Followers

Sunday 28 October 2018

अटल आरोग्य शिबीरांतर्गतच्या 7 हजार 400 रुग्णावरील शस्त्रक्रिया डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण कराव्यात-पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर


                    
                  
* शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास शासनाकडून  100 कोटीचा निधी मंजूर

      लातूर,दि.27:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते दिनांक 7 ऑक्टोबर 2018 राजी  लातूर येथे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन झाले होते. या शिबीरात  एक लाख रुग्णांची  तपासणी करण्यात आली होती. या शिबीराच्या दुसऱ्या  टप्प्यात  एकूण  7 हजार 400 रुग्णांवर  शस्त्रक्रिया  करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु करुन माहे डिसेंबर 2018 अखेर पर्यंत  सर्व रुग्णांवर  मोफत शस्त्रक्रियाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश  कामगार कल्याण ,कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री  तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
       येथील शासकीय विश्रामगृहाच्या  सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत  पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, वैद्यकीय महाविद्यालयाचे  डीन डॉ. राजाराम पोवार, आरोग्य उपसंचालक डॉ. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. गिरीष ठाकूर वैद्यकीय  निवासी अधिकारी डॉ. माधव शिंदे अदि उपस्थित होते.
        पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की,  या 7 हजार 400 रुग्णांची  विभागणी  पाच तालुक्यातील  जिल्हा परिषदेच्या गट निहाय  करण्यात यावी. व त्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांनी  आप आपल्या गटातील  रुग्णांचे पालकत्व घेऊन  त्या रुग्णांना  वैद्यकीय  उपचार मिळाल्यानंतर  घरी पोहोचविण्याची  व्यवस्था करावी. तसेच  महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत  रुग्णांचा  सर्व खर्च  शासन करते. परंतु  या व्यतिरिक्त  जे रुग्ण्‍  असतील त्या रुग्णांचा सीटी स्कॅन व एम.आर. आय.  तपासणी खर्च शासकीय नियमाप्रमाणे  जो काही  होईल तो खर्च आपण स्वत: करणार असून  याकरिता  विशेष कार्य अधिकारी प्रसाद कुलकर्णी       (7020436783 ) व मनाळे  ( 8329527214 )  यांच्याशी आरोग्य यंत्रणेने संपर्क ठेवावा.असे त्यांनी सूचित केले.
        परंतु  कोणत्याही  रुग्णांकडून आरोग्य विभागाने एक ही  पैसा   उपचारासाठी घेता कामा नये याची दक्षता घ्यावी. या सर्व रुग्णांवर पुढील दोन महिन्यात  शस्त्रक्रिया  पूर्ण कराव्यात. रुग्णांवर शस्त्रक्रिया   व इतर औषधोपचार करताना  सर्व सामग्री व साहित्य दर्जेदार  वापरावे, असे ही  पालकमंत्री  निलंगेकर यांनी सांगितले.
        शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. पोवार यांनी अटल महाआरोग्य शिबीरांतर्गत  शस्त्रक्रिया  करण्यात येणाऱ्या  7 हजार  400 रुग्णांची  यादी महाविद्यालयाला प्राप्त झाली असून  यामध्ये  मेडिकल कॉलेजमध्ये  4 हजार  654  शस्त्रक्रिया , एमआयटी मेडिकल कॉलेज व रुग्णालय मध्ये  966, लॉयन्स हॉस्पीटल उदगीर 15 ,लाईफ केअर रुग्णालयात  13, विवेकानंद 15 व  लातूर जिल्हयाबाहेर मुंबई व पुणे येथे  74 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, अशी माहिती  त्यांनी  दिली. 
        लातूर शासकीय महाविद्यालय व  रुग्णालयात  अद्यावत आरोग्य सुविधा  पुरविण्यासाठी  महाविद्यालय प्रशासनाकडून  निधी मागणी  प्रस्ताव 32 कोटीचा  देण्यात आला होता. परंतु  पालकमंत्री यांच्या  पुढाकाराने या रुग्णालयास शासनाने अद्यावतीकरणासाठी  100 कोटीचा  निधी मंजूर केल्याची माहिती डॉ. पोवार यांनी दिली.
दुष्काळ आढावा :-
       यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्यांकडून जिल्हयातील  दुष्काळ  सदृष्य  परिस्थितीची   माहिती घेतली. व  पुढील काळात शासनाकडून दुष्काळावरील उपाय योजना राबविण्याची कार्यवाही  होईल. त्याकरिता  आपआपल्या  गटातील  लोकांशी संवाद साधावा, अशी सूचना  त्यांनी केली.
     दुष्काळ जाहीर  करण्याचा ट्रिगर-1 मध्ये लातूर मधील शिरुर अनंतपाळ  तालुक्याचा  समावेश असून  उर्वरित  इतर तालुके  ही ट्रिगर 2 व 3 मध्ये असू शकतात. त्यामुळे  जिल्हयातील सर्व नागरिकांना  दुष्काळ सदृष्य  परिस्थितीतील  उपाय योजनांचा  लाभ  मिळेल , असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. या करिता सर्व जिल्हा परिषद  सदस्यांनी  आपआपल्या  गटांतील  गावांमधील  दुष्काळ सदृष्य  परिस्थितीची अद्यावत  माहिती  ठेवून गटांतील  गावांशी संपर्क ठेवावा, असे  त्यांनी  सूचित केले.

