असून त्यांच्या पूर्ततेनंतर अतिरिक्त 5.57 लाख हेक्टर क्षेत्र वाढ होईल.तसेच या दुष्काळी परिस्थिती मनरेगा योजनेतंर्गत 5 लाख 26 हजार कामे शेल्फवर असून 36 हजार 458 कामे सुरु आहेत त्यात एक लाख 70 हजार 821 इतके मजूर कामावर आहेत, असेही श्री.डवले यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी यावेळी मराठवाड्यातील एकुण 33.71 लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळ बाधीत  झाले असून 47 तहसिलमधील 5303 गावे दुष्काळांने प्रभावित झालेली आहेत.विभागातील 421 मंडळांपैकी 313 मंडळात 75 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.चारापिकाची तसेच पिण्याच्या पाण्यीची टंचाई परिस्थिती गंभीर असून खरीप 2018 मध्ये 48.61 लाख हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.सद्यस्थितीत 23 टक्के पाणीसाठा शिल्लक असून 520 टॅंकर सुरु असल्याची माहिती यावेळी दिली.पुणे तसेच नाशिक विभागातील पाणीसाठा,पिक परिस्थिती,पर्जन्यमानाबाबत संबंधित आयुक्तांनी आकडेनिहाय सविस्तर माहिती यावेळी दिली.
सुत्रसंचलन उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर यांनी केले.आभार उपायुक्त वर्शा ठाकूर यांनी व्यक्त केले.विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हा प्रशासन तसेच सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते

Monday 3 December 2018

प्रत्येक व्यक्तींनी दिव्यांगाचा सन्मान करावा-जिल्हाधिकारी जी.श्रीकांत






      लातूर,दि.3:- प्रत्येक व्यक्तींनी  दिव्यांगाची  वेदना ओळखून  दिव्यांग व्यक्तीचा सन्मान करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जागतिक अपंग दिना निमित्त्‍ जिल्हा नियोजन समिती सभागृह आयोजित कार्यक्रमात केले.
     सुलभ निवडणूकाकार्यक्रमातंर्गत  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत  आयोजित  कार्यक्रमात बोलत  होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे  मुख्यकार्यकारी अधिकारी  डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिकेचे  आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर,उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी रामेश्वर रोडगे, जि.प. चे समाज कल्याण अधिकारी श्री.मिनगीरे, तहसिलदार  अविनाश कांबळे उपस्थित होते.
     या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत  म्हणाले की, लोकशाहीमध्ये  प्रत्येक समस्येला उत्तर देणे महत्वाचे आहे. दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी  स्वंयसेवी संस्थे बरोबरच सर्वांनी पूढे यावे, तसेच यापुढे दिव्यांगासाठी  प्रत्येक कार्यक्रम  तळमजल्यावरच ठेवण्याचा संबंधितांना सुचना केल्या व समाज कल्याण विभागाने परिपत्रक करुन  प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याने  दिव्यांग व्यक्तींची  भेट घ्यावी  अशा सुचना दिल्या. या पुढे दिव्यांगाच्या प्रत्येक मुकबधीर/कर्नबधीर कार्यक्रमास ट्रान्सलेटर ठेवावा असेही त्यांनी  सूचित केले.
      यावेळी जिल्हयातील  नवीन दिव्यांग मतदार झालेल्या मतदारांना मतदान कार्ड देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हयातील दिव्यागांसाठी  काम करणाऱ्या  सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा व दिव्यांग खेळाडूंचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र देवून  सत्कार करण्यात आला.
    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटानकर,आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सेवाभावी संस्थेचे अण्णा कदम यांचे दिव्यांगाच्या प्रति मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी (निवडणूक )  प्रताप काळे यांनी तर कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन सुनिता कुलकर्णी यांनी  केले आभार तहसिलदार अविनाश कांबळे यांनी मानले.
      दिव्यांगाच्या प्रति प्रशासनातर्फे दिव्यांग रॅली :-  जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने  जिल्हा क्रिडा संकुल ते जिल्हा परिषद यशवंतराव सभागृह पर्यंत  रॅली  काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन जि.प.चे अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प.चे  मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
      या रॅलीत  शहरातील अपंग शाळेचे विद्यार्थी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी प्रशासनातील,अधिकारी, कर्मचारी  तसेच पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे उद्घाटन
अकोला, दि. 3 : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढयामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाचे कॅन्सर केअर हॉस्पीटलचे          उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पीटलच्या अध्यक्षा श्रीमती टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती. तसेच उद्घघाटनाप्रसंगी महापौर विजय अग्रवाल, आमदार बळीराम सिरस्कार, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदींची उपस्थित होती.
कुटुंबात कुणाला कॅन्सर झाल्यास तो रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उध्दवस्त होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडीही विस्कटून जाते. अशा परिस्थितीत कुटुंबाला मानसिकतेसह आर्थिक आधार देणे गरजेचे असते. राज्य शासन हे महात्मा फुले जनआरोग्य अभियान व केंद्र सरकारच्‍या आयुष्यमान भारत या योजनेतून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णाला सहाय्य करते.
ते पुढे म्हणाले, विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. या कर्करोगाच्या प्रकारापासून समाजाला मुक्त करण्यासाठी मोठया प्रमाणावर जाणीव जागृती  होणे आवश्यक आहे. शासनाने गत कालावधीत मुख कर्करोग तपासणी मोहिमही राबविली. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आता परदेशात किंवा मेट्रो शहरामध्ये जाण्याची गरज नसून अकोल्यासारख्या शहरात ही सुविधा रिलायन्सने उपलब्ध करुन दिली आहे. कुठलेही काम समर्पित भावनेने केल्यास ते निश्चितच फळाला येते हे येथे दिसून येते.
प्रास्ताविकात श्रीमती टिना अंबानी म्हणाल्या, रिलायन्सने अकोला शहरात कॅन्सरवर उपचार करणारे आधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कॅन्सर पिडीत रुग्णांनी उपचार घ्यावेत. यानंतर पुढच्या टप्प्यात रिलायन्स सोलापूर व गोंदीया येथे कॅन्सर चिकित्सा रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी मिळत असलेल्या राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. राम नारायन यांनी केले. कॅन्सर हॉस्पीटलमध्ये असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.