Friday, 18 January 2019

150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक -शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे


* साधं साधं नियमांचे पालन करणे ही देशभक्ती 
* सुराज्याच्या निर्मितीसाठी चांगल्या पध्दतीने काम करण्याची गरज
* नो इलेक्ट्रॉनीक गॅझेट इव्हिनिंगचा लातूर पॅटर्न निर्माण करावा
* लातूर जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकूले  निर्माण होतील.
          
      लातूर दि.18- 150 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाकडे  पाहून नागरिकांना सैन्यांचे  व त्यांच्या कुटुंबियांचे  स्मरण होऊन त्यांच्या प्रती  उत्तरदायित्वाची  भावना जागृत राहील. लातूरकर नागरिकांनी  रोजच्या जीवनातील  साध्या साध्या नियमामंचे पालन केल्यास त्यातून देशभक्तीच दिसून येईल.तर हा 150 फुट उंचीचा  राष्ट्रध्वज हा तर लातूरकराच्या देशभक्तीचं प्रतीक असून नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट  इव्हनिंग चा नारा देऊन लातूरचा नवीन पॅटर्न तयार केल्यास  त्यास देशपातळीवर घेऊन जाऊ, असे आश्वासन शालेय शिक्षण, उच्च-तंत्र शिक्षण, अल्पसंख्यांक व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
      जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व पालकमंत्री संभाजी  पाटील  निलंगेकर  यांच्या मार्गदर्शनातून  150 फुट उंचीचा  राष्ट्रध्वज  लोकार्पण सोहळयाच्या उद्घाटनाप्रसंगी  श्री. तावडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर , सौ. वर्षा विनोद तावडे,आमदार विक्रम काळे, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, माजी खासदार रुपाताई  पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी  जी. श्रीकांत , जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी  विपीन इटनकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर,क्रीडा उपसंचालक श्रीमती मोराळे, क्रीडा अधिकारी  निलीमा आडसूळ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत  यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
        शालेय शिक्षण मंत्री तावडे  म्हणाले की, हया राष्ट्रध्वज लोकार्पण कार्यक्रमांसाठी  11 हजार  520 विद्यार्थी  उपस्थित असून  ते ही उन्हात व व्यासपीठावरील  मान्यवर ही उन्हात  आहेत. यातून लातूरकरांची संवेदनशीलता  दिसून येते. तसेच 150 फुट उंच  राष्ट्रध्वज आपणास  दररोज  दिसणार असून त्यातून सैन्य  व त्यांच्या कुटुंबियांप्रती  उत्तरदायित्व  तसेच दैनंदिन जीवनात नियमांचे पालन केल्यास  देशभक्ती  दिसेल, असे त्यांनी सांगितले.
        प्रत्येक नागरिक सीमेवर जाऊ शकत नाही. तो आहे तिथेच राहून शासनाने केलेल्या विविध  नियमांचे पालन केले तरी  देशभक्तीचेच काम करत असतो. स्वातंत्र्य लढयात  बलिदानाची गरज होती. परंतु  सुराज्याच्या  निर्मितीसाठी  नागरिकांनी चांगल्या पध्दतीने  काम करण्याची गरज असल्याचे मत श्री.तावडे  यांनी व्यक्त केले.
      आजची  तरुण पीढी  सायबर  गुलामीत अडकली असून त्यांना  यातून मुक्त करण्यासाठी  लातूरकरांनी आठवडयातून  एक दिवस सायंकाळी  6 ते 9  या काळात  नो  इलेक्ट्रॉनिक गॅझेट  इव्हनिंग डे  ची अंमलबजावणी  केल्यास  लातूरचा हा नवीन पॅटर्न  संपूर्ण  देशभरात घेऊन जाऊन देशातील  तरुणांना सायबर गुलामीतून  मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