दिव्यांगाच्या रोजगारासाठी कौशल्य विकास केंद्र सुरु करणार-सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले


                                        





* शासन दिव्यांग कल्याण धोरण लवकरच जाहीर करणार
* दिव्यांग व्यक्ती कायदा -2016 प्रभावी अंमलबजावणी व्हावी
* संवेदना बहुविकलांग केंद्राचे  काम उतकृष्ट
    
      लातूर,दि.27:- सामाजिक न्याय विभाग व कौशल्य विकास विभाग यांच्या  संयुक्त्‍ विद्यामाने  राज्याच्या प्रत्येक जिल्हयात दिव्यांगाना रोजगार  उपलब्ध्‍ व्हावा याकरिता कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार असून  या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना  रोजगार  उपलब्ध्‍ होईल, असे प्रतिपादन सामाजीक न्याय आणि  विशेष सहाय्य मंत्री  राजकुमार बडोले  यांनी  केले.
        येथील संवेदना बहुविकलांग केंद्रात  राष्ट्रीय बहुदिव्यांगता  जनसशक्तीकरण  संस्था  चेन्नई, जनकल्याण समिती पुणे, अधिवक्ता परिषद लातूर व सक्षम नागपूर यांच्या संयुक्त्‍ विद्यामाने  आयोजित दिव्यांग  व्यक्ती समानहक्क  समान संधी  कायदा-2016  वरील दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी श्री. बडोले बोलत होते.
     या वेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर , खासदार सुनील गायकवाड, चेन्नईच्या राष्ट्रीय  बहुदिव्यांगता संस्थेचे  संचालक  हिमांशू दास, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, अशोक कुकडे, सुजित देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सक्षम नागपूर संस्थेचे  डॉ. सुकुमार  आदिसह  विविध मान्यवर, विचारवंत  उपस्थित होते.
       सामाजीक न्यायमंत्री बडोले म्हणाले की, कौशल्य विकास विभागाच्या  सहकार्याने दिव्यांगाना  रोजगार मिळण्यासाठी  प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक जिल्हयात रोजगार  उपलब्ध्‍ करण्यासाठी  दिव्यांगाची  कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.  दिव्यांगाना विविध साहित्य पुरवठा  करणे व त्यांच्यासाठी  योजना आखणे याबरोबरच  समाजात  दिव्यांग व्यक्ती निर्माण होऊ नये  याकरिता शिघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु केली जाणार असून लातूरसाठी  ही एक केंद्र मंजूर करत असल्याचे श्री. बडोले यांनी  जाहीर केले. राज्यातील एक ही  दिव्यांग  व्यक्ती दिव्यांगतत्व प्रमाणपत्राच्या  अभावी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये याकरिता झिरो पेंडन्सी हा उपक्रम प्रशासनाने  हाती घ्यावा, अशी  सूचना त्यांनी केली.
      सामाजीक न्याय विभाग लवकरच  राज्यातील  सर्व दिव्यांग  व्यक्तीच्या कल्याणासाठी  राज्य दिव्यांग कल्याण धोरण जाहीर करणार आहे, असे सांगून दिव्यांग  व्यक्ती  समान हक्क समान संधी कायदा -2016 अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व तरतुदींची  प्रभावी  अंमलबजावणी  करुन दिव्यांगाना  याचा लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही  ही श्री. बडोले यांनी दिली. तसेच लातूर येथील  संवेदना  बुहुविकलांग केंद्रामार्फत  सामाजीकतेची जाणीव  ठेवून दिव्यांग व्यक्तींसाठी  चांगले काम केले जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.
        शासनाने ठरवून दिलेला सर्व निधी  दिव्यांग व्यक्तींवर प्रत्यक्ष खर्च झाला पाहीजे याकरिता शासकीय यंत्रणेने योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती  समान हक्क  समान संधी  कायदा-2016 अंतर्गत  5 टक्के निधी  प्रत्येक  विभागाने  खर्च केला पाहीजे असे सांगितले.
        लातूर जिल्हयातील  13 हजार दिव्यांग व्यक्तींना  दिव्यांगत्वाचे  प्रमाणपत्रे  विविध ठिकाणी शिबीरे  लावून दिली जात  आहेत.व ही सर्व प्रमाणपत्रे 3 डिसेंबर 2018 पर्यंत दिली जातील.  दिव्यांग व्यक्तींची सर्वकष माहिती  गोळा करणे, प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ  निर्माण करणे व सर्व ग्रामसेवकांची यासाठी  कार्यशाळा, घेणारी लातूर जिल्हा परिषद ही राज्यात  पहिली आहे, असे त्यांनी सांगितले. दिव्यांगासाठी स्वतंत्र औद्योगीक प्रशिक्षण संस्था निर्माण करुन दिव्यांगाना तंत्र कुशल केले जाईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
       केंद्र व राज्य शासन दिव्यांगासाठी  विविध योजना व नोकरीत  आरक्षण ठरवून  देत असतात परंतु प्रत्यक्षात  योजनांची व आरक्षणांची  अंमलबजावणी  पुरेशा प्रमाणात होत नाही. याकरिता  शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत व समाजात  दिव्यांग व्यक्तींचे सर्व प्रकारे समावेशीकरण व्हावे, अशी अपेक्षा श्री. दास यांनी व्यक्त केली. तर जिल्हाधिकारी  श्रीकांत यांनी  जिल्हा प्रशासनमार्फत  दिव्यांग व्यक्तींसाठी  केलेल्या कामाची माहिती देऊन दिव्यांगाच्या हक्कासाठी  प्रशासन तत्पर असल्याचे सांगितले.  यावेळी खासदार सुनील गायकवाड , अशोक कुकडे यांचीही भाषणे झाली.
       प्रारंभी ना. बडोले, ना. निलंगेकर व सर्व मान्यवरांच्या  हस्ते भारतमाता प्रतिमापूजन  व दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर अरुण डंके यांनी व्यासपीठावरील  मान्यवरांचा परिचय दिला. यावेळी  दिव्यांग  मतदार आकाश यांना मतदार कार्ड वर बीज भांडवल योजनेचा दिव्यांग लाभार्थी रोहिदास राठोड यांना धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संवेदनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन तर  प्रा. संजय गवई यांच्या  पुस्तिकेचे  विमोचन ही मान्यवरांच्या हस्ते झाले.
   या कार्यशाळेच्या आयोजना उद्देश  सुरेश पाटील यांनी  प्रास्ताविकात  सांगून  संवेदना बहुविकलांग  केंद्रामार्फत  राबविण्यात येत असलेल्या  उपक्रमाची माहिती दिली  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  प्रीती पोहरेकर यांनी केले तर  आभार जगन्नाथ चिताडे यांनी मानले.
दिव्यांगाना साहित्य वाटप:-
      जिल्हा परिषदेच्या समाज  कल्याण विभागामार्फत  शिरुर ताजबंद ता. अहमदपूर येथे सामाजीक न्याय मंत्री  राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांगाना कृत्रिम  अवयव साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच अहमदपूर नगर परिषदेच्या वतीने  बांधण्यात आलेल्या सिध्दार्थ कॉलनी, इंद्रा नगर, येथील सामाजीक सभागृहाचे  उद्घाटन  श्री. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, आमदार सुधाकर भालेराव, सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत  जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकरी मिनगीरे आदि उपस्थित होते.

Tuesday 16 October 2018

सुव्यवस्थित प्रशासनासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती निर्माण करावी- राज्यपाल चे. विदयासागर राव





* विदयापीठ महाविदयालयांनी शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने स्वीकारावीत
* शिक्षण,संशोधन एकूण उत्कृष्टतेसाठी गुंतवणूक करावी

लातूर दि 16:-विदयापीठ महाविदयालयांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील  नवीन आव्हाने स्वीकारुन शिक्षण पध्दती  बदलण्याची वाट पाहता ती बदलण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. शिक्षणातील शॉर्टकटची संस्कृती नाकारुन  शिक्षण, संशोधन   एकूणच उत्कृष्ट्रतेसाठी गुंतवणूक करावी. आणि  त्याकरिता इतर  विद्यापीठ महाविद्यालये तसेच परदेशातील विद्यापीठांशी शैक्षणिक संलग्नता करुन सुव्यवस्थित प्रशासनासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती निर्माण करण्याचे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी  आज येथे केले.
    स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, लायन्स क्लब लातूर शिवछत्रपती शिक्षण संस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी  शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित उच्च शिक्षणातील  नवीन आयाम या विषयावरील  एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनारच्या  उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल श्री. राव बोलत होते.
     यावेळी राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री  शिवराज पाटील चाकूरकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार गोपाळराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ  विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. मिलिंद म्हैसेकर, प्राचार्य अनिरुध्द जाधव, प्राचार्य महादेव गव्हाणे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, परिविक्षाधीन  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने आदी  मान्यवर उपस्थित होते.
      राज्यपाल श्री.राव पुढे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा तरुण लोकसंख्येचा देश असून 2020 पर्यंत अमेरिका  चीन  पेक्षाही  भारत किमान आठ  वर्षानी  तरुण देश आहे. परंतु या  तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य देण्याचे मोठे आवाहन आपल्या शिक्षण पध्दती समोर आहे, असे त्यांनी म्हटले.
      देशाची अर्थव्यवसथा विकास वृध्दीगंत होण्यासाठी उत्कृष्ट मनुष्यबळाचा पुरवठा शिक्षण पध्दतीतून होणे अत्यंत  महत्वाचे आहे. त्याबरोबरच शिक्षण पध्दतीतून योग्य  पध्दतीने विद्यार्थ्यांना पारिस्थितीक तंत्र , संशोधक आणि विद्यार्थांचे ध्येय, स्वप्न  महत्वाकांक्षा पूर्ण करणारा शिक्षक मिळणे अत्यंत महत्वाचे असल्याचे राज्यपाल श्री.राव यांनी सांगितले.
        भारताला उच्च शिक्षणाचा मोठा इतिहास आहे. या शिक्षण पध्दतीने शास्त्रज्ञ विद्वानांची  निर्मिती  केली असून प्राचीन काळातील नालंदा, तक्ष्यशीला विक्रमशीला विद्यापीठांची  माहिती राज्यपाल श्री. राव यांनी सांगून या विद्यापीठांनी प्राचीन काळी जागतिक शिक्षणाचा  मोठा भाग व्यापलेला होता, असे सांगितले त्याप्रमाणेच गणितज्ज्ञ भास्कराचार्य , अणूची संरचना करणारे  आचार्य कणाद चरक संहितेची निर्मिती करणाऱ्या  चरक या प्राचीन  विद्वानांची  माहिती त्यांनी दिली.
     इंग्रजांनी  भारतात  उच्च शिक्षण पध्दतीची  सुरुवात केली ती नागरी सेवक, क्लार्क आणि कनिष्ठ स्तरावरील प्रशासकीय काम पाहणारे निर्माण करण्यासाठीच परंतु  या पध्दतीतून  विचारवंत आणि विदवान निर्माण होणार नव्हते, असे  सांगून राज्यपाल राव म्हणाले की,  त्यानंतर नवीन भारत नवीन ध्येय घेऊन उदयाला येत होता.त्याला नव्या शिक्षण  पध्दतीची गरज होती, ती निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे, त्या दृष्टीने काम केले पाहिजे, असेही  ते म्हणाले.
        उच्च शिक्षणाच्या पध्दतीत  दुरुस्ती होणे गरजेचे असून त्याकरिता एखादया  संस्थेने पुर्नबांधणीची प्रक्रिया  दर्जा आणि उत्कृष्टतेचा दृष्टीकोन ठेवून राबविली पाहिजे हे घडण्यासाठी नियोजनकर्ते, व्यवस्थापन, शिक्षक  आणि विद्यार्थ्यांनी  उत्कृष्टतेच्या प्रती आपली जबाबदारी  पार पाडली पाहिजे, असे श्री. राव यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील  व्यवस्थापकांनी रिक्त्जागा भराव्यात तसेच अनेक  शैक्षणिक संस्था नॅकचे मूल्यांकन गांभीर्याने  घेत नाहीत, त्यात बदल झाला पाहिजे या मूल्यांकन पध्दतीत बसण्यासाठी  कोणत्याही  शॉर्टकटचा वापर करु नये, असे आवाहन त्यांनी केले.
    अनेक विद्यापीठामधील  पदवीदान समारंभ प्रसंगी प्रत्येक दहा सूवर्णपदकातून आठ सूवर्णपदक  विजेत्यांमध्ये    मुलीच असतात. परंतु  त्या मुली नंतर प्रशासकीय सामाजिक क्षेत्रात कोठेच दिसत नाहीत. अमेरिका येथील एका सर्वेक्षण संस्थेने जगातील  91 देशातील  22 हजार खाजगी कंपन्यांचे  सर्वेक्षण केले. त्यातील 30 टक्के पेक्षा  अधिक कंपन्यामध्ये  महिला कार्यकारी पदावर होत्या त्यांच्या कंपन्यांचा लाभही अधिक होता असे सांगून राज्यपाल श्री. राव यांनी महिलांना आर्थिक जाणही अधिक असते त्यासाठी उच्च शिक्षण महत्वाचे असल्याचे असून अशा उच्च शिक्षण महिलांना संधी उपलब्ध्करुन देऊन त्यांच्या ज्ञानाचा राष्ट्रउभारणीत सहभाग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
    लातूर जिल्हयाने शिक्षण क्षेत्रात  नवीन  क्रांती करुन  शिक्षणात लातूर पॅटर्न यशस्वीपणे  राबविला  असल्याचे सांगून या पॅटर्नमध्ये राजर्षि शाहू कॉलेज डॉ. गोपाळराव पाटील यांचे येागदान मोठे असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राव यांनी    डॉ. पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
        उच्च  शिक्षणात  जागतिक स्तरावरील नवीन विषयांची खोलवर माहिती  घेऊन त्या विषयांचा संपूर्ण  प्राणी जीवनाच्या हितासाठी वापर केला पाहिजे तसेच उच्च शिक्षणासाठी  पुढील काळात उपग्रहांचा वापर करण्याचे  आवाहन श्री. चाकूरकर यांनी अध्यक्षस्थानावरुन  बोलताना केले.
      लातूर जिल्हा हा राज्याचा शैक्षणिक  हब करण्याबरोबरच इनोव्हेशन हबही करण्यात येईल. याकरिता उच्च शिक्षणातील नवीन  परिमाणांचा वापर केला जाईल, असे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. म्हैसेकर, खासदार डॉ. गायकवाड, माजी खासदार गोपाळराव पाटील यांचीही भाषणे झाली.
    प्रारंभी राज्यपाल मान्यवरांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर राज्यपाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करुन या एकदिवशीय  राष्ट्रीय शैक्षणिक  सेमिनारचे उद्घाटन झाले. त्यानंतर या सेमिनारच्या निमित्ताने स्मरणिकेचे  प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
      कार्यक्रमाचे  प्रास्ताविक राजर्षि शाहू महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. यावेळी त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून  राबविण्यात येणाऱ्या  विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती  दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  डॉ. अनुजा  जाधव यांनी केले तर आभार प्रा. शिवशंकर पटवारी यांनी मानले.