        नो  इलेक्ट्रॉनिक गॅझेट  इव्हनिंग मध्ये  विद्यार्थ्यांनी कुटुंबातील  व्यक्तींशी  गप्पा माराव्यात, मैदानावर खेळायला जावे, मित्रांशी  चर्चा  करावी पण  कोणत्याही  इलेक्ट्रॉनिक  गॅझेटला  हात लावू नये, असे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले. लातूर जिल्हयाच्या प्रत्येक  तालुक्यात विद्यार्थ्यांना  खेळण्यासाठी  क्रीडा संकुले  निर्माण होतील. त्यासाठी आवश्यक निधी  दुप्पट केला असून जिल्हा  क्रीडा संकुल व विभागीय  क्रीडा संकुलांनाही निधीची रक्क्म दुप्पट केल्याची  माहिती त्यांनी दिली. तसेच  विद्यार्थी क्रीडा प्रकारात  भाग घेतल्यास  अंतिम  परीक्षेस 10 गुण  राज्य/ राष्ट्र स्तरावरील  स्पर्धेत भाग घेतल्यास  शासकीय नोकरीत  5 टक्के आरक्षण तर  आंतरराष्ट्रीय  स्तरावर सहभाग व पदक जिंकल्यास  थेट शासकीय  नोकरीत प्रवेश असे उपक्रम राबविले  जात असून मागील दोन महिन्यात  67 खेळाडूंना थेट  शासकीय नोकरीत  घेण्याची  माहिती त्यांनी दिली.
      राष्ट्रध्वज  लोकार्पण सोहळयास  उपस्थित  विद्यार्थ्यांनी क्रीडा  संकुलाच्या मैदानात स्वच्छते विषयी  दाखविलेली  संवेदना पाहून  श्री. तावडे यांनी  हेच विद्यार्थी  स्वच्छतेचे खरे दूत आहेत, असे  सांगितले.
    पालकमंत्री  निलंगेकर  म्हणाले की , लातूर मधील  हा 150 फूट उंचीचा  राष्ट्रध्वज  मराठवाडयातील  सर्वात उंच ध्वज आहे. हा जिल्हा राष्ट्रभक्त  निर्माण करणारा जिल्हा असून येथील विद्यार्थी व खेळाडूंना तालुकास्तरावर  खेळाच्या चांगल्या  सुविधा  दिल्यास  राष्ट्र व आंतरराष्ट्रीय  स्तरावर  पदके जिंकणारा  जिल्हा ठरेल, असे त्यांनी  सांगितले. हा  राष्ट्रध्वज  निर्माण  करण्यासाठी  व सोहळा यशस्वी करण्यासाठी  सर्व  लातूरकरांचे  सहभाग महत्वाचा असून  त्याबद्दल  सर्वांचे आभार व्यक्त  करुन  जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी अगदी  कमी वेळेत हा राष्ट्रध्वजाच्या  मंजूरी  मिळवून  व सर्व कामे मार्गी लावल्याबद्दल त्यांचे ही  विशेष कौतूक असलयाचे त्यांनी  सांगितले.
      जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी  प्रास्ताविकात उंच राष्ट्रध्वज निर्माण करण्याची पार्श्वभूमी  सांगून नागरिकांनी मूलभूत हक्काबरोबरच  राज्यघटनेत  दिलेली  11 मूलभूत कर्तव्यांचे पालन  केल्यास राष्ट्रबलशाली होईल, असे डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी नमूद केल्याची माहिती   दिली. व सर्व उपस्थित  विद्यार्थ्यांना  11 मुलभूत  कर्तव्यांची माहिती  देऊन दैनंदिन  जीवनात  त्यांचे पालन निष्ठेने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      प्रारंभी  शालेय शिक्षण मंत्री  विनोद तावडे, पालकमंत्री निलंगेकर  ,एक शालेय विद्यार्थी  व मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे विधीवत पूजन  करुन 150 फुट उंचाच्या राष्ट्रध्वजाचे  लोकार्पण  करण्यात आले. तसेच राष्ट्रध्वज  स्तंभाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर भारत माताच्या प्रतिमेचे पूजन होऊन मान्यवरांनी राष्ट्रध्वजाच्या  तीन रंगाच्या फुगयांचा गुच्छ हवेत सोडून देण्यात आला. यावेळी नगरसेवक दीपक मठपती  यांनी  यांनी  राष्ट्रध्वज निर्माण  कामांत  दिलेल्या योगदानाबद्दल  श्री. तावडे  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.
        या  लोकार्पण  सोहळयास  लातूर शहरातील  20 शाळेतील  तसेच  जि.प. च शाळेतील  11 हजार  520 विद्यार्थ्यांनी  सक्रीय  सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  संवाद तज्ञ उध्दव फड व ॲड. शैलेश  गोजमगुंडे यांनी  केले तर आभार गट शिक्षणाधिकारी  तृप्ती अंधारे यांनी मानले.
      यावेळी जण गण मन, वंदे मातरम्, झेंडा ऊंचा  रहे हमारा, सारे जहाँ से अच्छा, हम होंगे कामयाब,हिंद देश के निवासी, जय जय महाराष्ट्र माझा, हे राष्ट्र देवतांचे , बलसागर भारत होवो,संत महंताची  भूमी यासह 10 राष्ट्र भक्ती पर गीतांचे समूह गायन केले तर राष्ट्रगीताने लोकार्पण सोहळयाचा शेवट झाला.

     यावेळी क्रीडा संकुल परिसरात राष्ट्र भक्तीचे वातावरण होते. विद्यार्थी व उपस्थित नागरिक यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. सगळीकडे वंदेमातरम व जयहिंद च्या घोषणांनी आकाश दुमदुमले होते व समोर दिसत होता तो राष्ट्रभक्ती जागृत ठेवणारा 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज.